भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेश नोंद

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

सात नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थी दिवस म्हणून घोषित झालेला आहे.या दिवशी ज्ञानाचे प्रतिक असलेल्या भारतरत्न विश्ववंद्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश झालेला आहे.

विद्येविना मती गेली ,
मती विना नीती गेली,
नीती विना गती गेली,
गती विना वित्त गेले
आणि वित्त विना शूद्र खचले
.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुलेंचे हे सुवचन शूद्र खचण्याचे कारण म्हणजे विद्येचा अभाव . महात्मा फुले यांनी शिक्षणविषयक क्रांतीकारी विचार मांडले आहेत. महात्मा फुलेंचे महानिर्वाण 1890 सालचे व बाबासाहेबांचा जन्म त्यानंतर अवघ्या पाच महिन्यानंतरचा जणू शूद्रास खचू न देता साऱ्याच वंचितांचा उद्धार करण्यासाठी तात्यासाहेबांचा संदेश फलद्रूप करणारा.

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024


7 नोव्हेंबर 1900 या दिवशी राजवाडा चौक सातारा येथील शासकीय हायस्कूल मध्ये भिवा रामजी आंबेडकर यांचा इंग्रजी पहिल्या इयत्तेत प्रवेश झाला.ही प्रवेश नोंद शाळेच्या प्रवेश अभिलेख्यात प्रवेश क्रमांक 1914 वर आहे.वर्तमान व भविष्य उज्वल झाल्यावर भूतकाळातील काही ठोस खुणांना सुवर्ण झळाळी लाभत असते. बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन अनेक अर्थाने अलौकिक आहे.म्हणून ही तारीख असामान्य आहे.


भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 24 नोव्हेंबर 2024

श्रीकृष्ण जन्माची कथा आपण ऐकलेली आहे.देवकीच्या पोटी जन्म घेणारे बाळ कंसाचा अंत करणार असते.म्हणून कंस देवकी व वासुदेवाला अंधारकोठडीतले आयुष्य फर्मावतो .इतकंच करून तो थांबत नाही, तर देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची हत्या करत ,भविष्यवाणीने लिहिलेल्या मरणातून तो स्वतःची मानसिक सुटका करून घेत असतो.पण देवकीचे आठवे अपत्य बाळ श्रीकृष्ण, कंसाच्या अंधारकोठडीतून निसटते व कंसाच्या हाती पडते दोष नसलेली एक दुर्दैवी अभागी कन्या. अन् पुन्हा आकाशवाणी होते कंसा ,तुला मारणारा बाळ गोकुळात नंदाघरी वाढतो आहे‌.
डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस लिहिताना मला श्रीकृष्ण जन्माची कथा आठवली. 7 नोव्हेंबर इंग्रजी साल 1900 या दिवशी शाळेच्या प्रवेश रजिस्टरवर 1914 क्रमांकावर कोरा रकाना भीमराव रामजी आंबेडकर या नावाने भरला जात असताना शेवटच्या रकान्यात छोट्या भीमाची स्वाक्षरी घेताना त्याचक्षणी पुराणातली आकाशवाणी पुन्हा गरजली असती तर बोलली असती….

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

हाच शाळा प्रवेश भीमा तुला भीमराव करणार आहे ‌,हाच शाळा प्रवेश भीमरावचा बाबासाहेब करणार आहे.

उद्धरली असंख्य कुळे बाबा तुमच्यामुळे 
धन्य होतील ते गुरूजी,त्या शाळा,ती विश्वविद्यालये , ती विद्यापीठे जिथे जिथे तुम्ही नांदले‌‌‌.धन्य होईल ही भूमी ,जिथं घडले  बाबासाहेब. आकाशवाणी कडक वाणीत पुढे  गरजली असती,

धर्ममार्तंडांनो,जोखडात जखडून ठेवलेल्या दस्यूंना मुक्त करणारा मुक्तिदाता ,दलितांचा कैवारी,ज्ञानाचा प्रकांड प्रज्ञासूर्य,क्रांतिसूर्य ,युगप्रवर्तक द्रष्टा साताऱ्याच्या शाळेत शिकत आहे.तो आहे विद्येचा निष्ठावंत पाईक विद्यार्थी भीमराव.जगाच्या पाठीवर तहहयात ज्ञानवंत म्हणून ओळखला जाणारा चिमुकला शाळेत दाखल झाला आहे.

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

शिक्षण हेच एकमेव उत्थानाचे साधन आहे व शिक्षणासाठी बाबासाहेबांनी घेतलेल्या मेहनतीची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी म्हणून हा शाळा प्रवेश दिन आहे. डॉ .एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे वाचन दिन,पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या नावे शिक्षण दिन ,डॉ.राधाकृष्णन् सर्वपल्ली यांच्या नावे शिक्षक दिन आहे.अशाच प्रकारे ज्ञानाचे प्रतिक असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन हे नाव असावे.यासाठी सातारा येथील पत्रकार अरूण जावळे यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला व अजूनही सुरूच आहे. 2001 सालापासून अरूण जावळे विद्यार्थी दिवस साजरा करतच होते.अखेर 2017 साली सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दखल घेऊन 27 ऑक्टोबर 2017 रोजी शासन निर्णय घेऊन 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस घोषित केला.प्रस्तुत आंदोलनकर्ता आता भारतभर विद्यार्थी दिवस साजरा व्हावा यासाठी लक्ष वेधतो आहे.

जुने प्रतापसिंह हायस्कुल

सातारा ही शिवछत्रपतींची गादी.दैवत छत्रपतींचे वारस तिथे नांदले‌‌‌ आहेत.प्रतापसिंह राजे भोसले हे एक वारसदार राजे होऊन गेले. 1951 पासून या शाळेला प्रतापसिंह भोसले हायस्कूल असे नाव आहे ‌‌.ही शाळा इंग्रजांच्या काळापासून सरकारी आहे व आजही सरकारीच आहे.सुरूवातीला इथे इंग्रजी चौथीपर्यंत वर्ग चालत,आता तिथे पाचवी ते दहावी वर्ग चालतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र दाभोळकर, न्यायमूर्ती गजेंद्र गडकर हे या शाळेचे माजी विद्यार्थी. विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने शाळेतील मुलांना शाळेचा प्रगल्भ वारसा वाचायला,ऐकायला मिळतो व त्यांना प्रेरणा मिळत आहे.

भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

आजचा पालक शिक्षणाविषयी कमालीचा जागरूक आहे.शासन,खाजगी शाळा यांनीही शिक्षणाची दरवाजे सर्व सुविधांनी उघडी केली आहेत.शिक्षण घेण्याची संधी ,वातावरण तयार आहे फक्त विद्यार्थी शिक्षणाच्या साच्यात घालायचा आहे. पण बाबासाहेबांच्या काळी व त्यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. म्हणूनच बाबासाहेबांचे शिक्षण हे प्रतिकूलतेच्या छाताडावर दिलेला जोरदार ठोसा आहे.


जातिभेदाच्या,रूढी परंपरांच्या शृंखला इतक्या मजबुत की,ठोसा मारणारा रक्तबंबाळ व्हावा पण बाबासाहेबांचा भीम प्रहार इतका शक्तीशाली होता की ,शृंखला खिळखिळ्या झाल्या व कैक पिढ्यांच्या अंधारकोठडीत प्रकाश किरण पोहचला.
कोलंबिया विद्यापीठातून एम.ए.अर्थशास्त्राची डॉक्टरेट,लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स ॲंड पॉलिटिकल सायन्समधून मास्टर ऑफ सायन्स आणि येथूनच डॉक्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स, लंडन येथूनच बॅरिस्टर या बाबासाहेबांनी मिळविलेल्या पदव्या आहेत.शैक्षणिक वारसा असलेले वा उच्चभ्रू इथपर्यंत जाणं ,हे होऊ शकतं परंतु व्यवस्थेने अक्षरशत्रू ठरवलेल्या ,गुलाम शूद्र जातीत जन्माला येऊन हे साध्य करणं.किती कठीण असेल ? कल्पनेसही आपण अपुरे पडू. बाबासाहेबांनी सातासमुद्रापलीकडे जाऊन ज्ञानामृत प्राशन केले. बाबासाहेबांच्या यशाची पायाभरणी त्यांच्या साताऱ्याच्या प्राथमिक शाळेत आहे.


भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024

डॉ.बाबासाहेब यांच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचे वडील सुभेदार रामजी हेच बाबासाहेबांचे गुरू ,मार्गदर्शक व आधारस्तंभ होत.आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीत सुभेदारांनी बाबासाहेबांना शिकविले आहे.भिवाने मागितलेले पुस्तक देण्यासाठी ते आपली सारी मिळकत खर्च करत असत.


छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव महाराज यांनीही बाबासाहेबांना शिक्षणासाठी भरीव सहकार्य केले.थोरांची ओळख झाली.
परदेशात शिक्षण घेण्याची संधी बाबासाहेबांना मिळाल्यामुळे तिथल्या लोकशाही ,मुक्त वातावरणाचा अभ्यास करता आला. प्रचंड साहित्य वाचत ,अथांग ज्ञान गोळा करता आले.त्यांमुळेच बाबासाहेब विद्वत्तापूर्ण, बिनतोड लेखन करू शकले.


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024 ‌

डॉ. बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास प्रचंड खडतर आहे ‌. बुद्धीने ते संगतीतल्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीही उंच असले पण सामाजिक जातीय उतरंडीनुसार ते इतर विद्यार्थ्यांच्या नजरेत खुजेच होते. नळावर जाऊन पाणी पिण्यासही त्यांना मज्जाव होता.या सीमा रेषा अदृश्य होत्या पण भयंकर होत्या. उच्च विद्या प्राप्त झाल्यावरही भेदाभेदातून त्यांची सुटका झाली नाही. बडोदा संस्थानातील नोकरीत त्यांना जातीभेदाचे कडवट आवंढे पचवावे लागले.
अक्षरशत्रू ठरविलेल्या जातीत जन्माला येऊनही बाबासाहेबांनी विद्येतील सर्वोच्च अक्षरे गिरविली‌. दारिद्याने खितपत पडावी ,अशी समाज रचना असलेल्या समाजात येऊन बाबासाहेबांनी पैसा या विषयावर पीएचडी करून ब्रिटिश सत्तेला खडे बोल सुनावले.


विद्यार्थी हा श्रेष्ठ आचरण करणारा व नियमित विद्या ग्रहण करणारा असावा.हे आदर्श विद्यार्थी बाबतचे एक टिपण आहे. डॉ बाबासाहेबांचे आयुष्य पाहता ते आजन्म आदर्श विद्यार्थी होते ,हे दिसून येते.परदेशात शिक्षण घेताना अनेक विद्यार्थी मौजमजा करण्यात दिवस घालवत असत‌ . बीए अनुत्तीर्ण झाल्यास बी ए फेल्ड असं पाटी लावत असत.फेल्ड हा अवमान न वाटता अभिमान वाटत असे कारण तो काळ बी ए पर्यंत प्रवास म्हणजे खूप मोठे यश माननारा होता. बाबासाहेब बी ए,डॉक्टरेट, वकिली असं सारं शिक्षण परदेशात ,उच्च विद्यापीठांत पूर्ण करू शकले कारण ते ज्ञान परायणतेचे आदर्श विद्यार्थी होते.


शिवछत्रपतींच्या चरित्रात अफजलखान वध,औरंगजेबाच्या तावडीतून गरूडझेप,राज्याभिषेक हे टप्पे इतिहास नव निर्मितीचे महत्वपूर्ण अधोरेखित अंग आहे.तसंच बाबासाहेबांच्या आयुष्यातही शाळा प्रवेश हा एक महत्वाचा दिन विशेष आहे. या विशेष दिनाने बाबासाहेबांसाठी जागतिक ज्ञानाच्या खुल्या आकाशाची दारं उघडली गेली.
अवकाशात झेपावलेल्या विमानाची झेप यशस्वी होण्यासाठी धावपट्टीवरील आरंभीचा प्रवास निर्धोक व्हायला हवा.बाबासाहेबांनी शिक्षण,राजकारण, समाजकारण,देश परदेश असं सारं काही कवेत घेतलं,त्याची बीजे सातारच्या इंग्रजी प्राथमिक शाळेत आहे.


भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर चिरायू होवो.

कचरू चांभारे बीड
chambhareks79@gmail.com
9421384434

डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन

12 thoughts on “भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024”

  1. माय बापा हून भीमाचे उपकार लय हाय र, आपून खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र…… विनम्र अभिवादन.

    Reply
  2. अनिशय नविन व माहिती पूर्ण लेख .
    आवडला मला. पुढच्या पिठीसाठी बोधप्रद. Happy student day to you and your school s student.

    Reply
  3. अतिशय नविन व माहिती पूर्ण लेख .
    आवडला मला. पुढच्या पिठीसाठी बोधप्रद. Happy student day to you and your school s student.

    Reply
  4. अतिशय माहितीपूर्ण लेखन
    अवकाशात झेपावलेल्या विमानाची झेप यशस्वी होण्यासाठी धावपट्टीवरील आरंभीचा प्रवास निर्धोक व्हायला हवा.बाबासाहेबांनी शिक्षण,राजकारण, समाजकारण,देश परदेश असं सारं काही कवेत घेतलं,त्याची बीजे सातारच्या इंग्रजी प्राथमिक शाळेत आहे……..

    Reply

Leave a Comment