कचरू चांभारे

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025

August 22, 2025 | by kacharuchambhare.com

Pola_in_Chinawal_9

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025

आला आला पोळा
आला आला पोळा

आला आला पोळा आनंदी आनंद झाला

प्राण्यांसह भटकंती करणारा माणुस पाण्याच्या आधाराने व शेतीच्या निमित्ताने स्थिर आयुष्य जगू लागला.पशूपालन व शेती मुळेच छोट्या वसाहती,तांडे,वाडी वस्ती निर्माण झाल्या.हळूहळू धनधान्याची,पशूंची सुबत्ता आली .वाढत्या लोकसंख्येने नानाविध शोधांचे शोध लावले.नागरी नगरे निर्माण होत गेली तरीही वसाहतींचे केंद्र खेडीच आहेत.

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025


आजही संस्कृती व उद्योगाचा मुलाधार शेतीच आहे.त्याचाच भाग म्हणून निसर्ग,शेती व उपयोगी पशूंचे ऋण व्यक्त करण्यासाठी सण उत्सवाची निर्मिती झाली.त्यातलाच एक सण म्हणजे पोळा .काही ठिकाणी बैलपोळा असाही उल्लेख येतो.

   शेतीशी आपल्या देशाचे हजारो वर्षांपासून भावनिक नाते आहे.रासायनिक खते,बि बियाणे,शासनाची कृषीविषयक अनास्था इत्यादी कारणांमुळे शेतीची माती झाली आहे पण शेतीशी नाळ जुळलेला पारंपरिक शेतकरी शेतीतून पळ काढत नाही.उघड्या आभाळाखाली ढगांच्या भरवशावर व जमिनीवरील लोकांच्या शेती धोरण शत्रूंच्या बेभरवशी कंपूत शेतकरी शेती करतो आहे.

   
   आला आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025


    शेतकऱ्यांच्या सोबतीने शेती कामात प्रचंड मेहनतीच्या कामाला जुंपलेला प्राणी म्हणजे बैल होय.प्रचंड मोठ्या कष्टाच्या कामाला बैल मेहनत हा शब्द वापरला जातो,यांतच बैलांच्या कष्टाचे महत्व दडलेले आहे. नांगरणी,पाळी पेरणी,गाडी वाहतूक इत्यादी कामासाठी बैलाचा उपयोग होतो.

साधारणपणे गुढीपाडव्याला शेतीच्या नव्या हंगामाची सुरूवात होते.शेतीवरचे सालगडी याच दिवसापासून ठरवले जातात व उन्हाळी कामाला सुरूवात होते.नांगरणीमुळे मातीची उलथापालथ होते ,तिच्यात जोम तयार होतो.उन्हात जमीन चांगली तापून ,तळून निघते.मे च्या शेवटी व जूनच्या आरंभी पावसाचे ढग जमायला लागले की बळीराजा मोरासारखा आनंदाने नाचायला लागतो.ढग धो धो कोसळले की हा बळीराजा जगाला पोसण्यासाठी तिफणीवर धान्याची मुठ धरून ते धान्य धरणीमाईच्या उदरात सोडतो.श्रावणाच्या अखेरपर्यंत शेतातली घाईची कामं बरीच आवरलेली असतात आणि शेतकऱ्यांना व बैलांना थोडी उसंत मिळते.

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025

सगळं शिवार हिरवं गार झालेलं असतं.ही मेहनत बैलाच्या सहाय्याने फळाला आलेली असते म्हणून बळीराजा बैलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा करतो.स्त्री ,शेतकरी व बैल यांच्या नशिबी कायमच उपेक्षा वाट्याला आहे.पुजाआर्चेत नारी शक्ती देवता म्हणून गौरविली जाती,प्रत्यक्षात कुचंबणेचा पुरूषी वरवंटाच तिच्यावर फिरतो .शेतकऱ्याला बळीराजा या मोठ्या उपाधिने पुकारलं जातं पण राजा असल्याचा निदान भासमय जीवन तरी त्याला मिळत का ?


गीत,कविता,धडे कादंबरी,चित्रपटात बैल भरभरून दिसलेला आहे कारण तो आमचा एक अविभाज्य भाग आहे. टिंग्या चित्रपट तर बैलाच्या निरागस प्रेमालाच वाहिलेला आहे.पाखऱ्या नावाचा आम्हाला धडा होता.किती गुगाचा होता तो पाखऱ्या‌ ! धन्यावर धन्याच्या लेकरांवर पाखरमाया पाखरणारा तो पाखऱ्या वाचताना मन गलबलून जाते.
राब राब राबणाऱ्या बैलाचे पोळ्याला खूप कौतुक पुन्हा जू नशिबी आहेच.पण चला जो दिवस उत्सवाचा आहे,तो मुक्त आनंदाने साजरा करू या.

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025

खांदेमळणी 
आला आला पोळा
खांदेमळणी आला आला पोळा

पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी असते.खांद्यावर कष्टाचे जू घेऊन वावरलेल्या बैलाचे खांदेपुजन म्हणजे खूप मोठी कृतज्ञता आहे.तेल तुप हळदीने बैलाच्या खांद्याची मानाची मालिश केली जाते.अमिताभ बच्चन टीव्हीवर नवरत्न तेल दाखवतो त्यापेक्षा खांदेमळणी ही खरी सुखाची झोप आहे.कृतज्ञ भावनेने धनी जेव्हा बैलाचे खांदा,मान चोळतो तेव्हा दोघांचेही मन कष्टाच्या धड्यांची उजळणी गिरवत असते.धन्याच्या मनाने व बैलाच्या मानेने किती कष्टाचे आभाळ पेललंय ?कळत असेल का बरं जगाला ?


खांदेमळणी करून बळीराजा बैलांच्या कानात उद्या पोळा आहे.आमच्याकडे जेवायला या बरं.असं अधिकृत आवतन (आमंत्रण) देतो.खंदेमळणी झाली की पोळा संपेपर्यंत बैलाच्या खांद्यावर जू दिले जात नाही‌‌.पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटेच बैल शेतात चारायला नेले जातात.झुंजुमंजु पहाटे घुंगुरमाळांच्या मंजुळ आवाजात बैल शेताकडे मोकळ्या कुरणात,बांधावर जातात‌.जोखडमुक्तीची ती पहाट बैल आनंदाने घालवतात.मुबलक पाऊस झालेला असल्यामुळे गवताने बैलाइतकी उंची गाठलेली असते.

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025

गवतात झाकलेले बैल केवळ गळ्यातील घुंगराच्या आवाजाने कळतात.सूर्य उगवस्तर मोकळ्या रानी बैलाचे भरपेट जेवण उरकलेले असते.बाजूलाच खळखळ वाहणारा ओढा असतो.काठची माती भुसभुशीत असते.शिंगाने माती उकरत,एकमेकांना मस्तीत धक्के देत,शेपटी वर करून उधळत सर्व बैल त्या दिवशी शाळेतल्या मुलांप्रमाणे दप्तरमुक्तीचा आनंद घेतात.एखादा चांगला डोह पाहून बळी धनी बैलाला छान धुऊन घेतो.ही अंघोळ बैल बापाच्या कष्टातून उतराई होण्याप्रतीचं समर्पण असतं‌.पोटभर चरून व अंग धुवून झालेल्या बैलास सजविण्याचे काम सुरू होते.शिंगांना रंग,झुल,घागरमाळा,बाशिंग,गोंडे असा मस्त श्रीमंती साज बैलाला मिळतो.

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025


गावातल्या मारूतीरायाच्या साक्षीने बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येते.प्रचंड उधाण, जल्लोष असतो.
सर्व शेतकरी आपापले सजवलेले बैल घेऊन एकत्र येतात.मारूतीच्या मंदिराजवळ आंब्याचे तोरण बांधलेले असते.सर्व शेतकरी तोरणाच्या मागे असतात.

पोळ्याचा बैल सर्वात आधी नेण्याचा मान मुकादम,पोलीस पाटील ,चांगला जमीनदार असं स्थानपरत्वे गाव संस्कृतीप्रमाणे वेगवेगळा असतो.मानकऱ्याची बैलजोडी पुढे गेली की त्याला पोळा फुटला,तोरण तुटले असं म्हणतात.मग सर्व शेतकरी लगबगीने उत्साहाने बैल हाकारतात.

बरेच शेतीमालक आपल्या सालगड्यास नवीन ड्रेसही घेतात.मारूतीरायाचे दर्शन घेऊन बैलांना घरी आणले जाते.पायावर पाणी टाकून,कपाळी हळद कुंकू लावून बैल देवतेची पुजा केली जाते व पुरणपोळीचा नैवद्य वृषभदेवाला दिला जातो.मंदिराभोवती अजून एक बैल मिरवणुकीची फेरी होऊन पोळ्याची सांगता होते.काही ठिकाणी दुसऱ्या फेरी वेळी गावातील इतर देवता खंडोबा,देवी,महादेव,गणपती इत्यादी देवतासमोरूनही बैलांना नेले जाते.

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025


माझं बालपण जातेगावात गेलं.गावचा मोठ्ठा पोळा मी डोळ्यात साठवलेला आहे‌.पोळ्याच्या निमित्ताने गुण्या,लाल्या,बत्ताशा,पाखऱ्या ,सर्जा ही सारी बैलं मनात पिंगा घालत आहेत.गावही मोठे व बैलांची संख्या खूप असल्यामुळे जातेगावचा पोळा खूप मोठा असे.

खंडोबा मंदीर परिसरात सर्व शेतकरी जमा होत व अंदाजे चारच्या आसपास मारूती मंदीराकडे चालू लागत‌.पोळा फोडण्याचा मान मुकादमाला असे.त्यांचे बैल पुढे गेले की मग सर्व लोक उधानात बैल पळवत असत.

सजावट साहित्य


नोकरीच्या निमित्ताने औंढा नागनाथला चौदा वर्ष राहिलो.मनाचा पिंडच शेती निगडित असल्यामुळे औंढा परिसरातील पोळाही मनात साठवला.पोळ्याची मुख्य मिरवणूक झाल्यावर दुसऱ्या दिवशी या भागातील लोक आपापले बैल घेऊन सिद्धेश्वर मंदीर तर काही जण वाई गोरक्षनाथ येथे जातात‌‌.संपूर्ण तालुक्याचे,शेजारी तालुक्याचे बैल दिवसभर बघायला मिळतात.

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी औंढा ते वसमत हा चाळीस किमी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असतो.या रस्त्यावर फक्त बैलांचा वावर असतो. आता सध्या बीड शहरातील पोळा पाहतो आहे.एकटा दुकटा शेतकरी आपापल्या सोयीने सिमेंट रोडने येतो व जातो.एकत्रित बैल पाहण्याचा योगच येत नाही.

आला आला पोळा आनंदी आनंद झाला 2025


विदर्भ प्रांतात तान्हा पोळा अतिशय उत्साहात करतात.चिखलाचे,लाकडाचे बैल बनवले जातात व पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची थाटात मिरवणूक असते.बालगोपाळासह मोठी माणसेही तान्हा पोळा उत्साहाने करतात.


पूर्वी हवामान बहुतांशी स्थिर असल्यामुळे हवामान बदलाचे काही ठोकताळे असत.जसं की दसरा झाला की थंडीची चाहूल लागते,होळी धुलिवंदन झाले की थंडी संपते.तसंच पोळा व पाऊस यांचाही संबंध आहे.जुन जूलैत धो धो बरसणारा पाऊस प्रांतिक भेदभाव न करता सर्वत्र कोसळतो.पोळ्यानंतर मात्र तो भोळा होतो.म्हणजे पावसाचे प्रमाण कमी होते.पण हवामान बदलले असल्याने ठोकताळेच बिघडत आहेत.एखाद्या वर्षी पोळ्या पर्यंत मोठा पाऊस होत नाही ,बैल धुण्यासही पाणी नसते.चाराही वाढत नाही. एखाद्या वर्षी इतका पाऊस येतो की सर्व पीकच धूवून जाते.
बदलती शेती ,आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला शेतकरी डोळ्यातील अश्रूत दडलेल्या धुसर स्वप्नात ,अंधुक आशेत बैलांच्या पाठीवर बळेच थाप देतो आहे.

शेतीकडे पाहत आकाशाला साकडे घालतोय की तुझ्या भरवशावर धान्य पेरले आहे.जे पेरले आहे तेच उगवू दे.पेरलंय धान्य अन् उगवलंय मरण असं होऊ नये बाबा.एक एक सुगी हातून निसटते तेव्हा लेकीबाळींचे लग्न लांबतात. बारीकसारीक व्यवहार थांबतात.जीव मेटाकुटीला येतो.बैलाच्या पाठीवर थाप द्यायला अंगात बळ असायला हवं ना ?

कधी आभाळ ढगांना दूर दूर पळवतं ,शेतावर कोसळतच नाही अन् कधी कधी इतकं कोसळतं की शेतकरीच कोसळून पडतो.कोरड्या व ओल्या आभाळाच्या खेळात पिचतो तो शेतकरी.


विनिमयाचं मुख्य साधन पैसा बनलं,शेती निगडित प्रत्येक काम पैशाशी जोडलं गेलं अन् शेती आतबट्टयाची झाली.हंगामामागे हंगाम कोरडेठाक जात असतील किंवा धो धो पावसात धुवून जात असतील तर शाश्वत शेती ही ओळख पुसायला वेळ लागणार नाही.


काय सांगावं कोण कोण डोळे मिटवून घेईल ? शेतकरी प्रेमात ऊर बडवून घेतल्याचे ढोंग सारेच करतात पण बळीराजाचा ऊर फुटू नये म्हणून कोण कोण हात देतात ? शिवार फुलल्याशिवाय बळीराजा सुखावत नाही.निसर्गाचा चालक बनू पाहणाऱ्या माणसांच्या चुकीच्या चालवणुकीमुळे हवामानाच्या गाडीची गिअर सिस्टिम बदलून गेली आहे म्हणूनच तर जिथं टॉप आवश्यक आहे तिथंच आपण रिवर्स आहोत.


पण कहीही असो… हे बैलदेवता तुझ्याप्रती बळीराजा कायम कृतज्ञ आहे रे..


कचरू चांभारे बीड
9421384434

आला आला पोळा आनंदी आनंद झाला
आला आला पोळा आनंदी आनंद झाला

RELATED POSTS

View all

view all