जागतिक मातृ दिन मे 2024

जागतिक मातृ दिन मे 2024

#जागतिक मातृ दिन हा मे महिन्याचा दुसरा रविवार जागतिक स्तरावर #जागतिक मातृ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

आज रोजी आपल्याजवळ असलेलं आपलं शारीरिक वैभव हे आपल्या मातृ शक्तीचे दानपत्रच आहे.जगातून बाहेर जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत.मानवनिर्मित व नैसर्गिक अशा दोन्ही कारणाने जग सोडता येते पण जगात येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आईचा गर्भ होय.बाळंतपणाची मरण कळ सोसून ती आपल्याला या जगात आणून सोडते.सृष्टीवरचा आपला पहिला सजीव मित्र , पहिले प्रेम ,पहिला गुरू ,पहिला अन्नदाता ,डोळे उघडताच दृष्टीला पडलेली पहिली मानवी आकृती म्हणजे आईच होय. पोटातही व पोटाबाहेरही , बाळाची काळजी वाहणारी व्यक्ती म्हणजे आईच.

#जागतिक मातृ दिन मे 2024 अशा मातेचा गौरव करण्यासाठीच आहे.


नेत्राच्या ज्योती
लेकराच्या वाती
असे नयन फक्त मातेचेच.
जन्मदात्री माता तर थोर असतेच.पण कित्येक माता अशा असतात की त्यांचे वात्सल्य ,परोपकार हे जन्मदात्या आईपेक्षाही थोर असतात.सिंधुताई सपकाळ हे अशा मातृत्वातलं अग्रणी नाव.देवकी जरी श्रीकृष्णाची जन्मदाती माता होती तरी यशोदाच कृष्णाची आई म्हणून अजरामर ठरली.शरीरधर्माची आई श्रेष्ठ असली तरी मानसिक धर्माने मिळालेल्या मातेचे मोलही कधीच कमी नसते.अशा सर्व मातांच्या सन्मानासाठी जागतिक मातृ दिन साजरा केला जातो.

#जागतिक मातृ दिन अशा मातांसाठीच आहे.

आई होणं व आईपण निभावणं या दोन्ही गोष्टी मोल न करता येणाऱ्या कष्टप्रद वर्गातल्या आहेत.संत तुकोबारायांनी मातृत्वाचे महत्व विशद करताना म्हटलं आहे ---- 

लेंकराचे हित ।
वाहे माऊलीचे चित्त । ।
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती । ।
पोटी भार वाहे ।
त्याचे सर्वस्वी साहे । ।

वरील अभंगाचा सार असा आहे की कसल्याही लाभलोभ नाही ,शून्यांश स्वार्थ व निस्वार्थ माया फक्त आईच करू शकते. मृत्यू सम यातना सहन करून मुलांचे आयुष्य सुखावह करणाऱ्या समस्त मातृत्व शक्तीस जागतिक मातृ दिन रोजी विनम्र अभिवादन .

#जागतिक मातृ दिन आहे.अशा भावनांना सलाम करण्यासाठी आहे.

दयादातृत्वाला जिथं सीमा नसते तेथेच मातृ भाव जन्माला येतो.
मे महिन्याचा दुसरा रविवार जागतिक मातृ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आईसाठी एक दिवस या संकल्पनेतून अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 1914 पासून मातृ दिनाची सुरूवात करण्यास मान्यता दिली..त्यापूर्वी ॲना ही सामाजिक कार्यकर्ती आपल्या आईच्या ऋणाचा उतराई होण्याचा भाग म्हणून मातृदिन साजरा करत होती.पुढे हीच संकल्पना रूजली व जगभर पसरली.

#जागतिक मातृ दिन मातांना वंदन करण्यासाठी आहे.
आपल्या देशात आई या भावनेला भावनिक व सांस्कृतिक असे द्विमितिय महत्व असले तरी प्रत्यक्षात आईपण चौफेर व्यापलेलं आहे.शारीरिक व मानसिक अशा दोन्ही पातळीवर आईचे महत्व आहेच.निसर्गानं सजीवाला स्व वंश चालविण्यासाठी व टिकविण्यासाठी मातृत्व ही देणगी दिलेली आहे.इतर सजीवांमध्ये फक्त जीव जन्माला घालणं व प्राथमिक स्वरूपाचं संगोपन करणं इथपर्यंतच मातृत्व मर्यादित आहे.याउलट मानवी समूहात जीवाचा जन्म व जन्माला आलेल्या जीवाचं संगोपन अन् सरतेशेवटपर्यंत संगोपन करत जीवाची काळजी वाहणं हा मातृत्वाचा तहहयात प्रवास आहे.म्हणून मानवी कुळात आई हे नारीचे शरीर नसून ,ती जन्मदात्रीप्रती आजन्म ऋण भावना आहे.कोणत्याही वयात असताना ,ठेचाळलं वा वेदनेने विव्हळणं आलं की मुखातून फक्त आई नामाचाच जयघोष होतो.कारण आई गं चा उच्चार हा वेदनेवरचं सर्वात शेवटचं औषध आहे.

#जागतिक मातृ दिन आहे.अशा भावभावनांचा सन्मान करतो.


बदलत्या काळात आईच्या पदरात बदल झाला असेल,आईच्या राहणीत बदल झाला असेल,काळजीही थोडी डिजिटल झाली असेल पण आईचं काळीज आजही तेच परंपरागत मायेचं आहे.माता ही कधीच कुमाता नसते या आचंद्रसूर्य कालीन सुभाषिताला तडा देणाऱ्या माता कधीच उदयाला येणार नाहीत .असं सुभाषितकाराचं स्वप्न होतं ,पण अगदीच थोड्याफार मातांनी या सुभाषिताला छेद दिला आहे.अशा कुकर्मी मातांचं प्रमाण सागरातलं पसाभर पाणी सडलेलं निघावं ,इतकं अल्प आहे.
सिंधुताई सपकाळ,संध्याताई /दत्ता बारगजे ,दीपक नागरगोजे ,संतोष गर्जे असे कितीतरी समाजसेवक आहेत ,जे भावनिक मातृत्वाचे धनी आहेत.जन्म दिलेल्या बाळाचे संगोपन करणं हे नैसर्गिक मातृत्व आहे पण बहिस्कृत व वंचित ,अनाथ बालकांसाठी मातृ भाव निभावणं हे दैवी भावनेतलं मातृत्व आहे.असं मातृत्व निभावण्याचं धाडस फारच कमी लोकांमध्ये असते.मातृ दिनी अशा नरदेही दैवी मानवांना शतदा वंदन करावे.
#अशांसाठी जागतिक मातृ दिन आहे.


मातृ भाव म्हणजे निर्मळ हास्य व निस्वार्थ माया.दया दातृत्वाचा किनारा नसलेला सागर म्हणजे वात्सल्य सिंधू सागर आई.अपार मायेचे दृश्य स्वरूप म्हणजे आई.लाभाच्या अंशाचा लवलेशही मनी न ठेवता,डोळ्यात वात्सल्य व उरात काळजीच्या लाटा पेलाव्यात ;त्या फक्त मातेनेच.माता ही शिल्पकार म्हणून श्रेष्ठ आहेच,पण त्याहीपेक्षा ती उत्कृष्ट व्यवस्थापक व नियंत्रक सुद्धा असते.गर्भारपणात जपलेल्या जीवाशी तिची नाळ कधीच तुटत नाही.मातेलाला माता हेच उपमान आहे.तिच्यासारखी तिच अन्य नाही कोणी.

माझ्या आयुष्याची जडणघडण होताना आईच्या ममतेने मायाममता ,वात्सल्य ,प्रेम ,सहकार्य , देणाऱ्या माझ्या रक्तबंधनातील सर्व आप्तांचा ,आई,चुलती ,आत्या इतर आप्तगण ,संसार रथाची भागिदार पत्नी ,मुली,समाजसेवी आदर्श कृपाछत्री गण,सुखदुःखातले वाटेकरी मित्र-मैत्रीणी,व्यावसायिक सहकारी,गुरूजन ,विद्यार्थी,सेवाभावी क्लबचा परिवार ,पाहिलेले, न पाहिलेले असे  सकल मानवजन या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.अशांचा सन्मान करण्यासाठी जागतिक मातृ दिन आहे.

आपणा सर्वांस #जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

कचरू सूर्यभान चांभारे बीड

9421384434 kacharuchambhare@gmail.com

14 thoughts on “जागतिक मातृ दिन मे 2024”

  1. लेकरांच्या जीवनातील पहिलं नातं म्हणजे आई….निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक म्हणजे आई.

    Reply
  2. आई माझी मायेचा सागर
    दिला तिने जिवनास आकार
    सर खरोखरच आई आई असते.
    अप्रतिम लेख

    Reply
  3. लेकुराचे हित ,वाहे माऊलिचे चित्त |
    ऐसी कळवळ्याची जाती,करी लाभाविणे प्रिती ||
    निवार्थी प्रेम आईशिवाय कोणी – कोणीच देऊ शकत नाही

    Reply
  4. सर. आपल्या लेखनातून क्षणोक्षणी मातृ प्रेमाची आठवण होते.भारत स्वातंत्र्य नंतरची आई ही हिंदी सिनेमा मदर इंडिया च होती.स्वतः संघर्ष करून स्लम एरिया त राहून आम्हा भावंडाना उच्च शिक्षित (डॉक्टर, इंजिनियर,वनाधिकारी) असे घडविले.इमानदार अन् मिळालेल्या पागरतच जगविणे शिकविले.अभिमान आहे मला माझ्या आईचा.
    सरांच्या लेखनात क्षणोक्षणी आईची आठवण येते. अप्रतिम संग्रहित करण्यास लेख.
    यास आपणास खूप खूप अभिनंदन सह शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment