मतदार मतदाजागृती विषयी एका मुलीचे आई बाबास पत्र 13 मे 2024

तीर्थरूप आईबाबांच्या चरणी सा.दंडवत.
#मतदार मतदान जागृती

पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल,पण विषय खूपच महत्वाचा होता म्हणून लिहायला हाती घेतले आहे.मतदानमतदार जागृती विषयी मला तुमच्याशी बोलायचे आहे.


आपल्या बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होत आहे.शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी आमच्या शाळेत गुरूजींनी मतदार जागृती बाबत निबंध स्पर्धा घेतली होती.मतदान जागृती बाबत गावातून प्रभातफेरीही काढली होती.शाळेत आल्यावर आम्हीही आमच्या टीचर कापसे ताईंना मतदान बाबत माहिती विचारली होती.तेव्हा त्यांनी आम्हाला आपला देश, लोकशाही राज्यव्यवस्था, निवडणूक,मतदान ,मतदार नोंदणी,मतदान हक्क इत्यादी बाबतीत खूप छान माहिती सांगितली.त्यातली बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे.


प्रिय आई,आपला देश जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे.ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. गरीब,श्रीमंत,जात , धर्म, पंथ,भाषा,वर्ण ,लिंग असा कोणताही भेद लोकशाहीत अमान्य आहे. देशातला मतदार देशाचे सरकार ठरवतो.क्षेत्रफळाने व लोकसंख्येने आपला देश खूप मोठा आहे.त्यामुळे देशभरात वेगवेगळ्या दिवशी सात टप्प्यात मतदान होत आहे.त्यामुळे सुरक्षा व्यवस्था, मतदान साहित्य, अधिकारी कर्मचारी यांची वाहतूक व्यवस्था इत्यादी कामाबाबत प्रशासनावर ताण येत नाही.आपल्या बीड जिल्ह्यात मतदानाच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. येत्या जून महिन्यात मला सोळा वर्षे पूर्ण होतील व सतरावं लागेल.मतदाता होण्यासाठी मला वयाची अठरा पूर्ण करावी लागतील.आपल्या देशात वयाची अठरा वर्षे पूर्ण करणारास मतदान नाव नोंदणी करता येते व नाव नोंदणी केलेला मतदार मतदान करू शकतो. यावेळी तू,बाबा व दादा मतदानास जा .पुढच्या लोकसभेवेळी आपण चौघेही एकत्रच मतदानास जाऊ. पंढरपूरला तू व बाबा जसे सोबत जातात,तसंच मतदानालाही सोबत जा‌.मतदान हा सुद्धा एक महा उत्सवच आहे.हसत खेळत हा उत्सव पार पडायला हवा

#मतदार मतदान जागृती

मी इकडे मामाच्या गावी मजेत आहे.वर्षभराचा पारंपरिक अभ्यास,रोजचीच धावपळ यांतून मुक्त आनंद घेत आहे‌.पुस्तकाच्या बाहेरचं जग पाहत आहे.मागच्याच आठवड्यात आम्ही भैरवगड शिरपुंजे किल्ला पाहून आलो.खूप धमाल केली.भैरवनाथाचे दर्शन झाले.गडकोटाची माहिती घेतली.मामाच्या गावचे मतदानही मागच्याच आठवड्यातच पार पडले.मी मामामामीसोबत मतदान केंद्रावर गेले होते.मतदार, मतदान प्रक्रियेतील अधिकारी,सेवक वगळता फक्त कडेवरील लहान मुलांसच मतदान केंद्रात जाता येते‌. मामा मामी मतदान करून येईपर्यंत मी बाहेरच थांबले होते.पण माझं हे बाहेर थांबणं वाया गेलं नाही ‌.

#मतदार मतदान जागृती

मला तिथं पोलीस बंदोबस्तात असलेली शिल्पा नावाची पोलीस महिला ताई भेटली. बोलता बोलता सहज ओळख झाली व आमच्या छान गप्पा झाल्या.ही शिल्पा तीन वर्षांपूर्वीच पोलीस सेवेत दाखल झाली आहे.तिला एक दीड वर्षाची छोटी मुलगी आहे. घरी असलेल्या बाळासाठी आई म्हणून तिचं मन खूप काळजीत होते पण निवडणूक कामांत हयगय चालतच नाही.ती मला तिच्या पोलीस सेवेतील भरतीतील अभ्यास,सराव सांगत होती.का कोण जाणे ? पण तिचं ऐकत असताना मलाही मीच पोलीस झाल्यासारखं वाटत होते. माझं खो खो, कबड्डी खेळातलं चापल्य व वेगवान धावणं पाहून माझ्या टीचरही मला नेहमी म्हणतात की तू सहज पोलीस होशील.मतदानावेळी ही नवीन शिल्पाताई भेटली अन् जणू तिनं माझ्या पोलीस होण्यावर शिक्कामोर्तबच केलं.पण आई ,माझी स्वप्न सरकारी सेवेत येण्याची असली तरी पोलीस होण्याचं स्वप्न नाही बरं.
बरं जाऊ दे,मुद्द्याचे बोलते. इकडे मामाच्या मतदारसंघात फक्त बावन्न टक्के मतदान झाले आहे. तुला हे टक्के म्हणजे नीट समजणार नाही पण सोपं आहे ते.टक्के म्हणजे पूर्ण शंभरातला वाटा. बावन्न टक्के म्हणजे एका भाकरीतली अर्धीच भाकर.आई ,हे प्रमाण खूप कमी आहे.तू मतदानाला जाताना शेजारच्या काकू,मावशी ,आजी यांना घेऊन जा. आपल्या देशाचे धोरण व कल्याणकारी राजवट ठरविणारी ही निवडणूक असते. आपल्या मनातल्या नेत्यास,पक्षास मत देता येतं.

#मतदार मतदान जागृती

आपला दादा या वर्षी पहिल्यांदाच मतदान करणार आहे.त्याच्या मनात खूप उत्सुकता असेल. महिला सुरक्षितता ,शिक्षण ,नोकरी व रोजगार निर्मिती करणारं सरकार येईल अशा उमेदवारास मतदान कर म्हणावं. तसंच त्याला हे ही सांग , आमच्या सर ,मॅडम व आम्ही मुलांनी आमची शाळा खूप सुंदर बनविली आहे. मतदारांना सांग की ईथं शाळा परिसरात कुणी तंबाखू, गुटखा खाऊन थुंकू नका.शाळा परिसरात घाण करू नका.झाडांची काळजी घ्याआई ,तुला एक सांगायचंच राहिले,यावर्षी कलेक्टर मॅडमनी वृद्ध,दिव्यांग लोकांची घरूनच मतदान करण्याची सोय केली आहे.बीडच्या जिल्हधिकारी दीपा मॅडम एक कर्तबगार अधिकारी आहेत.आणि आई,तुला खरं सांगू का ? पोलीस शिल्पाताई हे माझं स्वप्न नसून जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ हे माझे स्वप्न आहे.पोलीस होणं हे उंच स्वप्नांवर पोहोचलेच नाही, तर शेवटचा थांबा आहे.जिल्हाधिकारी दीपाताईंनी निवडणूक कामाचे नियोजन खूप छान केले आहे. डोंगरे काकांची विजयमाला दिव्यांग आहे.तिचे नाव मतदान यादीत आहे पण तिला थोडंही चालता येत नसल्याने तिला कुणी मतदानाला घेऊन जात नाही ‌.मागच्या ग्रामपंचायत निवडणूक वेळी तिला दोन पुरूषांनी उचलून मतदान केंद्रात नेले होते‌. ते जरी तिचे आप्त असले तरी पुरूष स्पर्शाने मुलींचे मन संकोचतच ना गं आई ?.तिची भेट घेऊन तिला सांग,काळजी करू नकोस.यंदा तुझं मत घरी येऊन घेतलं जाईल.बाबांना म्हणावं आपल्या शाळेतल्या जाधव गुरूजींना भेटून गावातले ८५ + वयोवृद्ध व दिव्यांग लोकांची माहिती कळविली आहे का ? हे विचारा.

#मतदार मतदान जागृती

आई ,तुला वाटत असेल आपली पोर तर लहान आहे .मग हिला इतकं कसं समजलं असेल? अगं आई वर्षभर आमच्या शाळेत काही ना उपक्रम, कार्यक्रम सुरूच असतात.त्यातून आम्हाला माहिती मिळते.तसेच टीव्ही पण मदतीलाच आहे.जाहिरातीतून वेगवेगळे पक्ष,त्यांची विचारधारा कळतेच ना‌.बरं तसंही मी काही फार छोटी नाही.आणि तसंही आमची पिढी स्मार्ट व हुशार आहेच पण ते आईवडिलांच्या लक्षात येत नाही.दोन वर्षांनी माझेही नाव मतदान यादीत असेल.अजून एक तुला सांगायचे म्हणजे मतदानाला जाताना तुझे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड न्यायला विसरू नकोस.तस़ं तर सरांनी आम्हाला वेगवेगळे ओळखपत्र सांगितली होती पण त्यातले आपल्याकडे बरीच नाहीत.आपलं साधंसोपं, सरळ आधारकार्ड घेऊन जा.मतदानास सोबत आलेल्या सर्वांना ओळखपत्र सोबत घेतले बाबतची आठवण करून दे.

#मतदार मतदान जागृती

गुरूजींनी दिलेली पोल चिठ्ठी सोबत ने.ती सरकारमान्य आहे ‌.त्यामुळे आपला नंबर लवकर सापडतो व वेळ वाचतो. गावातल्या एजंटने वाटलेली चिठ्ठी सोबत नेऊ नकोस,त्यावर उमेदवाराचे नाव व चिन्ह असते‌.नाव व चिन्ह असलेल्या कागदात मतदान केंद्रात घेऊन जाण्यास बंदी असते.मतदान केंद्रात गेल्यावर उमेदवारांची नावे व चिन्ह असलेल्या तीन मशिन दिसतील .उगीच गोंधळून जाऊ नकोस.सर्व चिन्ह,नावे व्यवस्थित पाहा व मगच मतदान कर.तू केलेले मतदान बरोबर आहे की नाही,हे तिथं ठेवलेल्या डब्यासारख्या मशिन मध्ये दिसते.हे फार गुप्त असते.तू केलेले मतदान कोणालाही दिसतही नाही व कळतही नाही.निर्भय होऊन मतदान कर.तो तुझा अधिकार आहे.दादाला लहानपणापासून राजकीय पक्षांचे रंगीबेरंगी रूमाल,टोपी घालायला फार आवडते.पण आता तो मतदाता झाला आहे.असले साहित्य अंगावर घालून मतदान केंद्रात जाता येत नाही.उगीच कुणासोबत हुज्जत घालू नकोस म्हणावं.आता मतदान केंद्रावर वेब कॅमेऱ्यांची नजर असते‌.


कडक ऊन्हाचे दिवस आहेत. राजकीय लोकांनी आपले भविष्य धुसर केलेले आहे तरीही मतदानाला जाण्याचे टाळून नकोस. आज रोजी राजकीय धोरणांवर उद्योजकांचा पगडा दिसत असला तरी लवकरच सरकारात शेतकऱ्यांची मालकी दिसून येईल. असुरक्षित शेतमाल भावामुळे शेतकऱ्यांची खदखद फार त्वेषाने बाहेर येईल , तेव्हा सरकार कोणाचेही असो, त्यांना कृषी धोरणाचा फेरविचार करावा लागेल ‌.
आई ,बाबा तुम्ही मतदानाला आवर्जून जा.मतदान करा‌‌.एक छानसा सेल्फी काढा व मला पाठवा‌.मी तो फोटो आमच्या शाळेच्या ग्रूपवर पाठवेल व खाली लिहिल माझ्या आईबाबांनी मतदान केले आहे ‌.तुमच्या आईबाबांनी मतदान केले आहे का ? किती छान ना !
तुझीच
साराक्षी (मोनू).

शब्दांकन

कचरू सूर्यभान चांभारे 9421384434

#मतदार मतदान जागृती 13 मे 2024

24 thoughts on “मतदार मतदाजागृती विषयी एका मुलीचे आई बाबास पत्र 13 मे 2024”

    • छान आणि सुंदर लेख आहे हा, मतदाराने कसे मतदान करावे, कोणकोणते निकष पाळावे, काय काळजी घ्यावी, कोणाला मतदान करण्यापूर्वी कसा सखोल विचार करावा, वगैरे वगैरे सारे छान आणि सविस्तर लिहिले आहे, वयोवृध्द लोकांना, दिव्यांगांना यावर्षी घरपोच मतदानाची व्यवस्था केलेली आहे वगैरे सगळे काही या लेखात आलेले आहे…

      धन्यवाद..

      Reply
  1. खूपच छान पत्र , मतदान हे एक आपले अमूल्य व मूलभूत कर्त्यव्य आहे हे सर्वांनी आधी केलेच पाहिजे

    Reply
  2. #मतदार मतदान जागृती विषयी एका मुलीचे आई बाबास पत्र 13 मे 2024
    या विषयावर…अप्रतिम लेख.
    मा.चांभारे सरांनी स्वतंत्र भारत देशात व जगभर्यात सर्वात मोठा उत्सव साजरा होत आहे.त्या मुलींचे आई वडील व मतदारांना आवाहन करीत आहे की आपले अमूल्य मत या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारास द्यावे.
    शासकीय यंत्रणा पण टक्केवारी वाढली पाहिजे खूप प्रयत्न करतात.
    टक्केवारी कमी होण्याचे कारण माझे मते.
    यादी दोन तीन महिन्या अगोदर प्रसिध्दी होते.मतदार किंवा आपले लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिले तर त्या मतदाराचे नाव यादीत व कोणत्या बुधवर आहे.त्यास माहीत पडेल.
    24 लोकसभा उत्सव बघायला जगातून सरकारने 25 देशाचे अभ्यासक बोलविले आहे.आणि असेही बरेच विदेशी पर्यटक हा उत्सव बघायला येत आहेत.
    मला अभिमान आहे माझे अमूल्य मत दिल्याचा. प्रतेक निवडणुकीत माझे अमूल्य मत देत आहे.
    सरांनी या माध्यमातून जनजागृतीचे अविस्मरणीय कार्य करीत आहे.सरांना व त्यांचे सोबतचे सर्वांचे लोकशाही,संविधान प्रचार प्रसिद्धी करण्यास खूप खूप शुभेच्छा.
    🌹🌹🌹

    Reply
  3. आपल्या जीवनात शिक्षकाचे महत्व ..

    तीन मूलभूत नाती.. आई, शिक्षक , सद्गुरू पैकी एक.
    या महत्वाला पर्याय नाही. जसं आई ही पहिली गुरू
    घरातली, याचप्रमाणे शिक्षक हे पहिले गुरू शाळेतले.
    बाहेरच्या जगातले पहिले पाऊल शाळेतले असते.
    विद्यार्थी हा कच्च्या मातीचा गोळा असतो. त्याला
    आकार द्यायचे काम शिक्षक करत असतात. आणि
    पोटच्या गोळ्याला म्हणूनच “आई “.. आपल्यापासून
    दूर ठेऊ शकते. दिवसातल्या अर्ध्यापेक्षा जास्त वेळ
    शाळेत जातो, मुलं मोठी होत जातात तसे.
    आकार देऊन थांबता येत नाही, तर
    त्याला घडवायचं काम, त्यावर नक्षीकाम करणं,
    रंग देणं शेवटी परीक्षा म्हणजे त्याला भट्टीत
    घालून भाजणं. इथे भाजणं म्हणजे ज्ञान, संस्कार
    यांची भट्टी म्हणू . हे सारे सोपस्कार करतो, या
    मुलं नावाच्या मडक्यावर, तेंव्हा कुठे खणखणीत
    मजबूत मडके तयार होतात. आणि हे काम
    कांही साधं सोपं नसतं. विणकरासारखं असतं,
    शिक्षकांचं पण. नजरचुकीने पण एखादा धागा
    सुटला तर पुढे वीण पक्की होत नाही. विरल्यासारखी,
    एकच रेषा साऱ्या कापडाचे सौदंर्य कमी करते.
    चांगले विद्यार्थी घाडविण्यासाठी शिक्षकाला
    स्वतःला अग्निपंरीक्षा द्यावी लागते. मुलांना
    ओळखणं, त्यांना जोखणं, त्यांची झेप किती आहे
    बुद्धीची, ज्ञान ग्रहण करण्याची, आवड निवड,
    मानसिकता, आळस अशा अनेक गुणांची पारख
    करणं हे मोठं जिकिरीचं काम असतं.
    ते हाडाचे शिक्षक आहेत, असं म्हणताना ऐकतो.
    याचा अर्थच असा की, त्यांच्या कृतीत, त्यांच्या वृत्तीत
    फक्त आणि फक्त विद्यार्थी घडविणे, फक्त अभ्यासक्रम
    पूर्ण करणं, ज्ञानदानाचं काम नाही तर मतदान….
    “दान ” या शब्दाची महती अफाट आहे आणि “मत ”
    एक एक मत किती महत्वाचा असतो, हे बालमनावर
    रुजविण्याचं कार्य, या निबंधातून साकार केलंत,
    मस्त संकल्पना आणि आई बाबांना लिहिलेलं पत्र
    भन्नाट 👍🏼 ” सारा ” बेटा अभिनंदन.
    खूप मोठी हो 🤗 गुरुजी खूप धन्यवाद 👍🏼🙏🏼

    Reply
  4. खूपच छान सर,मतदार मतदान जागृती काल्पनिक पणअगदी उत्कृष्ठ शब्दांत केली आपण.

    Reply
  5. खुपच छान सुंदर शब्द, , समयसुचक माहितीनुसार लेख,
    खूप खूप अभिनंदन आणि आभार.

    Reply
  6. खुप छान 🌷
    अतिशय सुंदर आणि उत्तम शब्द रचना करुन मतदान व मतदार यांचं लोकशाहीसाठी किती महत्त्व आहे हे लाडकीन या पत्रातून अधोरेखित केले आहे. Very nice and useful article 🌷🌹

    Reply
  7. खूप छान लेख आहे सर मतदान जनजागृती अभियान आपण सर्वांनी राबविले आणि विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग ही नोंदवला .देश, प्रशासन व्यवस्था आणि सुजाण नागरिक म्हणून त्यांचे कर्तव्य . खूप काही या लेखाततुन अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला गेला आहे.प्रेरणादायी लेखन खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

    Reply
  8. खूप छान लेख आहे सर मतदान जनजागृती अभियान आपण सर्वांनी राबविले आणि विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग ही नोंदवला .देश, प्रशासन व्यवस्था आणि सुजाण नागरिक म्हणून त्यांचे कर्तव्य . खूप काही या लेखाततुन अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला गेला आहे.प्रेरणादायी लेखन खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

    Reply

Leave a Comment