पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला की पंढरीचा विठोबा व रायरीचा शिवबा आपल्या नसानसात उतरतात. शिवबाचं देवपण हे आहे की ,त्यांनी मानवी देहाने,मानवी देहाच्या मर्यादेत राहून अचाट, अकल्पित,अफाट, अचंबित करणारा दैवी पराक्रम केला आहे.हे रयतेचं स्वराज्य निर्माण करताना जीवाभावाच्या अनेक माणसांनी छत्रपतींसाठी बलिदान दिले.
निढळ,अढळ स्वामी निष्ठेचे एक उदाहरण म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. 13 जुलै म्हणजे आजच्याच दिनी पण 1660 साली घोडखिंड लढवताना बाजीने स्व बलिदानाने ती घोडखिंड पावनखिंड केली.
आज असणारा टीव्ही मिडिया,वार्ताहार त्याकाळी असते तर पन्हाळा ते घोडखिंडीची पावनखिंड , बाजींचे बलिदान मिडियाने कसे वार्तांकित केले असते ? सत्य घटनेवर आधारित माझे काल्पनिक लेखन.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
टीव्ही चॅनल कुस सह्याद्रीची
निवेदक जिजाबा पांढरे
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै तारीख 10 जुलै 1660.
कुस सह्याद्रीची दर्शकांना नमस्कार.मी जिजाबा पांढरे .कुस सह्याद्रीची स्टुडिओतून आपणांसी बोलतो आहे.साऱ्या महाराष्ट्र मुलखाचे लक्ष पन्हाळागडाकडे लागून राहिले आहे.कारणही तितकंच लक्षवेधी,चित्तवेधी आहे. सह्याद्रीतील उदयोन्मुख नरकेसरी ,मावळखोऱ्यातील रयतेच्या काळजाचा तुकडा शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यात चार पाच महिन्यांपासून सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले आहेत.
हे शिवाजीराजे कोण ? आता जनतेला सांगायची गरज नाही.त्यांनीच स्वतःची ओळख,दरारा निर्माण केला आहे.मागच्याचवर्षी त्यांनी आदिलशहाचा बलाढ्य सरदार अफजलखानास धुळीस मिळविले आहे. अफजलखानाला गर्दीस मिळवून शिवाजी हे नाव उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले आहे.राजं शिवाजी राजं शिवाजी या नावाचा जय घोष दक्षिणेत आदिलशाही व उत्तरेत औरंगजेब मोघल बादशहाच्या कानाला भेदून आसमंतात घुमत आहे.
प्रचलित युद्ध मार्ग न अवलंबिता शिवरायांनी वेगळाच मार्ग अनुसरत बलाढ्य खानास ठार केले व खानाच्या प्रचंड फौजेचा निकाल लावला.एवढा मोठा पराक्रम करून शिवाजीराजांनी विश्रांती न घेता कोकण, कोल्हापूर,अथनी,मिरज या भागात तडक धडक मारून तो आदिलशाही मुलुख उगवत्या स्वराज्यात सामील केला आहे.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
मार्च महिन्यापासून सामान्य रयतेचा असामान्य राजा पन्हाळा किल्ल्यात अडकून पडला आहे.
यावेळी राजगडावर काय परिस्थिती आहे.? आपण जाणून घेऊ या .तिथं आपली प्रतिनिधी हौसाअक्का आपल्याशी जोडली जात आहे.
बोल हौसाक्का,राजगडावर काय परिस्थिती आहे?
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
हौसाक्का : हं ,जिजाबा मी बोलतेय , हौसाक्का कुस सह्याद्रीची प्रतिनिधी .थेट राजगडावरून.राजमाता जिजाऊ आऊसाहेब, स्वराज्य कारभारी सर्व जण चिंतेत जरूर आहेत पण भयभीत नाहीत.सिद्दी जौहरचं संकट कठीण असलं तरी अफजलखानासारखं अक्राळविक्राळ,राक्षसी नाही. खुद्द शिवरायांच्या मातोश्री जिजाऊसाहेब म्हणजे कोणी सामान्य स्त्री नव्हे.सासर माहेरकडून वीरतेचा वारसा असणारा ती मुत्सद्दी व तलवार निपुण शूर वीरता आहे.नेतोजी पालकरांना सूचना देत त्यांनी सिद्दीच्या वेढ्यावर अनेकवेळा हल्ला केला आहे.पण अजून वेढा उठला नाही व शिवाजीराजेंची सुटका होऊ शकली नाही.
धन्यवाद जिजाबा.अजून काही अपडेट हाती आले की मी बोलेन तुझ्याशी
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
जिजाबा पांढरे: धन्यवाद हौसाक्का.आताच आपण हौसाक्काकडून राजगडावरील मजबुत मनसुबे ऐकले आहेत.राजगड चिंतेत आहे पण भयभीत नाही.हे मराठी मनाच्या निर्भयतेचे आभुषण आहे.आपण थोडं विजापूरकडे जाऊ.तिथं काय परिस्थिती आहे ? जाणून घेऊ या.
रशिदा बोल, विजापूर काय म्हणतंय ? कुस सह्याद्रीची दर्शक तुला ऐकण्यास उत्सुक आहेत.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/ 13 जुलै
रशिदा: कुस सह्याद्रीची दर्शक हो नमस्कार.मी रशिदा थेट विजापूरहून तुमच्याशी बोलतेय.
दक्षिणेतील आदिलशाही व उत्तरेतील मोगलाई यांच्या मधोमध स्वाभिमानी स्वराज्याचे बेट उदयाला येणं दोन्ही साम्राज्यास नकोच आहे.दोघांकडूनही नुकतंच बाळसं धरत असलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून मागच्याचवर्षी आदिलशाहीने आपला बडा सुरमा सरदार अफजलखानास शिवाजीराजेंचा बिमोड करण्यास पाठविले होते.
राजा शिवाजी व स्वराज्य यांचा बंदोबस्त करूनच अफजलखान परतेल असा बडी बेगमचा व्होरा होता पण तरूणतुर्क शिवाजीराजेंनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून आदिलशाहीचीच बेअब्रू केली आहे.शिवाजीराजे व स्वराज्य यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता सिद्दी जौहरला पाठवले आहे.सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्याभोवती वेढा कडक करत शिवरायांना तिथं अडकवून ठेवलं आहे.सध्यातरी आदिलशाहीची सरशी दिसत असली तरी लढाईचा अंतिम निकाल येईपर्यंत आदिलशाही निवांत श्वास घेऊ शकत नाही.अफजलखानाच्या अनपेक्षित पराभवामुळे आदिलशाहीचे झाडून सारे सरदार मनातून भयभीत झाले आहेत.
राजधानी विजापुरात कानावर काही काही येत आहे.
सिद्दी जौहर हा कसलेला व मुरब्बी सेनानी,कर्नुल प्रांताचा स्वतंत्र सुभेदार आहे.सध्यातरी विजापूरकरांचे लक्ष पन्हाळागडाकडे लागून राहिले आहे.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/ 13 जुलै
जिजाबा पांढरे: ही होती रशिदा,जिला आपण ऐकलं आहे.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
थांबा थांबा ,जस्ट एक ब्रेकिंग न्यूज सिद्दी जौहरच्या वेढ्यातून येत आहे.तिथून आपल्याशी मुर्तुजा बोलत आहे.बोल मुर्तुजा ,काय सांगशील आपल्या कुस सह्याद्रीची दर्शकांना ?
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/ 13 जुलै
मुर्तुजा: अत्यंतिक गोपनीय सूत्रानुसार अचंबित करणारी,विस्मयी खबर पुढे येत आहे.शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यातून निसटून जाण्याच्या तयारीत आहेत. शिवराय हे तरूणतुर्क व अकल्पित युद्ध डावासाठी आता ओळखले जाऊ लागले आहेत.त्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे ते या कानाची खबर त्या कानाला लागू देत नाहीत.काय होईल,कसं होईल? काहीच सांगता येत नाही.
आदिलशाही व स्वराज्य दोन्ही पक्ष चिंतेत आहेत.विजापूरकर आदिलशाही चिंतेत असण्याचे कारण म्हणजे मराठा साम्राज्याचा नवा नेता शिवाजीराजे वेढ्यात अडकले असले तरी ते अजून सिद्दीच्या तावडीत सापडलेले नाहीत. इकडे राजगड व स्वराज्य रयत चिंतेत आहे कारण मराठी मनात स्वाभिमानाची जान फुंकणारा जॉंबाज युवा प्रत्यक्षात सिद्दीच्या हाती लागला नसला तरी तो अजून पूर्णतः सुटलेला नाही.एक मात्र खरे की अफजलखानावरील सरशीमुळे सामान्य रयतेस शिवाजीराजे निसटून येतीलच.हा भरवसा आहे.बाकी उत्तर काळच देईल.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै. तारीख 13 जुलै
आत्ताची या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/ 13 जुलै
अखेर शिवराय पन्हाळागडावरून निसटलेच. हे कसं झालं? आपण जाणून घेणार आहोत आमची धाडसी युद्ध वार्ता प्रतिनिधी बाणाई मल्हार यांच्याकडून.
हं बाणाई बोल ,सारा महाराष्ट्र, दक्षिण,उत्तर हिंदुस्थान,परकीय व्यापारी सर्व जण कुस सह्याद्रीची माध्यमातून कालचा व आजचा घटनाक्रम ऐकण्यास उत्सुक आहेत.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
बाणाई मल्हार: हं ,जिजाबा,
अकल्पित विजयाची,घनघोर लढाईची मी स्वतः साक्षीदार आहे.असा रोमांचकारी प्रसंग माझ्या आयुष्यात पुन्हा घडेल की नाही सांगता येत नाही.पण एक सांगते.काल व आज जे घडले ते कधीच कुणी कल्पिले नसेल अन् नवख्या तेजतर्रार शिवरायांचे हेच खास वैशिष्ट्ये आहे.ते मनाचा व डावपेचाचा कुणालाच थांगपत्ता लागू देत नाहीत.त्यांचे म्होरके व जीवलग साथीदार यांच्यात काही संकेतातून बातमी पुढे सरकत जाते व डावपेचाची अंमलबजावणी होते.
आपणांस माहीत आहेच की ,गेल्या चार पाच महिन्यांपासून शिवराय पन्हाळा किल्ल्यात अडकून पडले होते.कुणी म्हणतं की सिद्दीने वेढा खूप आवळला तर कुणी म्हणतं की शिवाजीराजेने जाणीवपूर्वक वेढा पावसाळ्यापर्यंत लांबणीवर टाकण्यास भाग पाडले.सिद्दीस गोड गोड बोलून,शरण येतो असा निरोप देऊन कालच्या बारा तारखेच्या रात्रीपर्यंत सिद्दीस गाफिल ठेवले.काल तर शिवरायांनी कहरच केला.आजच बोलणीला येत असल्याची बतावणी करत सिद्दीला आनंदात बेहोश ठेवले.शिवाजीराजे निसटून गेल्याचे कळल्यावरच त्याला होश आला.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
हं ,ऐकतोस ना जिजाबा,हे काही एकाएकी घडलं नाही.यामागे शिवरायांचे व त्यांच्या निस्सिम स्वामीनिष्ठ मावळ्यांचे कठोर परिश्रम आहेत.बहिर्जी नाईक व गुप्तहेर पथकाने ठरवून दिलेल्या वाटेने मसाई पठार,खोतवाडी,करपेवाडी, धनगरवाडी मार्गे शिवराय पडत्या पावसात गडावरून निसटले.रपरप पडणाऱ्या पावसाच्या आवाजात व शिवाजी भेटीला येतोय या खुळ्या खुशीच्या नादात सिद्दीला ही खबर लागलीच नाही.
त्यातही शिवरायांचे मावळे म्हणजे कट्टर स्वामीनिष्ठ. सिद्दीला निर्गमनाची चाहूल लागू नये व लागली तरी वेळ जाया होऊन शिवबास विशाळगडी पोहचता यावे म्हणून एका भुलीच्या पालखीत शिवा काशीदला बसविले होते.खरा शिवाजी पुढे गेलाय ,हे सिद्दीला कळेपर्यंत बराच वेळ जाया गेला होता.सिद्दी आधीच संतापात होता अन् असली नकली शिवाजीच्या राड्यात तो कमालीचा चिडला होता.या चिडलेल्या थयथयाटाने शिवा काशीदला वीरमरण मिळाले.पण सिद्दीस हे ठाऊक नाही की मराठी अस्मितेचा नवकिरण शिवबासाठी शिवानंतर बाजी झुंजणार आहे.
रात्रभर किर्र अंधारात,भर मुसळधार पावसात,दगडधोंड्यात , दरी खोऱ्यात धाव धाव धावणाऱ्या मावळ्यांची लढाई अजून संपलेली नव्हती.उलट एक अमिट पराक्रमाची गाथा लिहिली जाणार होती.
गजापूरच्या घोडखिंडीजवळ सकाळच्या पहिल्या प्रहरी शिवाजीराजे, बाजीप्रभू,बंधु फुलाजी व बांदलसेना,मावळे पोहचले . इकडे चिडलेल्या सिद्दीला शिवाजी गमावणं म्हणजे काय गमवलंय याची कल्पना करता येत नव्हती.शिवाजीराजेंना पकडून देऊनच त्याच्याबद्दल विजापूर दरबारी असणारी कटुता मिटणार होती.शिवरायांच्या जाण्याने सिद्दीची मती चक्राकार गुंग झाली होती.त्याचा जावई मसुद शिवरायांच्या पाठोपाठ धावत होता.प्रसंग मोठा बाका होता.नव्या दमाच्या मसुदच्या मोठ्या फौजेला अंगावर घेणं म्हणजे स्वराज्यावरील संकट गडद करण्यासारखं होतं.मावळे रात्रभर ऊर फुटेपर्यंत धाव धाव धावले होते.पावसा पाण्याची,वाहत्या धारेची,दगडगोट्यांची,विंचूकाटा साप,उपाशी पोट अशा कशाचीच पर्वा न करता ते आपल्या मनातल्या, रयतेच्या मनातल्या भावी सार्वभौम राजासाठी धाव धाव धावली होती व संकट पूर्ण टळेपर्यंत हे धावणं टळणारच नव्हतं.प्रसंग बाका,निष्ठेची पराकाष्ठा पाहणारा होता.पोशिंद्यासाठी बाजीप्रभू पुढे झाले.तीनशे मावळ्यानिशी बाजीप्रभू स्वतः घोडखिंडीत मसुदचा सामना करण्यासाठी थांबले व शिवराय उर्वरित बांदल सेनेसह विशाळगडाकडे झेपावले.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12 / 13 जुलै
दगडधोंडे,धनुष्यबाण,गुलेल,गोफणचा वापर करत,हर हर महादेव गर्जना करत,हाणा मारा तुटुन पडा असा गजर करत बाजी व बाजींचे मावळे बाजी लावून मसुदला अडवत होते.क्षणभर पाऊसवाऱ्यानेही स्तिमित व्हावं व हा घनघोर संग्राम पाहावा असं ते दृश्य होतं.मावळ्यांनी फेकलेले दगड,बाण आदिलशाही सैनिकांचा अचूक वेध घेत दगडगोट्यांच्या राशीत मुडद्यांची रास वाढवत होते.मसुदने सैनिकांच्या तुकड्या केल्या होत्या.दमलेली,जखमी झालेली तुकडी मागे हटताच नव्या दमाची तुकडी पुढे सरकत होती.बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची तुकडी तीच असली तरी तीच तुकडी नवा त्वेष,नवा दम घेऊन मसुदच्या फौजेवर तुटून पडत होती.एक एक मावळा धारातीर्थी पडत होता पण बाजी हटत नव्हते.
तिकडे विशाळगडाभोवतीचा सुर्वे,सावंतचा वेढा तोडून शिवराय विशाळगडावर सायंकाळी पोहचले.ईशारतीची तोफ होताच ईकडे बाजीप्रभूंनी शरीरात राखून ठेवलेला प्राण सोडला.
ही लढाई होती प्रखर स्वामी निष्ठेची, असामान्य समर्पणाची.
जिजाबा पांढरे: धन्यवाद बाणाई,तू आम्हाला रणभूमीवर घडलेला प्रसंग सांगितला.
शिवाजीराजे लवकरच विशाळगडावरून राजगडावर जाणार आहेत.वाटेत ते बाजीप्रभूंच्या गावी जाऊन बांदलवीरमाता दीपाईची भेट घेणार आहेत.
स्वराज निर्माण होताना पुढेही लढाया होतील पण बाजींच्या बाजी लावलेल्या प्राणसमर्पण लढाईला ही समरभूमी,हे शिव स्वराज्य कधीच विसरणार नाही.
पावनखिंड थरार रात्र थरार दिन 12/13 जुलै
कचरू सूर्यभान चांभारे बीड
9421384434
kacharu chambhare.com
धन्य तो बाजी धन्य स्वामीनिष्ठा
रोमांचकारी हुबेहूब शब्दांकन 💐
धन्यवाद सर
अरे बापरे! काय तो थरार, काय ती उत्कंठा, आणि काय तो रम्य कल्पनाविलास! अप्रतिम ! प्रतिभेची उत्तुंग भरारी आणि शिवरायांवरील प्रेम यांनी ओथंबलेले अनोखे news channel!👌👌👌💐💐
मनःपूर्वक धन्यवाद ताई
Nice
धन्यवाद सर जी
खुप छान..
तीनशे वर्षाचा इतिहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बातमीच्या माध्यमातून वाचतांना वेगळाच अनुभव मिळाला.
आपल्या लेखन शैलीस सलाम.💐💐