जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे 2024

जागतिक मानवी सेवेचा मानबिंदू जागतिक रेड क्रॉस दिन

जागतिक रेड क्रॉस दिन ,तसं पाहू जाता जनतेच्या, समाजाच्या सेवेसाठी, सार्वजनिक लोक कल्याणासाठी लोक नियुक्त सरकार अशी व्यवस्था संपूर्ण जगाने स्वीकारलेली आहे.कुठे ती अध्यक्षीय लोकशाही आहे वा कुठे ती जनतेतून थेट निवडलेली लोकशाही आहे.


लोककल्याणकारी राज्य राबविणं ही सरकारची जनसंमत तथा कायदेशीर घटनात्मक जबाबदारी आहे.तरीही जगाकडे पाहताना आपल्या असं लक्षात येतं की कित्येक समस्या अशा आहेत की ज्यांचा निपटारा शासन यंत्रणा करू शकत नाही.अशावेळी काही सामाजिक प्रश्नांसाठी अनेक सामाजिक संस्था सेवा भाव वृत्तीने काम करताना दिसून येतात.काही संस्था स्थानिक, तालुका, जिल्हा पातळीवर काम करत असतात तर काही संस्था भाषा,प्रांत,सीमा असे भेद भेदून जागतिक पातळीवर काम करत असतात. दिव्यांग,अनाथ,दुर्धर आजारग्रस्त, बहिष्कृत लोकांसाठी काही संस्था कायमस्वरूपी काम करत आहेत.


रोटरी क्लब,स्माईल ट्रेन,रेड क्रॉस सोसायटी या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आहेत. आज 8 मे , जागतिक रेड क्रॉस दिन.

दरवर्षी 8 मे हा दिवस जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा करण्यात येतो.शांततेचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते हेन्री ड्युनंट यांचा हा जन्मदिवस.मानवतेच्या भावनेतून त्या काळी त्यांनी युद्धभूमीवर जाऊन जखमी सैनिकांना औषधपाणी , अन्न व वस्त्र यांची मदत केली होती.मानवता हाच धर्म डोळ्यासमोर ठेऊन ही संस्था आजही जगात काम करत आहे.


हेन्री ड्युनंट हे व्यवसायाने व्यापारी होते.एकदा ते नेपोलियन तिसरा या राजास भेटायला गेले होते.त्यावेळी इटलीत घमासान युद्ध सुरू होते. बंदुका,तोफा, बॉम्ब यांच्या शोधांनी युद्ध तंत्र, नीती बदलली असली तरी तो काळ समोरासमोरील पारंपरिक युद्धाचा होता. प्रत्यक्ष युद्धावेळी रणभूमीवर शस्त्रांचे खणखणाट होत असे. योद्ध्यांचे रणभेदी आवाजाने व युद्ध थांबले की जखमी सैनिकांच्या वेदनेने विव्हळणाऱ्या आवाजाने आसमंत भेसूर होत असे.वैद्यकीय मदती अभावी वा मदतीच्या विलंबाने कैक जखमी सैनिकांचा तडफडून मृत्यू होत असे. मानवतावादी मूल्यांवर श्रद्धा असलेल्या हेन्री ड्युनंट यांना सैनिकांची वेदना पाहवत नव्हती‌. लढाईतला जखमी सैनिक कोणाच्या बाजूने लढतोय ,हे ड्युनंट यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते त्यांची लढाई जखमेतून निर्माण झालेल्या वेदनेचा पराभव करण्यासाठी होती.करुणा, मानवता,एकता व सेवा या मानवी मूल्यांवर हेन्रींची श्रद्धा होती.त्यांनी त्याकाळी जगभरातल्या युद्ध भूमीवर जाऊन जखमी सैनिक, युद्ध कैदी यांना वैद्यकीय मदत केली.एवढेच नव्हे तर मध्यस्थी करून बंदी सैनिकांना मायदेशी जाण्यास मदत केली.


जागतिक रेड क्रॉस सोसायटी आज जगभरात मानवतावादी कार्य करत आहे. त्सुनामी, नैसर्गिक आपत्ती, समुद्रातील जहाजांचे अपघात,देशा देशातील सीमावाद, नजरचुकीने आंतरदेशीय सीमापार स्थलांतर यांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी रेड क्रॉस सोसायटी काम करत आहे.मानवी दुःख कमी करणे वा दुःखाचे निर्मूलन करणे यासाठी ही संस्था काम करते.


जागतिक रेड क्रॉस दिन साजरा करणे म्हणजे मानवतावादी तत्वांचा उत्सव केल्यासारखे आहे.हे कोणतेही एका धर्माचे,जातीचे ,प्रांताचे वा देशाचे कार्य नाही.ते जागतिक मानवी सेवेचे काम आहे.पांढऱ्या कपड्यावर लाल क्रॉस हे रेड क्रॉस सोसायटीचे ध्वज प्रतिक आहे.


असा मानवता धर्म निभावणाऱ्या भूतकाळात होऊन गेलेल्या सर्व अलौकिक शक्तीच्या मानवांना विनम्र अभिवादन .तसच कार्य आजही चालवत असलेल्या चालत्याबोलत्या दैवी शक्तींना प्रणाम .


रेडक्रॉस दिनाच्या पार्श्वभूमीवर जिओ जिंदगी बीड टीमच्या आपत्कालीन कार्याची आठवण झाली.मी स्वतः व माझ्या सारख्या अब्जावधी लोकांनी प्रत्यक्ष युद्धभूमी व तिथली भयानकता अनुभवलेली नाही व तशी वेळही येऊ नाही.पण चार पाच वर्षापूर्वी कोरोना विषाणूने निर्माण केलेली परिस्थिती कुठल्याही युद्धभूमीपेक्षा कमी नव्हती.कोरोना युद्धभूमीत व पारंपरिक सैनिक युद्धभूमीत फरक एवढाच आहे की सैनिकी लढाईत ढालतलवारी,तोफा, बॉम्बबंदुकीच्या आवाजात माणसं धाराशयी होतात अन् कोरोना युद्धात शस्त्रांचा आवाज न होता हजारोंनी लोक धाराशयी झाली.पारंपारिक युद्धात मरण पावलेल्या ,छिन्नविछिन्न झालेल्या मृत शरीरांचा अंत्यविधी करायला मुभा असते.कोरोना युद्धात बाधीत झालेल्या मृतदेहास कुटुंबाकडून अग्निडाग देता येत नव्हता. शेवटचा विधीही वेदनाही असतो.अशा या माणुसकीच्या शत्रूसंगे लढताना लॉकडाऊन हा एकच पर्याय होता.लॉकडाऊन हा शब्द उच्चारला की लगेच सर्व शट डाऊन होतं ,अशातला भाग नसतो.खूप मोठा जनसमूह असा आहे की त्यांच्या भाकरीची वानवा आहेच.लॉकडाऊनमध्ये घराला लॉकडाऊन करता येतं ,पोटाला नाही.पोटाची आग शमविण्याची ताकद फक्त भाकरीत आहे ,दारातल्या गाडीघोड्यात ,धनसंचयात नाही.


बीड शहराभोवती राहणाऱ्या गरीब कुटुंबाना , निराधारांना ,एकल महिलांना ,स्थलांतरीतांना भाकरीची सक्त गरज होती .माणुसकीची भिंत उभी करून या लोकांना भूकबळीपासून वाचवणं आवश्यक होतं.अदृश्य शत्रू व दृश्य युद्धभूमी या पार्श्वभूमीवर ही लढाई अवघडच होती पण बीडची जिओ टीम रेडक्रॉस होऊन या युद्धभूमीवर उतरली होती.दोन अडीच महिने या टीमने दररोज हजारो भाकरी खेड्यापाड्यातून जमा करून भूकेलेल्यांची तृप्ती केली.जिओ जिंदगी बीड टीमचं हे काम स्पृहणीय ,कौतुकास्पद ,गौरवास्पद आहे.जिओ टीमसाठी झटणारे लोकपत्रकार भागवत तावरे ,भास्कर ढवळे गुरूजी ,दत्ताभाई प्रभाळे ,संतोष ढाकणे, धनंजय गुंदेकर,शाहेदभाई पटेल, जालिंदर काकडे इत्यादींचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.रस्ते निर्मनुष्य झालेली असताना ही माणसं भाकरी घेऊन फिरत होती.वैद्यकीय मदतीसाठी रात्रंदिवस उभीच होती.अशाच प्रकारचं समांतर काम शिक्षक असलेले उद्धव तोंडे ,अंकुश निर्मळ, समाजसेवक सुभाष काळे यांच्याकडूनही राबविले गेले होते.ही सगळी मंडळी त्यांचं अंतस्थ सेवावृत्ती मन ,सेवेवाचून त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं म्हणूनच संकटसमयी ही मंडळी सतत राबत होती. सेवाभाव, सेवावृत्ती मोजक्याच हृदयात जन्माला येते,हेच खरे आहे. ‌

आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिनाची आठवण करताना बीडच्या रेडक्रॉस सैनिकांना सलाम केल्यावाचून आजचा दिनविशेष पूर्ण होऊ शकत नाही.

सेवाभावी व्हा ,सेवेसाठी या ,आत्मबलाचा-आत्मिक शांतीचा आनंद घ्या.
कचरू चांभारे बीड 9421384434

जागतिक रेड क्रॉस दिन संस्थापक

16 thoughts on “जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे 2024”

  1. सेवाभाव, सेवावृत्ती मोजक्याच हृदयात जन्माला येते,हेच खरे आहे. ‌

    Reply
  2. खूप छान आणि समर्पक लेखन आजच्या लेखातून जागतिक रेडक्रॉस दिनाची माहिती खूपच वाचनीय होती

    Reply
  3. अतिशय उत्कृष्ट लेखन मोजक्या शब्दात मांडताना लेखकाचे हृदयस्थ होणे हेच ह्या लेखातून मनाला भावते, कारण बऱ्याच लोकांना रेड क्रॉस के आहे हे ही माहीत नाही त्यामुळे जनजागृती तर होतेच शिवाय, त्यांच्या ज्ञानात ही भर पडते हेच सत्य, खूपच छान लेखन सर👌

    Reply
  4. सिद्धहस्त लेखन.. खूप छान सर 👍

    Reply

Leave a Comment