आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

भांड्याचा 30 वा वाढदिवस
आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस
आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस. 
लहानपणी लग्नपत्रिका वाचत असताना जेष्ठ कन्या किंवा जेष्ठ पुत्र हा शब्द हमखास वाचनात यायचा.त्याचा अर्थ मला कळत नव्हता पण मी माझ्या परीने जेष्ठ महिन्यात जन्मलेले ते जेष्ठ असा त्याचा अर्थ लावला होता.द्वितिय /तृतीय चिरंजीव कन्या असे शब्द वाचण्यात आले व अशातच कोणाकडून तरी जेष्ठाचा खरा अर्थ कळाला.जेष्ठ म्हणजे थोरला ,जेष्ठ म्हणजे मोठा.पुढे नोकरीत आल्यावर जेष्ठ शब्दाशी जवळून नातं तयार झालं.नोकरी मग ती सरकारी असो वा खाजगी इथं जेष्ठत्व विचारात घेऊनच सारे सोपस्कर पार पडतात.बदली,पदोन्नती यांचे थेट नातं जेष्ठ शब्दाशी आहे.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

जेष्ठाचा मान मोठाच असतो.सजीवातील जेष्ठाचा महिमा काही औरच असला तरी मला आज माझ्या घरातील तीन जेष्ठ भांड्यांबद्दल लिहायचे आहे.ही तीनही भांडे विज्ञानाच्या कसोटीवर ठार निर्जीव आहेत.कारण वाढ,विकास,प्रजनन ,अन्नग्रहण,श्वसन,स्थलांतर या सजीवांच्या लक्षणात तिघांचाही प्रतिसाद शून्य आहे.त्यामुळे ते निर्जीवच.पण वैयक्तिक मला त्यांचे निर्जीवपण अजिबात मान्य नाही.कारण माझ्या लेखी ते सजीव आहेत.माझं आयुष्य साकारत असताना त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी मला बघितलंय.त्यांच्या जन्माचं वर्ष नमुद नसलं तरी माझ्या संगतीतलं त्यांचे आयुष्य आज सव्वीस ऑगस्ट रोजी बरोबर तीस वर्षाचे झाले आहे.


होय ,मी फोटोत दिसणाऱ्या एक हंडा,एक तांब्या व एक ग्लास यांच्याबद्दल बोलतोय.या तिघांचा सामुहिक 30 वा वाढदिवस आज आहे.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

भांड्याचा 30 वा वाढदिवस
आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस


1994 साली मी दहावी उत्तीर्ण झालो ती तारीख होती 24 जून .पण त्याच्या एक महिना आधी छत्रपती संभाजीनगर येथे जन्मभूमी जातेगावच्याच पण छत्रपती संभाजी नगरला कंपनीत कामास असलेल्या लहू देवकते यांचे लग्न होते.गावातून वऱ्हाडाचा एक टेंपो जाणार होता.लहू आमच्या गल्लीतलाच होता शिवाय लग्नाच्या निमित्तानं संभाजी नगर पाहायला मिळणार म्हणून मी वऱ्हाडात सामील झालो.माझा बालमित्र राजू पांढरे मला तिथं भेटणारच होता कारण तो आधीपासूनच तिथं आत्याकडे राहत होता.लहू हा राजूच्या गावातल्या आत्याचा मुलगा .वऱ्हाडाचा टेम्पो छत्रपती संभाजी नगरमधल्या टीव्ही सेंटर हडको भागात थांबला.सिडको हडको पहिल्यांदाच ऐकत होतो व छत्रपती संभाजी नगरही पहिल्यांदाच पाहत होतो.अपेक्षेप्रमाणे राजू टेम्पोची वाट पाहत उभाच होता.दहावीनंतर तो संभाजी नगरच्या आत्याकडेच राहत असल्यामुळे त्याच्या राहणीमानाचं शहरीकरण झालेलं होतं.सोळा वर्षे बालपण ते शाळकरी वय त्यांनं एका वर्षात पार बदलून टाकलेलं होतं.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस लग्न संध्याकाळचे होते त्यामुळे लग्नास अजून बराच अवकाश होता व राजूच्या मनातही मला संभाजी नगर शहर दाखवायचे होते.त्यामुळे त्याने त्याची सायकल काढली.मला डबलसिट बसवून छत्रपती संभाजी नगर शहरातलं औरंगपुरा,शहागंज,गुलमंडी,बिबी का मकबरा,पानचक्की,विद्यापीठ ,सरस्वती भुवन कॉलेज असं सारं फिरून आणलं.तोपर्यंत दिवे लागणीची वेळ झाली होती.संपूर्ण शहरातली विद्युत रोशनाई तारूण्य घेऊन लख्ख चमकत होती.वादळी पावसात गावाकडे विद्युत तारा तुटल्या की महिना महिना गाव अंधारात डुबताना पाहिलेलं होतं अन् इथं तर रात्रीच्यावेळीही रस्त्यावरची सुई दिसेल एवढा प्रकाश होता.शहरातील दिवे म्हणजे जणू सूर्याची कोवळी पिल्लेच.शहर दाखवत असताना ठराविक वेळानं राजू मला सारखं म्हणायचा ,निकाल लागला की इथेच ये शिकायला .हॉस्टेलला नंबर लागेल.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस
आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस


तारूण्य सुलभ वयात मनाच्या मातीत काहीही लवकर रूजतं.माझ्याही मनात छत्रपती संभाजी नगर रूजू लागलं होतं.रात्री बऱ्याच उशीरा लग्न लागलं.जेवणाची बफे सिस्टिम होती.त्या आगोदर उभा राहून जेवण कधी पाहिलेलंही नव्हतं व खाल्लेलंही नव्हतं. त्यामुळे शहरवासीय उभे राहून यथेच्छ जेवत होती व जातेगावकर उभे राहून फक्त पाहत होती.तेवढ्यात राजू तिथं आला व म्हणाला इथं असंच जेवावं लागतंय नाहीतर उपाशी मरताल.मग मात्र आम्ही उभ्या शरीरात उभ्यानेच अन्न ढकललं.


परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेलेले होते.गार हवेची झुळुक व दिवसभराची थकावट यांमुळे जो तो बसल्याजागीच झोपला होता.मी मात्र जागा होता.पापण्यांना एकमेकांना भेटावं वाटत होतं पण बुबळातली स्वप्न पापणीला मिलनाचा थाराच लागू देत नव्हती.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस


दहावीचा निकाल लागला .94 साली 84 % घेऊन उत्तीर्ण झालो होतो.शंभराच्या उंबरठ्याला सहज हात लावता येतील अशा आजच्या गुणांच्या तुलनेत त्याकाळात माझा 84 चा आकडा खूप मोठा होता.सर्वांनी खूप कौतुक केले.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी बीड,लातूर,संभाजी नगर या तीन पर्यायातून एक निवडायचे होते.महिनाभरापूर्वीच राजूने संभाजी नगर दाखविलेले असल्यामुळे मनाच्या उर्मीने छत्रपती संभाजी नगरवर शिक्कामोर्तब केले.वसतिगृहात नंबर लागणार व मोफत शिक्षण होणार म्हणून मी छत्रपती संभाजी नगर निवडले होते.घरची खूप गरीबी होती,संभाजीनगरला मी
घरच्यांच्या जीवावर शिकूच शकत नव्हतो.

30 जून 1994 रोजी मी गुणपत्रक ,शाळा सोडल्याचा दाखला घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे निघालो.एस.टी.बसने मी पहिल्यांदाच लांब व एकटाच निघालो होतो.सकाळी अकराच्या आसपास मी पोहचलो.देवगिरी कॉलेजला ॲडमिशन घेतले.संत तुकाराम महाराज व जिन्सी वसतीगृहात फॉर्म भरला.वसतिगृहाच्या कॉलची रोज वाट पाहायचो पण कॉल काही येत नव्हता.शेवटी कंटाळून दहा आॕगस्टला पुन्हा संभाजीनगरला गेलो.दोन्ही वसतिगृहात प्रवेशाच्या याद्या लागल्या होत्या.पुन्हा पुन्हा यादी वाचत होतो पण त्यात माझं नाव काही सापडत नव्हते.ते तिथं नव्हतंच त्यामुळे सापडण्याचा विषयच नव्हता.पंचावन्न टक्के मार्क असलेली नावे होती पण माझे नाव नव्हते.शेवटी वार्डनकडे जाऊन चौकशी केली.मग कळले की मागील दोन वर्षापासून समाज कल्याण विभागाने वसतिगृहात फक्त स्व जिल्ह्यातील मुलांनाच प्रवेश देण्याचे आदेश काढलेले आहेत.ते मला म्हणाले तुम्ही बीडला फॉर्म भरा.दिवसाच डोळ्यासमोर अंधार झाला.घरून खर्च होऊ शकणार नव्हता अन् तिकडे बीडला प्रवेश प्रक्रिया संपलेली होती.काहीच समजत नव्हतं.शेवटी राजू म्हणाला की त्याच्या आत्याच्या ओळखीतला एक रिकामा बंगला आहे.ते साहेब कळंबला पोलीस अधिकारी होते.बंगल्याचा वापर होईल व स्वच्छता राहील म्हणून चार दोन मुले घेऊन राहायला काही हरकत नव्हती.भाडे देण्याची अजिबात गरज नव्हती.सिडको सारख्या प्रतिष्ठित भागात विनाशुल्क चार रूमचा भारी बंगला राहायला मिळाला होता.राहण्याचा प्रश्न सुटला तरी इतर प्रश्नाचे काय? हे सतावित होतंच.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस


गावाकडे आलो.बाकीचे वर्ग मित्र बीड गेवराई लातूर असं ज्याच्या त्याच्या पद्धतीने गेले होते.शैक्षणिक धावपट्टीवर मी बराच मागे रेंगाळलो होतो शिवाय पायात त्राणही नव्हते.पंधरा ऑगस्ट दिवशी शाळेत गेलो.पहिली ते दहावी रांगेत उभे राहायची सवय असल्यामुळे अकरावीत प्रवेश असूनही मी दहावीच्या रांगेत जाऊन उभा राहिलो.लग्नाच्या महिना दोन महिन्यात माहेरचं अल्लडपण थोडंच सरत असतं ? मी शाळेसाठी माहेरवाशीनच होतो.जोशी सरांनी मात्र मला शाळेच्या रांगेत न ठेवता प्रेमाने जवळ घेतले व गावकऱ्यांच्या रांगेत उभे केले.तिथं सारी प्रतिष्ठित माणसं उभी होती.ध्वजा रोहन संपल्यानंतर जोशी सर ,मधुकर ढाकणे सर,जगदाळे सर यांना मी वसतिगृहात नंबर न लागल्याचे सांगितले.मी तर चिंतातूर होतोच पण तेही चिंतेत पडले कारण माझी परिस्थिती त्यांना माहीत होती.
शेवटी कसंही करून शिकायचेच या निर्णयावर आलो व राजूसोबत त्याच्या रूममध्ये राहायचे ठरले.तेव्हा फोनचा जमाना नव्हता पण राजूने मला पत्र पाठवून फारसं सामान आणू नको ,त्याचेच साहित्य वापरू म्हणून कळविले होते.तरीही काहीतरी न्यावंच लागणार होतं.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस


चुलती बाई व आई अक्काची लगबग सुरू झाली.चटणी,मसाला ,शेंगदाणे कुटुन तयार झाले.आपलं लेकरू घर सोडून उडत्या पाखरावानी भूर्रकन उडून जाणार असल्याच्या जाणीवीने बाईने अश्रूच्या डबडब पाण्यातच सारी तयारी केली होती.भांडी काय काय द्यावीत ? हे बाईच ठरवित होती.एक स्टीलचा हंडा,उंडा मळण्यासाठी एक मध्यम आकाराची परात,जेवणासाठी छोटी परात,एक ग्लास ,तांब्या,चपातीस तेल लावण्यासाठी छोटी वाटी ,एक चमचा,अनेक दिवसापासून चुलीवर मांडलेलं काळ्याकुट्ट बुडाचे पातेले असं मिळून एक छोटं पोतं तयार झालं.गेवराईच्या बाजारातून स्टो आणला होता.रॉकेलसाठी कँडही घेतली होती.पोळी लाटण्यासाठी दिलेले लाटणे व पोळपाट माझ्या आजीच्या हातचा होता.आजी मला कळत नव्हती.माझ्या जन्मावेळीच ती गेलेली होती.ती कशी होती हे आजही माहीत नाही पण तिचे पोळपाट बेलणे सोबत होते.फोटोतला स्टीलचा हंडा शंभर रूपयाला घेतला होता.बाजारात हरमाल एकच दर असलेल्या दुकानात ग्लास पाच रूपयाला घेतला होता व तांब्या दहा रूपयाला घेतला होता.हे सगळं सामान घेऊन मी 26 ऑगस्ट 1994 रोजी घर सोडले ते आजही सोडलेलेच आहे.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

वडील कडक शिस्तीचे व अश्रूपासून फार दूर असलेले आहेत.तरीही मी त्यांना चार वेळा रडताना पहिलेलं आहे.मी अकरावीसाठी निघालो तेव्हा ते घट्ट मनाने बसस्थानकावर आले होते.ते कधीच रडलेले नसल्यामुळे आताही रडतील अशी अटकळ मनात नव्हतीच पण एस.टी.आली अन् त्यांचा बांध फुटला.माझे चुलते कै.दादा ,वडील खूप रडत होते.माझं रडणं तिथून पुढे सुरू झाले ते संभाजी नगरपर्यंत अखंड सुरूच होते.पुढे नंतर वडील बहिणीच्या लग्नात दुसऱ्यांदा,आयुष्यात पाहिलेल्या एकमेव माहेरच्या साडी चित्रपट पाहताना तिसऱ्यांदा व मी नोकरीसाठी बायकोसह परागंदा होताना चौथ्यांदा अशा चार प्रसंगात वडील हमसून हमसून रडलेले आहेत.


अकरावी बारावी झाली.मग चंद्रपूरला डी.एड् झाले.डी.एड्.नंतर नोकरी लागली.नोकरीनंतर लग्न झाले.शिक्षण व नोकरीच्या निमित्तानं सारखं स्थलांतर करावं लागलं.प्रत्येकवेळी ही भांडी माझ्यासोबत असतच.काळाच्या ओघात जसं जवळचे सवंगडी काळाच्या पडद्याआड जातात तसं माझ्या भांड्यांचे काही सवंगडी भांडेही काळासोबत गडप झाली.लग्नानंतर घरात रॅक आले,रॅकला साजेशी मॅचिंग भांडी आली.एकाच आकाराचे प्लेट ,ग्लास,वाट्या,चमचे,तांबे,परात आले.घरातली म्हातारी माणसं संसारात बेदखल होतात तशी माझी जुनी भांडीही बेदखल झाली असती पण मी शून्यात असताना हा हंडा,तांब्या ,ग्लास माझ्या सोबतीने होता म्हणून मी या तिघांच्या जेष्ठत्वाचा मान ठेऊन इतर महागड्या भांड्यासोबत त्यांची किंमत कमी होऊ दिली नाही.आजही या तीन भांड्यांना पप्पांची भांडी म्हणजे माझी भांडी म्हणून घरात ओळखलं जातं.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

भांड्याचा 30 वा वाढदिवस
आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस


आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

मधल्या काळात परातीला चिर पडली म्हणून ती बाद झाली.गुळ फोडताना पोळपाट तुटला म्हणून तो ही बाद झाला.एकटं लाटणं उरलं होतं पण ते जाड व आखुड होते शिवाय नंतरच्या काळात नाजूक पोळपाट बेलणे आल्यामुळे ते ही अडगळीत पडले.त्या लाटण्याच्या अर्धांगिणीने म्हणजे पोळपाटाने आधीच दम तोडलेला होता ,या लाटण्याचे नव्या पोळपाटासोबत जमले नाही.कुठेतरी अडगळीचे जीवन जगत त्याची विधुरावस्था कधी संपली माहीत नाही.
सरकार बदललं की अधिकाऱ्याची बदली होते तसं माझं लग्न झाल्यावर बायकोने काळ्या बुडाच्या जर्मलच्या पातेल्याची बदली केली.गळत्या माठाचं पाठी झेलण्याच्या विभागात त्याला माठाखाली मांडण्यात आलं.गेल्या कैक वर्षापासून चितेवरचा योद्धा असलेले हे पातेलं थेट माठाखाली रवाना झालं.पदावनत केलेला हा बदल बहुतेक त्याच्या खूप जिव्हारी लागला असावा.कारण ते पाण्यासोबतच खंगत गेलं.खरं त्याला इथे पूर्णवेळ आरामाचे काम होते पण अग्नीसंगे झळाळणारा योद्धा स्वभाव गुणामुळे पाण्याची थंडक ते पातेलं पचवू शकले नाही.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

स्टो खूप भूर्र वाजायचा म्हणून वातीचा स्टो आणला.भूर्र वाजणारा स्टो एका गरजवंताला दिला.त्याची काही गरज सरली नाही व तो स्टो काही परत आला नाही.गॅसशी कनेक्शन जुळल्यावर वातीच्या स्टोवचीही वात विझली.काही दिवस त्याच्याकडून पाणी गरम करून घेतले पण नव्या सरकारने जुन्या सरकारचे एक एक विभाग बंद पाडले.एक एक करत जी पाच दहा भांडी होती ती अशीच वेगवेगळ्या कारणांनी गेली.त्यातलं कुणीही आता हयात नाहीत.पण एक हंडा,एक तांब्या,एक ग्लास आजही माझ्या सोबत आहे.बारा गावचं पाणी पिलेल्या माणसाला अनुभव समृद्ध म्हणून ओळखलं जातं.माझ्या या तीन भांड्यांनी आजपर्यंत जातेगाव, संभाजी नगर,गढी,बीड,चंद्रपूर,औंढा नागनाथ व पुन्हा बीड असा प्रवास केलेला असून सोळावेळेस रूम चेंजचा अनुभव घेतलेला आहे.


26 ऑगस्ट 1994 ते 26 आॕगस्ट 2024 या तीस वर्षाच्या काळात कौटुंबिक गरज म्हणून आमच्यात अनेक स्थित्यंतरे झाली.अनेक भांडी आली गेली.पण हे तिघे आजही जेष्ठत्व मिरवत घरातल्या घटनेचे साक्षीदार म्हणून उभे आहेत.


मला स्वयंपाक येत नव्हता तेव्हा त्यांनी माझं रडणं पाहिलेलं आहे.फुगलेली पोळी टचकन फुटून हातावर वाफेचा भडिमार झाला तेव्हा मी तांब्यात हात बुडवलेला आहे.लग्नानंतर खूप चांगली चांगली भांडी घरात आली तेव्हा मी त्यांना शब्द दिला होता ,मालकीणबाई तुम्हाला अडगळीत टाकणार नाहीत.दुनिया अपडेट होत राहील पण माझी डेट तुमच्यासोबत राहील.सर्वात जेष्ठ असूनही तिघेही कामात मागे नाहीत.

आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस


या तीन भांड्याच्या निमित्तानं मला माझा भूतकाळ सजीव करता आला.हीच त्यांची सजीवता आहे.सजीवातलं वाढ हे लक्षण भांड्यात नाही पण माझी वाढ त्यांनी पाहिलेली आहे.भांड्यांना प्रजनन माहीत नाही पण माझे एकाचे दोन व दोनाचे चार त्यांनी पाहिले आहेत.भांड्यांना स्थलांतर करता येत नाही पण माझ्या प्रत्येक स्थलांतरासोबत ते आहेत.भांड्यांना अन्न पाणी लागत नाही पण तीस वर्षापासून ते मला पाणी पुरवत आहेत.म्हणूनच तर माझ्या लेखी ते सजीव आहेत.
अजूनही बरंच काही बोलू पण यांच्या पन्नासव्या वाढदिवसाला 2054 साली.

भांड्याचा 30 वा वाढदिवस
आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस

कचरू चांभारे बीड 9421384434

भांड्याचा 30 वा वाढदिवस
आयुष्याचे साक्षीदार

20 thoughts on “आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस”

  1. निर्जीव वस्तूंसोबत जिवंतपणा ची अनुभूती देणारा लेख………
    उत्तम लेख

    Reply
  2. सर खरोखरच एक संवेदनशील लिखाण…..
    आयुष्याचा खडतर प्रवास….

    Reply
  3. आठवणीना उजाळा दिला सर तुम्ही. सध्याच्या जमान्यात या आठवणी क्वचितच जागृत ठेवतात, पण आपल्या सारखे प्रेमळ, हळवे, संस्कार जन्य व्यक्ती फार कमी असतात.‌ तुमच्या या तीन साथीदाराना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    Reply
  4. खुप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    Reply
  5. जेष्ठ मंडळींचं फक्त असणं सुद्धा दहा हत्तीचं बळ देत असतं. आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिवानीदीदींच एक वाक्य मनावर रेंगाळत असतांना, ( वाक्य होतं, हमारे साथ हमारे माता पिता, बडे लोग रहते है, तब छोटेसे छोटा काम क्यों नही रहता, हम उनको पूछे बिना, उनका राय लिए बिना, काम नहीं करते, भलेही हमें तरिका मालूम हो. इससे क्या मिलता है? हमे आशीर्वाद मिलता है. आगे बढो बेटा, सब कुछ अच्छा होगा, और यही आशीर्वाद बिगडते हुए काम को भी विजयी बना देता है… ) आपल्या लेखातल्या जेष्ठ
    मंडळींची भेट झाली.. काय योग पहा. बाकी कांही असो, जिथं निर्जीव वस्तूंची सुद्धा इतकी देखभाल होते, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केलं जातं, त्या व्यक्तीच्या
    जीवनात म्हणूनच, व्यक्त अव्यक्त स्वरूपात
    आशीर्वादाचा भरपूर खजिना असणार यात वाद
    नाही. 👍🏼 आपल्या या *हांडा आजीची* सुवर्ण जयंती साजरी करूया. खूप सुंदर कल्पना आणि साकारलीय पण सुंदर. तीनदा डोळ्यात अश्रू आले.
    निर्जीव वस्तुतही सजीवता ओतलीय.
    1.खरं त्याला इथे पूर्णवेळ आरामाचे काम होते पण अग्नीसंगे झळाळणारा योद्धा स्वभाव गुणामुळे पाण्याची थंडक ते पातेलं पचवू शकले नाही
    2. लाटण्याच्या अर्धांगिणीने म्हणजे पोळपाटाने आधीच दम तोडलेला होता ,या लाटण्याचे नव्या पोळपाटासोबत जमले नाही.कुठेतरी अडगळीचे जीवन जगत त्याची विधुरावस्था कधी संपली माहीत नाही.

    Reply
  6. 3. चुलती बाई व आई अक्काची लगबग सुरू झाली.चटणी,मसाला ,शेंगदाणे कुटुन तयार झाले.आपलं लेकरू घर सोडून उडत्या पाखरावानी भूर्रकन उडून जाणार असल्याच्या जाणीवीने बाईने अश्रूच्या डबडब पाण्यातच सारी तयारी केली होती.भांडी काय काय द्यावीत ? हे बाईच ठरवीत होती.😢

    Reply
  7. खूप सुंदर शब्दप्रपंच, सर तुम्हाला सरस्वतीचा वरद हस्त आहे . कीती सुंदर शब्दांची मांडणी.

    Reply

Leave a Comment