पाणी पाणी पाणी सृष्टीची जीवन कहाणी
जागतिक जल दिन 22 मार्च

जागतिक जल दिन 22 मार्च
सौरमालेत आजघडीला तरी निश्चितपणे पृथ्वीसोडून कोणत्याही ग्रहावर जीव सृष्टी नाही.पृथ्वीवर जीवसृष्टी आस्तित्वात येण्याचे कारण म्हणजे पृथ्वीवरील हवा व पाणी.नैसर्गिक संसाधनांच्या जागृतीसाठी जगभरात 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करतात व लगेचच 23 मार्च रोजी हवामान दिन साजरा करतात.या दोन्हींच्या मध्ये म्हणजेच 22 मार्च रोजी जागतिक जल दिन 22 मार्च असतो.मानवी जीवन व संपूर्ण जीव सृष्टीला जीवन देणारा पाणी हा घटक महत्वपूर्ण आहे.पाण्याशिवाय संपूर्ण जीव सृष्टीचं पान हलतच नाही. पाणी,हवा,वन हे घटक पृथ्वीवरील जीव सृष्टी निर्माणाचे मुलाधार आहेत व तेच सृष्टीचे तारणहार आहेत.
जागतिक जल दिन 22 मार्च संयुक्त राष्ट्रसंघ 1993 पासून लोकांप्रती जल साक्षरतेसाठी साजरा करत आहे.निसर्गात पाणी हे बाष्प ,बर्फ व द्रवरूप पाणी अशा पदार्थाच्या तीनही अवस्थेत उपलब्ध आहे.समुद्री पाण्याची अमर्याद उपलब्धता असली तरी मानवी जीवनाचा समुद्री पाण्याशी थेट संपर्क नसतो.आपल्याला दैनंदिन जीवनात हवं असतं गोडं पाणी ,ज्याला आपण पिण्यायोग्य पाणी म्हणतो अन् नेमकं हाच जलसाठा मर्यादित आहे.वाढती लोकसंख्या ,अमर्याद शहरीकरण ,कारखानदारी यांच्यामुळे गोड्या पाण्यावर संकट आलेलं आहे.माणसाकडून पाण्याचा अविचारी व अतिरेकी वापर होत आहे . त्यामुळे खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल ,अशा उंबरठ्यावर जग उभे आहे.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे ,याचा संदेश देणे यासाठी जल दिन साजरा करण्याची योजना आहे.
जागतिक जल दिन 22 मार्च
71 % पाणी व 29 % जमीन अशी आपल्या पृथ्वीची वाटणी आहे. पिण्याच्या पाण्याचे साठे तलाव,धरणे,वाहती नदी स्वरूपात जमीनीवर उपलब्ध आहेत तसेच भूगर्भाच्या आत जमिनीखाली देखील पाणी आहे.
पृथ्वीवर गोड्या पाण्याचा सर्वात मोठा स्त्रोत गोठलेल्या बर्फ स्वरूपात हिमनगाच्या रूपाने उपलब्ध आहे. हिमनग वाचवा या थीमवर यावर्षीचा जागतिक जल दिन आहे. वाढते तापमान हिमनगांवर विपरित परिणाम करत आहे.हिमनग झपाट्याने वितळायला लागले तर समुद्राची पातळी व क्षेत्र वाढेल पर्यायाने जमीनीचे क्षेत्रफळ कमी होईल .काही शहरे,बेटं व समुद्रातील देश कायमचेच जलात विलिन होतील.
पाणी हेच मानवी जीवनाचे तारक आहे व तेच मानवी जीवनाचे मारकही आहे.
जागतिक जल दिन 22 मार्च
भटकंती करणारा आदि मानव स्थिरावला तो पाण्याच्या काठानेच.जगभरातली अनेक शहरं पाण्याची उपलब्धता पाहूनच वसली आहेत. भारताचा विचार करता दिल्ली,कोलकत्ता, प्रयागराज,उज्जैन व महाराष्ट्राचा विचार करता नाशिक, पुणे,पैठण,कराड,नांदेड अशी कितीतरी शहरे नदीकाठी वसलेली आहेत.
पाण्याचा मानवी जीवनात चौफेर वावर व वापर आहे.पाण्यामुळेच अनेक संस्कृती जन्माला आल्या व पाण्यामुळेच अनेक संस्कृती नष्टही झाल्या मग त्याची कारणं एक तर पुरात दडलेली आहेत किंवा पराकोटीच्या अवर्षणात दडलेली आहेत.उदा.सिंधू संस्कृती ,बॅबिलॉन,मेसोपोटेमिया इ.संस्कृती.
जागतिक जल दिन 22 मार्च
जन्मलेल्या बाळाचं सुरूवातीच्या काही महिन्यांचे पोषण केवळ दुधावरच असते.नंतर त्याला पाणी दिले जाते.अलीकडील काळात बाळाला चमच्याने पाणी पाजतात ,पण पूर्वी आई बोटाने थेंब थेंब पाणी बाळाला देत असे.पाण्याचा व आपला प्रवास असा आईनं दिलेल्या थेंबा थेंब पाण्याने सुरू होतो अन् शेवटी आपला देह कलेवर होतो तेव्हा निष्प्राण पडलेल्या त्या देहालाही पाणी पाजलं जातं.मरणोत्तर पाजलेलं पाणी जीवीत्वासाठी नसतं पण संस्काराचा भाग असतं.
जन्म ते मृत्यू संगत देणारं पाणी आपल्या आयुष्यात सर्वव्यापी आहे.थकवा जाणवल्यावर तोंडावर पाण्याचा सपकारा मारला की लगेच ताजंतवानं वाटतं.खायला वेळेवर काही नाही मिळालं तर अशावेळी पाणीच अन्नाचं काम करतं.आजारपणात पाण्याशिवाय गोळी नाही ,पाण्याशिवाय औषध नाही.जेवताना पाण्याचा तांब्या बाजूलाच असतो.पाहुणा आला की त्याचं स्वागत पाणी देऊनच.पाणी भरणे मग ते नळाचे असो वा विहिरीवरचे असो ,काहींचा दिनक्रमच तिथून सुरू होतो.स्वच्छता व पाणी हे अभिन्न अंग आहे.शेतीसाठी पाणी योग्य प्रमाणात मिळालं तरच शेतातले मोती घरात येतात नाहीतर मोती व माती एकरूप होतात.
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं ,गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं असं सोज्वळ गाणं मनातही मळा फुलवितं.टिप टिप बरसा पानी असं म्हणत हेच पाणी आगही लावतं तर नुसतंच पानी पानी पानी सानी सानी सानी म्हणत हेच पाणी मनाला उधळलायला लावतं.
जागतिक जल दिन 22 मार्च

गाण्यातून कवितेतून भेटणारं पाणी साहित्याच्या पानोपानीसुद्धा भेटतं.आषाढ श्रावणाच्या सरी कुणाला मोहवित नाही बरं ? मराठी साहित्यात पाणी मुबलक आहे.वेगवेगळ्या अर्थानं ते भेटत राहतं.तोंडचं पाणी पळालं की भीती वाटते तर तोंडाला पाणी सुटले की काहीतरी खायला मिळणार असते.काळजाचं पाणी पाणी झालं की जीवघेणी भीती वाटते तर काळजाला पाझर फुटला की मायेची हमी मिळते.रक्ताचं पाणी केलं की कष्टाची जाणीव होते अन् पोटातलं पाणी ढळलं नाही तर सुखासीन जिंदगीची कल्पना येते.पाणी लागलं हा शब्दही दोन अर्थानं येतो.पाणी उपलब्ध झालं असाही अर्थ होतो व बाधा झाली असाही अर्थ होतो.अळवावरचं पाणी क्षणभंगुरता दाखवितं तर काळ्या पाषाणतलं पाणी शाश्वती देतं.शत्रूला पाणी पाजलं की विजयाची खुण सांगतं तर पाणी सोडलं म्हटलं की समर्पणाची कथा निर्माण करतं.डोळ्यातलं पाणी भाव सांगतं तर कपाळावरचं पाणी कष्ट दाखवितं.असं हे पाणी अर्थांच्या नानाविध अर्थाने समृद्धपणे नटलेलं.पाणी लेने के बहाने आ जा असं हळूच सखीला सांगतं.
भुईकोट किल्ल्याभोवतीचा खंदक व खंदकातलं पाणी म्हणजे एक प्रकारचं अभेद्य कवच.शत्रू त्या खंदकात पडला की पाणी त्याला बघून घेई.
जागतिक जल दिन 22 मार्च
बाहुबली चित्रपटात बाहुबली देवसेनेचं राज्य राखताना समयसूतकता राखून धरण फोडतो इथं पाणी हे शस्त्र म्हणून वापरले आहे . भातवडीच्या लढाईतही मोगली सत्तेची जिरवताना मलिक अंबर ,शहाजीराजे या सेनानी जोडीने धरणाचाच वापर केला होता.
पाण्याचा बेपर्वाईने अतिरेकी व अविचारी वापर केल्यामुळे आग विझवणारं पाणी ,आग लावणारं पाणी झालं आहे.थेंबे थेंबे तळे साचे हे पाण्याने स्वतः शिकवले पण आपण तिकडं ध्यानच दिलं नाही.जागतिक जल दिना निमित्त जल साक्षरता महत्वाची आहे.
कल्पना करा की ,खरंच एक वर्षभर पाऊस नाही पडला तर काय होईल ? हा हा कार होईल.लोकसंख्या वाढ अमर्याद असल्यामुळेवाढलेले औद्योगिकीकरण व शहरीकरण यांमुळे एक वर्षाचा दुष्काळही जीवघेणा ठरेल.एकाच वर्षात सारं जीवीत्वच बदलून जाईल.पशू पक्षी कावळे चिमण्या पाण्यांविन तडफडून मरतील.
जागतिक जल दिन 22 मार्च
*पाण्याचा योग्य व आवश्यक तेवढाच वापर करावा.
पाण्याचा स्त्रोत प्रदूषित करू नये.
*पिण्याचे पाणी सर्वांनाच मिळेल हे पाहणे.
या मुद्द्यावरच आपण मर्यादित पाण्याचा साठा अमर्याद गरजांसाठी वापरू शकतो अन्यथा डोळ्यातही पाणी शिल्लक राहणार नाही.
पाण्याशिवाय सजीव नाही . समुद्र ही खूप मोठी परिसंस्था आहे व तिथलं वनस्पती व प्राणी जीवनही भीमकाय आहे.ते तिथं जगतील.पण आपल्याला मात्र गोड्या पाण्याचंच संवर्धन महत्वाचं आहे.गोडं पाणी हा आपला पहिला जीवनस्त्रोत आहे म्हणून प्रत्येकानं थेंबा थेंबाकडे पाहताना मोती म्हणून पाहावं.थेंब थेंब सांभाळताना मोती म्हणून सांभाळावं .गोडे पाणी व नदी यांचा अत्यंत जवळचा संबध आहे.
जागतिक जल दिन 22 मार्च
आम्ही नदीला माय मानलं पण माईप्रमाणे वागणूक दिली नाही.नदीमाय प्रदूषित करून टाकली.नदीचं वाहतं पाणी हौसेनं ,तृप्ततेनं पिणारा माणुस आज नदीच्या पाण्यानं चुळ भरायलाही धजावत नाही. समस्त मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग पाण्यातूनच जातो.हे ध्यानात यावे ,हाच जल दिनाचा संदेश आहे.माणसाची कहानी ठरविणं हे पाण्याच्या हातात आहे.पाणी पाणी पाणी हीच तर सृष्टीची जीवन कहाणी.

कचरू चांभारे
बीड 9421384434
खूपच सुंदर लेख
Thank you friend
Very nice 👍
Thank you sir
Bahot khubsurat
Thank you sir
खुप छान सर पाणी हेच आपले जीवन आहे पाणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत तरच पृथ्वी टिकेल
Thank you sir
Very nice 💐
धन्यवाद सर
Water is लाईफ