जागतिक पितृ दिन 16 जून 2024
झिजत झिजत झुंजतो बाप ,राखी कुटुंबाची लाज, दमलेल्या बापाची कहाणी ऐक रे मुला !
जागतिक पितृ दिन 16 जून 2024
झिजत झिजत झुंजतो बाप ,राखी कुटुंबाची लाज, दमलेल्या बापाची कहाणी ऐक रे मुला !
जागतिक पितृ दिन 16 जून 2024
जागतिक पितृ दिन 16 जून 2024 जून महिन्याचा तिसरा रविवार जागतिक पातळीवर सर्वत्र नव्हे पण संख्येने सर्वाधिक देशात पितृ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.अमेरिका,इंग्लड ,जपान,सिंगापूर,फ्रान्स इत्यादी देशात तो आज आहे.रोमालियात मे चा दुसरा रविवार तर तैवान मध्ये आठ ऑगस्ट थायलंड 5 सप्टेंबर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये सप्टेंबरचा पहिला रविवार पितृदिन म्हणून साजरा करण्यात येतो.पित्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
आपल्या भारतात अनुकरण म्हणून अमेरिका इंग्लंडप्रमाणे आपण जूनचा तिसरा रविवारच पितृदिन म्हणून साजरा करतो.सांस्कृतिक व पारंपरिक दृष्टीने भारतातला पिता , बाप म्हणून सदैव सोबतच असतो.बापाच्या मृत्यूनंतरही पितृपक्षात तो पुन्हा पुन्हा अवतरतो.कुटुंब व्यवस्थेत व सामाजिक व्यवस्थेत माता पिता यांना भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान आहे.पाश्चात्यांचे अनुकरण असले तरी संसारगाड्याने दमविलेल्या पित्याबद्दल ऋण व्यक्त करणं उचितच आहे.म्हणून आजचा जागतिक पितृ दिन आहे.
जागतिक पितृ दिन साजरा करण्याचा जन्म कसा झाला ? याची कथा अत्यंतिक शोकांतिक व भयंकर दर्दनाक आहे.1907 साली अमेरिकेतील पश्चिम वर्जीनिया प्रांतातील फेअरमोंट शहरी एका खाणीत झालेल्या दुर्घटनेत तब्बल 361 खाण कामगारांचा मृत्यू झाला होता.या दुर्दैवी मृत कामगारांपैकी सुमारे 250 कामगार असे होते की जे लहान लहान मुलांचे बाप होते.नियतीने एकाच फटकाऱ्यात हजारो मुलांना अनाथ केले व शेकडो माता भगिनींना वैधव्य दिले.मृत्यू पावलेले बाप हे त्यांच्या मातापित्यांसाठी लेकरंच होती.त्यामुळे शेकड्याने वृद्ध मायबापही पोरकी झाली .हजारोंच्या आक्रोशाने धरणीलाही कंप फुटावा,धरणीमाता दुभंगावी व आकाश फाटावं असं ते दुःख होतं.दुःखाचा हा डोंगर विसरणं फेअरमोंट शहराला कदापिही शक्य नव्हतं.या दुःखद घटनेची स्मृति म्हणून ग्रेस गोल्डन क्लेंटन यांनी दरवर्षी सामुदायिक श्रदांजली कार्यक्रम घ्यायला सुरूवात केली .
जागतिक पितृ दिन 16 जून 2024
दुर्दैवी पित्यांची स्मृति म्हणून सार्वजनिक श्रदांजली कार्यक्रम प्रांताप्रांतून अमेरिका खंडात व इंग्रजी राजवटीमुळे जगभरात सुरु झाले.ग्रेस गोल्डन यांना सोनोरा डोड या समाजसेविकेचीही साथ लाभली होती.ही डोडा अशी व्यक्ती होती की जिच्या वडिलांनी पत्नी वियोगानंतर डोडासह सहा भावंडाचे संगोपन केले होते.पित्याप्रती ती प्रचंड कृतज्ञ होती.1930 च्या आसपास या दिनाचे रुपांतर जागतिक पितृ दिनात झाले.दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या श्रदांजली सभेत काल ओघात वुड्रो विल्सन ,लिंडन जॉनसन ,कुलिज अशा राष्ट्राध्यक्षांची भाषणे झाली.त्यामुळे या दिनाला आपोआप राजसत्तेचे अधिष्ठान प्राप्त झाले आणि हा दिन कायद्याने सर्वसंमत झाला.अशी झाली पितृदिनाची निर्मिती.दक्षिण कोरिया व आणखी काही देशांत आज जागतिक पितृ दिनाची सार्वजनिक सुट्टी असते.
भारतात मात्र मातापिता यांना देवादिकांच्या बरोबरीचे स्थान आहे.पितृसत्ताक पद्धतीत पित्याचे स्थान वरच्या श्रेणीत असले तरी भावनिक दृष्टीने आईला जेवढं सहज जवळतेचं स्थान आहे तेवढं वडील नावाच्या पोशिंद्यास मात्र नाही.आजचा पिता व मागील काही पिढ्यातला पिता यांमध्ये खूप फरक पडला आहे.मुलानं तोंड उघडायची जागा म्हणजे आई व मुलाचं तोंड बंद व्हायची जागा म्हणजे बाप.असं समीकरण खूप मोठ्या कालखंडापासून अखंड चालत आलेलं आहे.पिता व वडील ही बापासाठी समानअर्थी शब्द योजना असली तरी बाप या शब्दाचा गर्भित अर्थ पिता व वडील या शब्दछटेत सापडत नाही.बाप तो बापच.काळाच्या ओघात खडक विरघळावा तसा बाप हळूहळू विरघळतो आहे पण पारंपारिक पाषाणखुणा अजून काही जात नाहीत.बाप भावनेकडे करारीपणाचे पेटंट अजूनही आहे.
पूर्वीच्या काळी उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट उपसावे लागत असत.शेती ,कारखानदारी ,नोकरी या निमित्तानं पुरुषवर्गास पर्यायाने बापमंडळीस जास्त काळ बाहेरच राहावं लागत असे.साहजिकच बाळास आईचा सहवास जास्त काळ मिळतो.बाळाचा हा काळ शिकण्याचा ,अनुकरणाचा असल्यामुळे बाळावर साहजिकच आईचा प्रभाव जास्त पडतो.त्यामुळे प्रेमरस पाजणारी व चिऊकाऊच्या नावाने घास भरवणारी आई सर्वांनाच आपोआप प्रिय होते.दिवसभराचं भरवणं ,करणं नजरेत असल्यामुळे आई खूप आवडते.पण दिनभराच्या भरवणीसाठीचं पित्याचं महिनोनमहिने वर्षानुवर्ष खपणं दुर्लक्षित होतं.बाळाच्या वाढीच्या काळात खेळताना ,शिकताना काही चुकलं की थांब येऊ दे बाबाला, या महिला वर्गाकडील पिढ्यानपिढ्याच्या धमकीने आईच्या गळ्यात पडून तिच्या केसांना लाडिवाळपणे खेळणारी मुले पित्याच्या छातीवरील केसासोबत खेळलीच नाहीत.आईच्या कडेवर बसणं हे लेकराचं अढळ धृवीय स्थान असल्यामुळे बापाच्या कडेवर लेकरू हे सिंहासन उदयास आले नाही व आलं तरी ते तितकं रूजलं नाही.पित्याचं करारीपण नेहमीच दिसलं पण दिसलं नाही कधी काळ्या पाषाणात दडलेलं मायासागराचं गोड तीर्थ.
जागतिक पितृ दिन 16 जून 2024
घराचे मांगल्य आई असते तर बाप हा घराचे अस्तित्व असतो.पुराण कथेतील पिता ते आजही मुलांबाळांसाठी झगडणारा पिता पाहिला की एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पित्याची वेशभूषा ,पेहराव बदलला असेल पण पितृत्व भावनेची जबाबदारी ,काळजी आजही तशीच आहे.गतिमान आधुनिक जीवन काळात आणखी एक ठळक बदल आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पूर्वीचे कडक ,कठीण बाप आता पहिल्या पावसात भिजलेल्या मातीच्या ढेकळावानी मऊ झालेत.पूर्वीच्या काळी मुलं आडदांडपणा करू लागली की त्यांना वडीलांना नाव सांगण्याची धमकी मिळायची.मुले त्या धमकीने गप्पगार पडायची.आताची मुले उलट पिता येण्याची वाट पाहत असतो.धोतर ,पांढरा लांब भायाचा गुडघ्यापर्यंतचा सदरा (नेहरु शर्ट),डोक्याला फेटा किंवा टोपी हा आपल्याकडील पारंपारिक पोषाख .पण आता धोतराची जागा पँटने घेतली,शर्टही शॉर्ट झाले व डोक्यावरील कापडी झाकण तर जवळपास कालबाह्यच झाले आहे. बाप नावाचा पोषाख बदलला असेल पण बाप नावाचे काळीज नाही बदलले.
प्रसिध्द कवी इंद्रजीत भालेरावांची माझा बाप नावाची कविता प्रत्येकाला आपल्याच बापाची जीवनकहानी वाटते तर दमलेल्या बाबाची कहानी चित्रपट स्वतःसोबतच घडल्यासारखा वाटतो.
आजचा बाप कुटुंबासाठी दररोजचा अर्जून होऊन रोजच लढतो आहे.महाभारतातल्या अर्जूनाचे कुरूक्षेत्र थांबले आहे पण बाप नावाचा अर्जून कुटुंबासाठी रोजच अर्जून होऊन लढतो आहे.बाप म्हणजे कुटुंबाचा ओझोन वायूच.ओझोनचा तर जसा माय पृथ्वीला विषारी किरणांपासून सुरक्षित ठेवतो तसं बाप ओझोन समाजातील वाईट प्रवृतींना कुटुंबाजवळ येऊ देत नाही.कुटुंबास संकटापासून व विखारी विकारांपासून तो रोखतो.पूर्वी बाप म्हणजे सर्वोच्च न्यायालय असे.आजी आजोबांकडे एखाद्या प्रकरणात अपील करता येत असे.पण आता आईला खंडपीठाचा दर्जा असल्यामुळे बापपणाला थोडी कात्री लागलीय.आजी आजोबांचे अधिकारही आणीबाणीत गोठीत झाले आहेत अन् अपील करण्याची मुभाच नाही कारण खंडपीठाच्या न्यायमूर्तीला सर्वोच्च न्यायालयावर भरवसा नाही.पण तरीही बाप काही औरच असतो.मुलांचे लाड पुरविण्याचा मक्ता आईकडून वडीलाकडे कधी आला ते आईला कळलेच नाही.मुलांनी बेभान होऊन बापाची वाट पाहणं हे बाप जन्माचं सार्थक आहे.
घराची सुंदरता जपते ती आई पण हे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी सतत झुंजतो तो बाप.दुःखाच्या कल्पनेने हादरते ती आई पण दुःख छाताडावर पेलून मनातलं आक्रंदन उरातच जिरवितो तो बाप.लेकीच्या काळजीने रोजच हळवी होते ती आई पण लेकीच्या कल्याणासाठी संपूर्ण हयात झिजवून विवाह मंडपी सगळं आवरल्यावर धायमोकलून रडतो तो बाप.भावनिक दृष्ट्या बापाच्या वाट्याला चार क्षण कमी येतात .पण बापाच्या कायम जाण्याणे आभाळ कोसळलं म्हणतात.हे एक वाक्य बापाचं स्थान सांगण्यास पुरेसं आहे.कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अपमान गिळण्याची ,कष्ट करण्याची तयारी बाप नावाची असते.लेकराबाळाच्या ,बायकोच्या डोळ्यातला अश्रू बिंदू बापासाठी सागरी तुफान असतो.अश्रूच निर्माण होऊ नये म्हणून तो कायम वादळवाटेने धावत असतो.कधी कधी हेच वादळ त्याला गिळतं.पेनाचं झाकण म्हणजे बाप,पाण्याच्या टाकीचं झाकण म्हणजे बाप,डब्यांची झाकणं म्हणजे बाप. ही झाकणं आकाराने छोटी असतात पण पेशाला, डब्याला उघडंपण येण्यापासून वाचवतात.झाकणं नसतील तर या वस्तू अडगळीत जातात.बाप हे कुटुंबाचं झाकणच आहे.झाकण खराब झालं ,वाकडंतिकडं झालं की त्याची आवरण मूल्यता संपते. तसंच बाप हे झाकण व्यसनानं ,विकृतीनं बिघडलं की कुटुंबाला कीडेमुंग्या लागायला वेळ लागत नाही.
विभक्त कुटुंब पद्धती व अर्थाला लाभलेला उच्चकोटीचा भाव ,अर्थकारणावरच आधारलेली शिक्षण पद्धती, जीवन पद्धती यांमुळे आजचा बाबा खूप दमलाय.धावपळीमुळे त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही.संगोपनाच्या भाराने बाप आता झुकलाय.दमलेल्या बाबाची कहानी सगळ्या मुलामुलींनी समजून घ्यायला हवी.बापाला मायेनं गोंजारलं,ममतेचे चार शब्द खर्च केले तर दमलेला बाप नव्या उमेदीने उठून उभा राहील.अनेक कथा कादंबरीतून, चित्रपटातून बाप अधोरेखित केला आहे. कवितेतही आता बाप सापडत आहे .
डोंगराएवढ्या आभाळमायेच्या बाप भावनेला जागतिक पितृ दिनी सलाम करावा वाटतो.
कचरू सूर्यभान चांभारे
मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड
9421384434
kacharuchambhare.com
Remarkable writing 💐
धन्यवाद सर
सर…आपला पितृ दिनानिमित्त लेख वाचून वडिलांची आठवण झाली.. त्या काळात त्यांनी रेल्वेत 4श्रेणी नोकरी करून बाकी वेळेत शेत मजुरी, बैलगाडी ने विटा माती रेती वाहतूक करून शेती घेतली.. आम्हा भावंडाना लहानपना पासून शेत मजुरी करायला लावायचे.स्लम एरिया मद्ये राहायचो. एक भाऊ पशू वैद्यकीय अधिकारी,मी वन विभागात, तिसरा रेल्वेत उच्च पदावर इंजिनियर… वडिलांची शिस्त मद्ये घडलो.. सरांनी आज आम्हा सर्वांना वडिलांची आठवण करून दिली आहे. यास आपले अभिनंदन…
मनःपूर्वक धन्यवाद काका
सर्वसमावेशक भावस्पर्शी शब्दांकन..
मनःपूर्वक धन्यवाद दादा
खूप छान मांडणी.
बापाच्या कायम जाण्याणे आभाळ कोसळलं म्हणतात.हे एक वाक्य बापाचं स्थान सांगण्यास पुरेसं आहे
.पेनाचं झाकण म्हणजे बाप,पाण्याच्या टाकीचं झाकण म्हणजे बाप,डब्यांची झाकणं म्हणजे बाप. ही झाकणं आकाराने छोटी असतात पण पेशाला, डब्याला उघडंपण येण्यापासून वाचवतात.झाकणं नसतील तर या वस्तू अडगळीत जातात.बाप हे कुटुंबाचं झाकणच आहे.झाकण खराब झालं ,वाकडंतिकडं झालं की त्याची आवरण मूल्यता संपते. तसंच बाप हे झाकण व्यसनानं ,विकृतीनं बिघडलं की कुटुंबाला कीडेमुंग्या लागायला वेळ लागत नाही. वडिलांची जागा या वाक्यातून खऱ्या अर्थाने कळते.
बाप तो बाप होता है
सरजी अत्यंत ह्रदय स्पर्शी लेख..
धन्यवाद दोस्त
खूपच मार्मिक व हृदय स्पर्शी लेख ………
मनःपूर्वक धन्यवाद सर जी
धन्यवाद सर जी
खूपच छान लेखन
धन्यवाद नेते
अत्यंत उत्कृष्ट लेखन.खरंय..बाप तो बाप असतो..!!!
मनस्वी धन्यवाद
, thanks dear friend
अज़ीज़ तर मुझे रखता है वोह रग-ए- जान से,
ये बात सच है के मेरा बाप कम नहीं है मेरी माँ से,
वो माँ के कहने पे कुछ रौब मुझ पर रखता है,
यही वजह है के वो मुझे चूमते हुए झिझकता है,
वो आशना रहा मेरे कर्ब से हर दम,
वो खुल के रो नही पाया मगर सिसकता है,
जुड़ी है उसकी हर एक हां मेरी हां से,
ये बात सच है के मेरा बाप कम नहीं है मेरी माँ से।
हर एक दर्द वो चुपचाप खुद पे सहता है,
तमाम उम्र सिवाय मेरे वो अपनों से कट के रहता है,
वो लौटता है कहीं रात को देर गए दिन भर,
वजूद उसका पसीने में ढल कर बहता है,
गिले रहते है फिर भी मुझे ऐसे चाके दामां से,
ये बात सच है के मेरा बाप कम नहीं है मेरी माँ से।
पुराना सूट वो पहनता है,कम वो खाता है,
मगर खिलौने मेरे सब वो खरीद लाता है,
वो मुझको सोए हुए देखता है जी भर के,
न जाने सोच के क्या क्या वो मुस्कुराता है,
मेरे बगैर है सब ख्वाब उसके वीरां से,
ये बात सच है के मेरा बाप कम नहीं है मेरी माँ से।
मनस्वी धन्यवाद, खूप छान अभिप्राय
दमलेल्या बाबाची कहाणी मुलांनी कायम स्मरणात देवावी.
मनःपूर्वक धन्यवाद दादा
सर लेख खूपच विस्तृत छान आहे
मनःपूर्वक धन्यवाद
Very nice
खूप छान भावस्पर्शी लेखन याक्षणी वडिलांची आठवण आली.
मनःपूर्वक धन्यवाद सर