डॉक्टर्स डे 1 जुलै
डॉक्टर्स डे 1 जुलै
वर्षभरात अनेक दिनविशेष आपण साजरे करतो.त्या त्या दिवसाला ऐतिहासिक ,सामाजिक संदर्भ आहेत.सांप्रत घटनेचा उजाळा म्हणून दिनविशेष औचित्य महत्वाचे ठरते.
डॉक्टर्स डे 1 जुलै दिनविशेषालाही आगळेवेगळे महत्व आहे.1जुलै हा दिवस महाराष्ट्राचे थोर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती अर्थात कृषी दिन सुद्धा आहे.तसेच 1 जुलै दिवस डॉक्टर्स डे म्हणूनही साजरा करतात. दिपावली उत्सवात एक दिवस धन्वंतरी पुजन असते.धन्वंतरी पुजा दिनीही वैद्यकीय सेवेला वंदन केले जाते.धन्वंतरी दिन हा दैवी शक्तीतलं दैवी पुजन आहे तर डॉक्टर्स डे 1 जुलै मानवी देहातलं दैवी वंदन आहे.पण बऱ्याच जणांना डॉक्टर डे 1 जुलै ची पूर्वपिठीका माहीत नाही.
डॉक्टर्स डे 1 जुलै
वाचक मित्र परिवारास डॉक्टर डे 1जुलै ची गौरवता माहीत व्हावी म्हणून आजचा लेखन प्रपंच आहे.
मानवतेचे महान सेवक, थोर स्वातंत्र्य सेनानी ,पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, 1961 चे भारतरत्न पुरस्कार सन्मानित डॉ.विधानचंद्र रॉय यांचा आज जयंती दिन व पुण्यतिथी दिन आहे.त्यांच्या जन्म व मृत्यू स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर डे 1 जुलै साजरा करतात.
1948 ते 1962 सलग चौदा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिलेल्या डॉ.विधानचंद्र रॉय यांची कारकीर्द समाजसेवेची व रूग्ण सेवेची तेवती, निस्वार्थ,प्रकाशमान मशाल आहे.
1 जुलै 1882 रोजी बिहार ,पटना येथे जन्मलेल्या विधानचंद्र यांनी महाविद्यालयीन शिक्षण कोलकाता येथे पूर्ण केले व लंडन येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले . वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली संपूर्ण हयात लोकांना मोफत उपचार करण्यासाठी घालविली.महागडे वैद्यकीय शिक्षण,महागडे उपचार,महाग सुविधा आपण पाहतो आहोत. एक रूपयांचेही शुल्क न आकारणारा डॉक्टर विधानचंद्र रॉय किती मोठे असतील ? नाही का ? भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले.आंदोलन चळवळीतील आजारी लोकांवर शुश्रुषा करण्याचे काम डॉ.रॉय करत असत.
असा हा वेदनेचा मुक्तीदाता मानवतेचा सेवक वयाच्या ऐंशीव्या वर्षी जन्मदिनीच म्हणजे 1 जुलै रोजी 1962 साली हे जग सोडून गेला.त्यापूर्वी एक वर्ष आगोदर म्हणजेच 1961 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.मृत्यूदिनापर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आजचा दिवस डॉक्टर्स डे 1 जुलै साजरा करतात.
पश्चिम बंगालमधील प्रगत व नियोजित शहर म्हणून कल्याणी शहराची ओळख आहे.हे कल्याणी शहर व डॉ विधानचंद्र रॉय यांचे खास नाते आहे.पूर्वी कल्याणी हे कोलकाताजवळील एक छोटे खेडे होते.त्याकाळी डॉक्टर नीलरतन सरकार ही बडी हस्ती कोलकाता शहरात राहत होती.त्यांना कल्याणी नावाची एकुलती एक मुलगी होती.महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यावेळी डॉक्टर नसलेले विद्यार्थीदशेतील विधानचंद्र व कल्याणी यांचा एकमेकांवर जीव जडला . सर्वसामान्य घरातील मुलाचा एखाद्या गर्भश्रीमंत घरातील मुलीवर जीव जडल्यावर काय होते ? हे आपण अनेक चित्रपटात व वास्तवांतही पाहिलेले आहे.तसंच तेव्हाही घडले. डॉ.सरकार यांनी कल्याणीचा हात तर दिलाच नाही पण अवमानजनक भाषा वापरून तरूण विधानचंद्रास चालते केले.या चंद्रानेही मग पुढे सारे विधानच बदलून टाकले.लंडन येथे जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पण इकडे जेव्हा कल्याणीला वडिलांकडून विधानचंद्राचा अपमान झाल्याची गोष्ट माहीत झाली, तेव्हा विधान चंद्राचा अपमानित चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.तिचाही मुखचंद्र काळवंडून गेला.आणि तिने मानसिक दाहात स्वतःचा देह संपविला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आलेल्या नव तरूण डॉक्टर विधानचंद्र यांच्यावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला व ते जन्मभर अविवाहित राहिले. महात्मा गांधी यांच्या समवेत ते आंदोलन चळवळ व रूग्ण सेवा यांत ते गढून गेले.मुख्यमंत्री असताना कल्याणी या ग्राम गावाचा विकास आराखडा त्यांच्या समोर आला तेव्हा त्यांनी कल्याणी नाव अजरामर करण्यासाठी कल्याणी खेड्यास नियोजित शहर बनवले.आज कल्याणी हे शैक्षणिक महाकेंद्र आहे.
डॉक्टर डे 1 जुलै दिवशी आपण सर्वांनी जगातील सर्व डॉक्टरांचे आभार मानायला हवेत.
जीवापेक्षा मोठं काहीच नाही.जिवंत असण्याच्या सुखासोबत इतर सुखाची तुलनाही होऊ शकत नाही.प्रत्येकालाच वेदना विरहित जगणं आवडतं पण गतिमान जीवन इतकं अपघाती बनलं आहे की ,स्वास्थ्याचं अस्वास्थ्य व्हायला काही वेळ लागत नाही.आजार ,अपघात वा काही अनपेक्षित घटनांनी जेव्हा जीवच धोक्यात येतो किंवा जीव अस्तित्वाला हादरा बसतो तेव्हा जाती धर्म संस्काराप्रमाणे प्रत्येकाला आपापला देव आठवो न आठवो पण डॉक्टर मात्र सगळ्यांना आठवतो.वेदनेचा मुक्तिदाता म्हणून अशावेळी धावून येतो तो डॉक्टरच ,तोही अगदी मनातल्या परमेश्वराचा दूत बनून.आजाराप्रमाणे उपचार केला जातो.हा केवळ उपचार नसतो तर आपलं अस्तित्व मिटविण्यास निघालेल्या शक्तीचं निर्मूलन करून आयुष्य वाढविण्याचा नियती सोबतचा करार असतो .अन् या कराराचा मध्यस्थ डॉक्टर असतो.हास्य फुलविणारा माळी म्हणजे डॉक्टर.
बालपणात खडतर अभ्यास ,तरुणपणात वैद्यकीय शिक्षणासाठी घालवलेलं तारूण्य व शिक्षणानंतर संपूर्ण हयात रुग्णांसोबत घालवावी लागते असं साधारण वैद्यकीय सेवकाचं आयुष्य तीन टप्प्यात विभागलं जातं.वैद्यकीय सेवेचे मोल कशातच करता येत नाही.प्राण आता जाऊ पाहे ,अशा अवस्थेतल्या रोग्यांना ,अवयवाची अदान प्रदान केलेल्या रोग्यांना जीवीत्व देणं अत्यंत कठीण काम आहे.जणू काही ईश्वराने दिलेल्या अधिकाराचा वापर करून डॉक्टर मानवी जीवीत्वाचं नुतनीकरण कौशल्याने करत आसतो.डॉ.विधानचंद्र रॉय यांनी स्वतःचे संपूर्ण कौशल्य ,संपूर्ण वैद्यकीय ज्ञान आजारी रूग्णांसाठी केवळ सेवाभावातून मोफतपणे वाटले.डॉ.कोल्हे ,डॉ.आमटे,डॉ.बंग दाम्पत्य ही सुद्धा लोकसेवेतली आजची दीपस्तंभी नावे आहेत.रूग्ण सेवा मोफतच असावी ,असं कुणीच म्हणणार नाही पण ती माफक व वाजवी दरात असावी.असं प्रत्येकजण म्हणेल.संपूर्ण आयुष्याची जमापुंजी एकच आजार अन् ते ही एकाच उपचारात खर्ची होत असेल तर रूग्ण प्रचंड आर्थिक मोबदला हॉस्पिटलमध्ये जमा करण्याऐवजी स्वतः चां जीवच नियंत्याकडे अर्पण करतो. जीव देण्यात शौर्य कसले ? पण ती त्याची हतबलता व अपरिहार्यता असते.म्हणूनच उपचार हे सर्वांच्या आवाक्यातील हवेत व वैद्यकीय सेवा ईश्वरी ऋण आहे ,याची प्रचिती रूग्णास यावी.असा सर्व वैद्यकीय सेवेचा आरसा व वारसा असावा.
डॉक्टर्स डे 1 जुलै.
विधानचंद्र रॉय यांच्याकडे असलेली कमाल उंची गाठणं आजच्या वैद्यकीय सेवेकऱ्यांना कठीणच आहे पण तरीही वाजवी व योग्य मोबदला घेऊन मानवी सेवा देणं कठीण नाही.मानवी देहाला व मनाला वेदनेतून मुक्ती देणाऱ्या सर्व डॉक्टरांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो.व सकल मानवजातीच्या कल्याणासाठी डॉक्टरी उपचारास सुयश चिंतितो.मानवतेचा महान सेवक डॉ.विधानचंद्र रॉय यांच्या जयंती-पूण्यतिथी स्मृतिप्रित्यर्थ पावन स्मृतीस डॉक्टर डे 1 जुलै दिनी विनम्र अभिवादन करतो.
लेखातील फोटो सौजन्य इंटरनेट सेवा.
कचरू चांभारे
मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी
9421384434
kacharuchambhare.com
Best information.
Happy Doctors day 💐
Thanks dear sir
खुपचं छान माहिती मिळाली.
मनःपूर्वक धन्यवाद सर
Happy doctor’s day
मनःपूर्वक धन्यवाद साहेब
उपयुक्त व अभ्यासपूर्ण माहिती
Khup sundar
मनःपूर्वक धन्यवाद काका
मनःपूर्वक धन्यवाद आदरणीय सर
मा. कचरूजी चांभारे सरांनी आज डॉक्टर डे चे निमित्ताने अभ्यासपूर्ण अप्रतिम लेख लिहून सर्व सामान्य यांना माहिती दिली.नव तरुणांना शैक्षणिक माहिती आहे. यास सरांचे अभिनंदन.🙏💐
सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा! तुमचे समर्पण आणि तुम्ही केलेले उपचार यामुळे जगाला उद्याचा काळ चांगला मिळेल.
🩺🩻💊💉🩸🧬💐💐💐
सर्व डॉक्टरांना डॉक्टर डे च्या हार्दिक शुभेच्छा
अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख.
मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर आणि विस्तृत लेख आहे, ही माहिती खरच त्यामानाने बहुतांशी लोकांना अज्ञात च असावे, त्याकरिता खुप खुप धन्यवाद … !!
या डॉक्टर नावाच्या देवदूताचे अखिल जनमानसावर अगणित उपकार आहेत .. !!!
त्यांच्या शिवाय जनजीवन अशक्यच आहे … !!
प्रिय दादा, खूप खूप धन्यवाद