राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2025

राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2025
विज्ञानयुगासाठी विज्ञान दिन
युवाशक्तीसाठी विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2025 . 28 फेब्रुवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.विज्ञान विषयी जनमानसात प्रचार प्रसार,शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन ,आपल्याच भूमीत संशोधक तयार व्हावेत .हा विज्ञान दिनाचा महत्वाचा उद्देश आहे.
दरवर्षी एक वैचारिक थीम घेऊन विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.यापूर्वी विज्ञान शिक्षणासाठी माहिती तंत्रज्ञान / टाकाऊ पासून टिकाऊ,जीवनाची रूपरेखा डीएनए/अपंगांसाठी विज्ञान,महिला विकासासाठी विज्ञान, युवाशक्तीसाठी विज्ञान अशा वेगवेगळ्या थीमवर काम करण्यात आले आहे.

लोकांसाठी विज्ञान आहे ,असते आणि राहणारच याचे पुरावे शोधण्याची गरज नाही.ते आपण दैनंदिन जीवनात अनुभवतो आहोतच.विज्ञान हे मानवजातीसाठी वरदान ठरले आहे.अलीकडील काळात ज्ञानाचा आवाका प्रचंड गतीने वाढला आहे.विज्ञानाने आम्हाला खूप काही दिले आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2025
भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र या तीन मुख्य शाखेभोवती पिंगा घालणारं विज्ञान सूक्ष्मातिसूक्ष्म जीव कणापासून ते ग्रहगोलांच्या,परग्रहाच्याही खूप पलीकडे गेले आहे.बियॉंड दि लिमिट या शब्दाला ओलांडून कैक योजने पुढे जाण्याची ताकद विज्ञानात आहे.
हवामान ,कृषी,आरोग्य,लसीकरण ,यान प्रक्षेपण ,पानबुडी,सोनार- रडार,युद्ध सामुग्री,औषधे,सुधारित बीबियाणे,मृदा अभ्यास,कीटकनाशके,उद्योगधंदे,कारखाने ,दूरभाष साधने,दळणवळण ,भूपृष्ठ वाहतूक ,सागरी व हवाई वाहतूक ,विपूल वस्त्र प्रावरणे,दगडधोंडा चुना माती ते थेट आजची गगनचुंबी घरे,नदीवरील बंधारा ते थेट मोठी महाकाय धरणे,विद्युतनिर्मिती,पर्यावरण,संगणक युग,टेलिफोन मोबाईल क्रांती,रेडिओ टीव्ही,भूजपत्र लेखन ते छपाई लेखन , पाऊलवाट ते सिमेंट डांबरी रस्ते,वेगवान रहदारी अशा एक एक करता करता प्रत्येक गोष्टीत विज्ञान दडलेले आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2025
मानव युग व विज्ञान युग यांच्या वयाचा तुलनात्मक अभ्यास केला तर मानव हा लाखो वर्षापासून पृथ्वीवर आहे.विज्ञान हे अगदी अलीकडील आहे.पण त्याचा वेग ध्वनी प्रकाश वेगाच्या कैक पटीने जास्त असल्यामुळे गल्ली ते दिल्ली,खेडे ते शहर,दिल्ली ते लंडन,गोदावरी ते गंगा ,गंगा ते नाईल ,नाईल ते ॲमेझॉन,आशिया ते ध्रुव ,धरा ते अवकाश,अवकाश ते अंतराळ असं सारंच आज विज्ञानाने व्यापून टाकलं आहे.
श्रद्धा अंधश्रद्धेचा लपंडाव असलेल्या आपल्या देशात विज्ञान रूजण्याचा वेग तसा मंदच आहे.पण तरीही वेगवेगळे जातधर्म प्रवाह सांभाळून,रूढीपरंपरांना फार मोठा छेद न देता,अब्जावधी लोकसंख्येचे ओझं पेलून,निरक्षरता शाप भोगून, आपल्या देशाने एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपण करण्यापर्यंतची मजल मारलेली आहे.ही प्रगती अचंबित करणारी आहे.कृषी,संगणक,उद्योग या क्षेत्रातील गरूडझेप कौतुकास्पद आहे.
विक्रम साराभाई,डॉ.होमी भाभा,मेघनाद साहा,सतिश धवन,डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम आझाद,जगदीशचंद्र बोस या महान शास्त्रज्ञांचे भारतीय विज्ञानातील योगदान अतुलनीय आहे.कारण ज्या काळात आपल्या देशात,राज्यात शाळेंमध्ये विज्ञान शिक्षणाचा प्रसार होण्याऐवजी विज्ञान शाप की वरदान अशा वादविवाद व निबंध स्पर्धा चर्चा झडत होत्या ;त्याकाळी ही मंडळी विज्ञानासाठी झटत होती.
राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 2025
आजच्या दिवशी विज्ञान दिन का साजरा करण्यात येतो? आपल्याकडे जास्तीत दिनविशेष हे महापुरुषांचे जन्म घटना किंवा मृत्यू घटना दिनाशी जुडलेले आहेत.विज्ञान दिन त्याला अपवाद आहे.विज्ञान दिन हा कोण्या शास्त्रज्ञाचा जन्म मृत्यू दिन नाही.तर हा दिवस भारताच्या विज्ञान इतिहासाचं सुवर्णपान आहे.कारण याच दिवशी भारताचे महान भौतिक शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामण यांनी प्रकाशाचे विकिरण अर्थात रमण ईफेक्ट हा शोध लिहून नेचर या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध केला होता.याच प्रबंधाला 1930 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषक मिळाले.
1901 पासून सुरू झालेले जगातले हे सर्वोच्च पारितोषक भारताच्या वाट्याला येण्याची ही पूर्णपणे दुसरीच व अंशातः तिसरी वेळ होती.सुप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर (1913) यांच्यानंतरचे हे दुसरेच नोबेल पण 1902 साली रोनॉल्ड रॉस या भारतीय डॉक्टरलाही हे पारितोषक मिळाले होते.रोनॉल्डचा जन्म व काहीकाळ शिक्षण भारतात झाले होते एवढाच त्यांचा व आपला संबंध.आता पर्यंतची नोबेल विजेती नऊजण लक्षात घेतली तर त्यामध्ये जन्म ते कारकीर्द किंवा आयुष्याचा मोठा काळ भारतात व्यतित केला अशी पाचच जण आहेत.परदेशात मादाम क्युरीसारख्या प्रख्यात वैज्ञानिक संशोधकाच्या घरात तीन तीन नोबेल जातात अन् अब्जावधी लोकसंख्येचा व विद्येचे प्राचीनत्व मिरवणारा भारत देश नोबेल बाबत कोसो दूर आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी.हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्रख्यात शास्त्रज्ञ ,विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे केंद्रिय सचिव ,स्व.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील विज्ञान सल्लागार, हवामान मॉडेल निर्माते ,पुणे निवासी डॉ.वसंत गोवारीकर यांनी 1987 पासून डॉ.सी.व्ही रामण यांचा रमण इफेक्ट प्रकाशित दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यास सुरूवात केली.
ग्रामीण भागातही गुणवत्ता ठासून ठासून भरलेली असते.त्यांना संधी मिळण्याची गरज असते.विज्ञान प्रदर्शन,इन्स्पाअर अवार्ड ही त्यासाठीच आहेत.मुलामुलांत दडलेली संशोधक वृत्ती ,प्रतिभा बनून अभिरूचीने बाहेर यावी.ही त्यामागची स्वप्नवत धारणा आहे.
खट्याळपणाला ,खोडकर वृत्तीला विधायक शक्तीत परावर्तित करण्याची शक्ती विज्ञानात आहे.मनोरंजनातून ज्ञान,प्रयोगातून सत्य सिद्धता या बाबी विज्ञानात येतात.पारंपारिक शालेय विषय म्हणून विज्ञान शिकणं व प्रयोगातून ,संशोधनातून मानवी समस्येवरील उपचार म्हणून विज्ञान शिकणं.या दोन्ही गोष्टीत खूप मोठा फरक आहे.ही फरकाची दरी जशी जशी कमी होत जाईल तसतसं शाळा या पाठशाळा न राहता संशोधकाची जननी ठरणाऱ्या कार्यशाळा ठरतील.विज्ञानाचे काही तोटेही जरूर आहेत पण इथं विज्ञान दोषी नाही.वापरकर्त्याचा अविवेक ,विकृती,तांत्रिक बिघाड,नैसर्गिक आपत्ती यांचा दुर्दैवी योग असतो.
रमण इफेक्टचा थेट इफेक्ट होऊन संशोधक,वैज्ञानिक व विज्ञाननिष्ठ समाज निर्माण होणं.हा खरा विज्ञान दिन आहे.
विज्ञान दिनाच्या निमित्ताने वैज्ञानिक यांचे चरित्र वाचन,वैज्ञानिकांचे लेखन,संशोधकांचे चरित्र व संशोधकांचे लेखन वाचले, चर्चा घडवून आणल्या तर त्यातून प्रेरणा घेऊन देशात बाल वैज्ञानिक, युवा वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत होईल.
विज्ञान तंत्रज्ञानात भारताचे नाव अजरामर करणाऱ्या तमाम शास्त्रज्ञ व विज्ञानप्रेमी जनतेस विनम्र अभिवादन.

कचरू चांभारे बीड 9421384434

विज्ञानाचे मानवी जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.विज्ञानामुळेच अज्ञान दूर होऊन ज्ञानप्राप्ती होते व प्रगतीचे मार्ग खुले होतात हे आपण पूर्वापार अनुभवत आलेले आहोत.मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचं अधिराज्य आहे.आजच्या घडीला तर विज्ञानाने सारी पृथ्वी काबीज केली असून मानवाने आकाशगंगेतील इतर ग्रहांवरही हळूहळू हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.
विज्ञानाचं महत्त्व विशद करणारा सुंदर लेख
अतिशय सुंदर अभिप्राय, मनातून आभार
अंतर्मुख करणारे हे लेखन.. खूप छान 👍
Thank you acharya
Very nice 💐
Thank you sir
बियॉंड दि लिमिट या शब्दाला ओलांडून कैक योजने पुढे जाण्याची ताकद विज्ञानात आहे. विज्ञानाची झपाट्याने होत असलेले प्रगती पाहता आणि AI झालेली क्रांती पाहता विज्ञान भविष्यासाठी शाप ठरू नये अशी भीती ही विज्ञान दिनाच्या निमित्ताने विचार करता वाटू लागली
….भरीव मार्गदर्शक लेखन…… सर
Thank you so much