जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
जागतिक एड्स दिन. एकमेकांस शुभेच्छा न देण्याचा दिवस.काळजी घ्या असंही नाही म्हणायचं उगीच कशाला कोणाला संशयाच्या भोवऱ्यात अडकवायचं ?
नीतीमूल्याच्या चौकटीत प्रामाणिक राहण्यासंबंधी जनजागृती करण्याचा आजचा दिवस.
निरोध वापरा व एड्स टाळा असं म्हणण्यापेक्षा
विवेक वापरा
मोह टाळा
चारित्र्य सांभाळा असं म्हणू या .
कारण
देश-राज्य-गाव-समाज यापेक्षाही आपली स्वतःच स्वतःला जास्त गरज असते.चुकीच्या कारणाने मृत्यू आल्यास कोणीही हळहळ ,तुळतुळ व्यक्त करत नाही.भावनाशून्य ,कोरडा मृत्यू सामाजिक मानांकनात कनिष्ठ दर्जाचा असतो.अन् नेमका असाच मृत्यू एड्स महामारीने येतो.
एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती करण्यासाठी व कलंकित आजाराने मृत पावलेल्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येतो.एड्स प्रतिबंध व नियंत्रणासाठी शिक्षण हा या जागतिक दिनाचा उद्देश आहे.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
दक्षिण आफ्रिकेत ऐंशीच्या दशकात एड्सचा पहिला रूग्ण आढळला होता परंतु त्याचवेळी हा रोग युरोप,अमेरिकि,आशिया खंडातही पसरलेला होता.
एचआयव्ही विषाणू संसर्गाने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होत जाते व व्यक्ती कृश ,निस्तेज अवस्थेत देह धारणा संपवितो.
जेम्स बन व थॉमस नेटर यांनी केलेली एड्स बाबत जन जागृती संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकारली व 1988 पासून जागतिक एड्स दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.कॅन्सर,टीबी, किडनी विकार हे सुद्धा मृत्यूशी दोस्ताना करून देणारे आजार आहेत. हे आजार पूर्णत: शारीरिक व अंशत: मानसिक आहेत परंतु एड्स हा आजार शरीर,मन,शेजारी पाजारी, गणगोत असं सर्वच पातळीवर माणसास उद्धवस्त करतो.
आजही जगात 3.67 कोटी लोक एचआयव्ही बाधित आहेत.त्यापैकी 17 लाख हे 15 वर्षाखालील मुलंमुली आहेत.2030 पर्यंत एचआयव्ही बाधित संख्या शून्यावर आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सीडीसी ही जागतिक पातळीवर व NACP देशपातळीवर काम करत आहे.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
चुकीने वा ईच्छा नसताना गर्भ धारणा होऊ नये म्हणून जसं गर्भ निरोधक गोळ्या असतात तसं आता एचआयव्ही संसर्ग होऊ नये म्हणून पीआरपी लस आहे. एकल सेक्सुअल पार्टनर हा एचआयव्ही प्रतिबंधासाठी उत्तम मार्ग आहे.
एचआयव्ही भीतीने नाभिक कारागिरी व वैद्यकीय क्षेत्रात कचरा वाढला आहे. पूर्वी एकाच ब्लेडमध्ये पाच सहा दाढी कटिंग होत असे आता प्रत्येकास वेगळे व नवे साहित्य वापरावे लागते.दवाखान्यात प्रत्येक वेळी सुई बदलावी लागते. त्यामुळे कचरा वाढतो आहे.
रक्ताचे नातलग एचआयव्ही बाधितांवर बहिष्कार घालत असले तरी काही समाजसेवी मात्र एड्सग्रस्तांच्या मरणकळेत जीवनकळा फुलवित आहेत.
मरणकळेत जीवनकळा फुलविते इन्फंट इंडिया
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
1 डिसेंबर जागतिक एड्स दिन.जागतिक स्तरावर विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात.तसेच स्थानिक पातळीवरही प्रसंगपरत्वे अनेक दिन, सण,उत्सव ,वाढदिवस ,जयंती ,पूण्यतिथी ,वेगवेगळे सप्ताह साजरे केले जातात.अशा साजऱ्या होणाऱ्या इतर अनेक दिनविशेषापैकी आज साजरा होणारा जागतिक एड्स दिन 2024 एक दिनविशेषच.पण इतर दिनविशेष व जागतिक एड्स दिन 2024 यांमध्ये एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे इतर दिनासारखं आपण समोरच्याला जागतिक एड्स दिनानिमित्त तुम्हास व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा असं म्हणू शकत नाही.विनम्र अभिवादन असंही म्हणू शकत नाहीत.एकमेकांना शुभेच्छाही न देण्याचा हा एकमेव दिन विशेष आहे.
एड्स एक भयानक रोग जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
पूर्वीच्या काळी कँन्सर रोगास खूप भयंकर समजले जात असे.मृत्यूचा अत्यंत जीवलग मित्र म्हणजे कँन्सर ही कँन्सरची ओळख अनेक वर्षे अबाधित होती.आजही कँन्सर पिडीतांची संख्या वाढतच आहे.पण किडनी विकार ,अधूनमधून येणारे स्वाईन फ्लू,कोरोना,बर्ड फ्लू सारखे हंगामी आजार यांमुळे मृत्यूमित्रांत भरच पडली आहे.
ऐंशीच्या दशकापासून चर्चेत आलेला एड्स हा सर्वच आजारांपेक्षा अत्यंत भयंकर आजार आहे.एड्स सुद्धा मृत्यूमित्रच आहे पण ,तो मृत्यूमित्र बनण्यापूर्वीच बाधित व्यक्तीस शारीरिक ,मानसिक व सामाजिक दृष्ट्या उद्धवस्त करून जातो.एड्सविषयी जनजागृती व्हावी म्हणून आजचा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. एड्सविषयी अनेक समज गैरसमज आहेत.सर्प जाती व सर्पदंश याविषयी जसे अनेक समज गैरसमज व अख्यायिका आहेत,तशाच अनेक कहाण्या एड्सच्या आहेत.
एड्स होण्यामागची कारणे ,प्रतिबंध उपाय याविषयी आता बरीच माहिती उपलब्ध आहे.या दिनानिमित्त इन्फंट इंडियाची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे.
जागतिक एड्स दिन 1डिसेंबर 2024 वआनंदग्राम पाली इन्फंट इंडिया आताचे आनंदग्राम पाली
बीड शहरापासून दक्षिणेला बारा किमी अंतरावर पाली नावाचे गाव आहे.पालीच्या जवळच एका डोंगरावर इन्फंट इंडिया हा एचआयव्ही बाधित मुलांसाठीचा सेवा आश्रम आहे.बीडचे बाबा आमटे अशी ओळख असलेले दत्ताभाऊ बारगजे व त्यांच्या सहचारिणी संध्यामाई इन्फंट इंडिया हे आनंदाचे बेट चालवितात.इन्फंट इंडियाला मी बेट म्हणत असतो.बेट या शब्दाचा भौगोलिक अर्थ आहे चारही बाजूंनी प्रचंड जलसाठ्याने (समुद्राने) वेढलेला जमिनीचा छोटासा भूभाग.इन्फंट तर डोंगरावर आहे.मग त्याला बेट कसे म्हणायचे? हो,त्याला बेटच म्हणावे लागते कारण जगाच्या मायासागरापासून ते खूप दूर आहे.वर्दळीच्या रस्त्यावर असूनही ते निर्जन आहे.आनंदवन नाव असले तरी इथले दुःख कधीच संपत नाही.कारण इथे राहणारी मुले एचआयव्ही बाधित आहेत.आईवडीलांच्या संपत्तीत मुले न्याय हक्काने वाटेकरी असतात,पण एचआयव्हीत बाधित मातापिता ,अपत्य जन्माला येताच त्याला एड्सची आपत्ती वारसा संपत्ती म्हणून देतात.संततीच्या वाट्याला मरणकळेची आपत्ती जन्मापासूनच मिळते.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
दत्ताभाऊ बारगजे हे नोकरीच्यानिमित्तानं गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडला सरकारी दवाखान्यात होते.1998 चा तो काळ.डॉ.प्रकाश बाबा आमटे यांचा लोक बिरादरी आदिवासी सेवा प्रकल्प हेमलकसा भामरागडहून हाकेच्या अंतरावरच आहे.लॅब टेक्निशिअन म्हणून दत्ताभाऊंचं हेमलकशात जाणं ,प्रकाशभाऊंना वारंवार पाहणं,अधूनमधून सेवेचा हिमालय बाबा आमटेंना भेटणं याची परिणिती हळूहळू अशी बनत गेली की दत्ताभाऊच समाजसेवेकडे वळले.पुढे त्यांची जन्मभूमीत म्हणजे बीडला बदली झाली.हेमलकसा येथे मनी रूजलेले समाजसेवेचे रोपटे इथं आल्यावर मोठे झाड झाले.रक्ततपासणीत आढळून येणारे एचआयव्ही पॉझिटिव नमुने,एचआयव्ही बाधित लोकांचे मृत्यू व त्यामुळे पोरकं झालेल्या मुलांची हेळसांड दत्ताभाऊंना बघवत नव्हती. सरकारी छोट्या क्वार्टरमध्येच कुटुंबासोबत त्यांनी एचआयव्ही बाधित तीन मुलांना ठेऊन घेतले व अशा प्रकारे इन्फंटची सुरूवात झाली.मुलांची वाढती संख्या व सेवेच्या आड येणारी सरकारी नोकरी ,ही कसरत संपविण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरी सोडली पण सेवा नाही सोडली.आज इन्फंट मध्ये सत्तर मुले आहेत.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
दत्ताभाऊ व संध्यामाईंनी अथक प्रयत्नातून मरणकळेत जीवनकळा फुलविली आहे.प्राथमिक शिक्षणाची सोय आश्रमातच उपलब्ध झाली आहे.माध्यमिक शिक्षणाची सोय डोंगरावरून खाली उतरले की पाली गावातच आहे.व्यावसायिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणासाठी बीडला यावे लागते.समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी वेळोवेळी दाखविलेल्या दातृत्व शक्तीमुळे मुलांना उपचारासाठी बीडला जा ये करण्यासाठी बस उपलब्ध झालेली आहे.
आरंभीच्या काळात एड्स बाधित रूग्ण दगावण्याचे प्रमाण जास्तच असे.अगदी एखाद्या मृत मुलावर माती ढकलून येईपर्यंत दुसरा मुलगा कलेवर होऊन शेवटचा हात लागण्याची वाट पाहत असे.
औषधोपचार व प्रतिबंधात्मक लसीकरण यांमुळे मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे.मुलांच्या चेह-यावर हसू फुलले आहे.आता एचआयव्ही बाधित मुलांची लग्नही होत आहेत व त्यांची संतती सर्वसामान्य निपजत आहे.सुखदुःखाच्या मिश्रणात दुःखाचीच छाया गडद असलेल्या इन्फंटचा संसार नेटाने ओढण्यात बारगजे दाम्पत्याला खूप कष्ट पडत आहेत.पण तरीही आनंदाने ते हे काम करत आहेत.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
मानवी शरीर अवयवरूपाने सर्वांचेच सारखेच असले तरी काही माणसांची अंतर्गत काळीज रचनाच अलग असते.काळजात असलेला काळजीचा अंतर्वेध प्रवाहच माणसाला सेवेचा मायबाप बनवत असतो.दत्ताभाऊ व संध्यामाई हे दाम्पत्य सेवेची मशाल घेऊन उभं आहे.त्या मशालीची तेलवात होणं ,समाजातील कनवाळू लोकांचं काम आहे.हे कनवाळू दातृत्वच सेवेची मशाल प्रज्वलित करू शकतं.
मरणकळेत जीवनकळा फुलविणारा आनंदी माळी दत्ताभाऊ यांच्या कार्याला सलामच.
कचरू चांभारे बीड
9421384434
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
खुप छान. दत्ताभाऊचे कार्य खूप महान आहे.
तसेच तुमचे लेखन ही..
Good
Thank u dear sir ji
मनस्वी धन्यवाद सर जी
दत्ताभाऊ माळी यांचे कार्य कौतुकास्पद आहे
Thank u sir
Very nice information 🙏
प्रत्येक्ष भेटून आनंद वाटला व सर्व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या व प्रत्येकाला हस्तांदोलन करून भावीवाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.
खूप छान वाटले
प्रतेक विषयाची मांडणी फार अभ्यास पूर्ण आणि सुसंगत करता सर ! राष्ट्रीय आणि सामाजिक मुल्याची उत्तम रूजवन करतात सर . सोनवने साहेबाचे आणि चांभारे सराचे खूप खूप अभिनंदन !💐💐
Thank you so much sir