छत्रपती शिवरायांचा सहभाग असलेली समरभूमी उंबरखिंड मोहीम
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
छत्रपती शिवरायांचा सहभाग असलेली समरभूमी उंबरखिंड मोहीम
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाची थेट भेट घेऊन खानाला नेस्तनाबूत करणे व पुण्याच्या लाल महालात लाखो फौजेसह डेरेदाखल झालेल्या शायिस्ताखानास मात देणे. या दोन्ही अचंबित पराक्रमाचे प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर गारूड आहे.या पराक्रमाच्या आठवणीला शौर्याचा गोडवा आहे.महाराजांच्या स्वराज्य मोहिमांचे वैशिष्ट्ये म्हणजे काही मोहिमांत शिवराय स्वतः जातीने सहभागी झाले आहेत व काही मोहिमा तानाजी मालुसरे, नेतोजी पालकर, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर आदि सरदार,सुभेदार मावळ्यांनी केलेल्या आहेत.
शिवछत्रपतींचा सहभाग असलेली,महाराजांच्या बुद्धी चातुर्याची एक अनोखी लढाई आजच्या दिवशी समरभूमी उंबरखिंड येथे घडली होती.या समरभूमी रणसंग्रामाला 2 फेब्रुवारी 2025 रोजी 364 वर्षे होत आहेत.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
2 फेब्रुवारी 1661 रोजी कारतलबखानास शिवरायांनी दाती तृण धरून पूर्णतः शरण यायला भाग पाडलं व उंबरखिंड युद्धास पूर्णविराम दिला.लढाईचा प्रत्यक्ष दिवस असा 2 फेब्रुवारी असला तरी इतिहासातील घटनेकडे एक दिवसाची लढाई म्हणून पाहता येत नाही.शेवटच्या क्षणी मिळालेला विजय वा पराजय हा त्या लढाईचा अंतिम भाग असला तरी हा क्षण घडून येण्यामागे अनेक दिवसांचे , अनेक वर्षांचे वेगवेगळे संदर्भीय साखळी भाग असतात.
उंबरखिंड मोहीम ही स्वराज्य संग्रामातील एक सोनेरी पान आहे.या लढाईची पाळंमुळं शायिस्ताखानाशी संबंधित आहेत.शायिस्ताखान ही आसामी मोठी मातब्बर होती.तो औरंगजेबाचा मामा होता , इतकीच मर्यादित ओळख शायिस्ताखानाला नव्हती.गुजरात माळवा प्रांताच्या सुभेदारीचा दांडगा अनुभव त्याच्याजवळ होता.स्वराज्याचा पाडाव करण्यासाठी औरंगजेबाने सर्व ताकदीनिशी पाठवलेला तो एक मातब्बर सरदार होता.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
शायिस्ताखान पुण्यात येऊन दाखल झाला.दोन वर्ष त्याने स्वराज्यात धुमाकूळ घातला पण शिवराय काही आणखी समोरासमोर चाल करून आलेले नव्हते.अफजलखानाला धुळीस मिळविणे व पन्हाळागडावरून शिताफीने निसटून जाणे या दोन्ही घटनांनंतर शिवरायांनी आदिलशाहीतला बराचसा प्रांत स्वराज्यात सामील केला होता.आदिलशाही खिळखिळी झाल्यानंतर महाराजांनी मोगलाईकडे मोर्चा वळवला.अशातच शायिस्ताखानासोबत दिमतीला असलेल्या कारतलबखानाने आदिलशाही ताब्यातील बलाढ्य परांडा किल्ला मुघल सत्तेत सामील केला.या पराक्रमामुळे कारतलबखानाचे मोगल दरबारात वजन वाढले.शिवाय कारतलबखानाच्या तीन पिढ्या जहांगीर बादशहा पासून मोगलाई सेवेत होत्याच.अन् महत्वाची बाब म्हणजे औरंगजेब – शहाजहान सत्ता कलहात कारतलबखान औरंगजेबाचा पक्षकार होता.1657 च्या दारा सोबत झालेल्या लढाईत औरंगजेबाच्या फौजेकडून लढताना कारतलबखिनाने विशेष पराक्रम दाखविला होता.या सर्व जमेच्या बाजू असताना अशातच परांडा किल्ला घेतल्याने कारतलबखानाला अजून चार चाॅंद लागले.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
पुणे परिसरात धुमाकूळ घालूनही शिवराय दाद देत नाहीत किंवा प्रतिकार करत नाहीत म्हटल्यावर शायिस्ताखानाने आपला मोर्चा कल्याण भिवंडी नागोठणे ,चोल,पेण या तळकोकणाकडे वळविला.कधीकाळी हा भाग मोगली सत्तेचा भाग होता पण महाराजांनी तो स्वराज्यात सामील केला होता.ही ठाणी पुन्हा जिंकून घेण्यासाठी शायिस्ताखानाने ही जबाबदारी परांडा किल्ल्याच्या विजयाचा नूर ज्याच्या चेहऱ्यावर आहे अशा कारतलबखानाची निवड केली.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
मोगली फौजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना युद्धभूमीवर सुद्धा शाही थाट जपायला आवडत असे.शाही पणा हा त्यांचा लढाईचाच एक भाग असे.जेमतेम उंचीचा चाकण किल्ला घेताना नव्या दमाच्या मोगली सैन्याला तब्बल दोन महिने लागले होते.मराठे किती निकराने लढतात याचा नमुना चाकणच्या संग्रामदुर्गाने दिला होताच.त्यामुळे कल्याण भिवंडी नागोठणे मारण्यासाठी शायिस्ताखानाने कारतलबखानास वीस हजाराची फौज,घोडे,उंट ,ढाल तलवारी असा सुसज्ज लवाजमा दिला. जिनं एकटीनं मोगलाई विरूद्धचं बंड मोडीत काढून खुद्द औरंगजेबाकडून रायबाघन किताब मिळविला होता ती माहुरची सावित्रीबाई उर्फ रायबाघनही कारतलबखानाच्या फौजैसोबत होती.
तळकोकणात जाणे म्हणजे सह्याद्री पर्वताची कमाल उंची घाटवाटेने उतरून समुद्र सपाटी गाठणे होय.यासाठी कोणतीतरी घाट वाट उतरावीच लागते.शाही फौजेनिशी तळकोकण गाठण्यासाठी कारतलबखानाने पुणे सोडले.लोहगड विसापूर किल्ला परिसरातून कारतलब खान पुढे पुढे सरकत होता.छत्रपतींच्या हेरांकरवी खानाची सर्व हालचाल महाराजांना कळत होती.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
प्रतापगड संग्रामात अफजलखानासाठी महाराजांनी पिंजरा लावला होता व इथं कारतलबखानाच्या चालीला महाराज स्वतःचाच पिंजरा साबित करणार होते.त्यावेळी लोहगड विसापूर महाराजांच्या ताब्यात असूनही एक साधा दगडही खानाच्या दिशेने भिरकावला गेला नाही.कारण महाराजांना हे सावज अजून पुढे अशा ठिकाणी पकडायचं होतं की जिथे खानासह सर्व फौजेची मती गुंग व्हावी . व हा डाव मोगली सत्तेस चपराक म्हणून कळावा.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
कारतलबखानाचा शेवटचा मुक्काम कुरवंडा घाटात पडला.लोनावळ्याजवळील कुरवंडा हे प्राचीन काळापासून व्यापाराचे केंद्र होते.कुरवंडा घाटातून सह्याद्री उतरून गेले की तळकोकण लागते.2 फेब्रुवारी 1661 रोजी कारतलबखानाची फौज कुरवंडा घाटाचा तीव्र उतार ,दाट झाडी पार करून आंबा नदीच्या काठावर चावणी गावात विसावली.घाटवाटेमुळे प्रचंड दमछाक झालेली.त्यात घाट उतरून गेले की हवामानही परस्परविरोधी बनते.चावणी परिसर हा खोलगट भाग असल्यामुळे घाटावर असलेली गार हवा इथं लागत नाही.पावसाळ्यात धो धो वाहणारी अंबा नदी डिसेंबर अखेरपर्यंत शेवटचा श्वास घ्यायला लागते.फेब्रुवारीत तिच्यात पाण्याचा शोध घ्यावा लागतो.
कारतलबखान पुण्याहून निघाल्यापासून तो निर्विघ्नपणे चावणीपर्यंत पोहचला होता.इथपर्यंतचा प्रवास त्याच्या मर्जीने होता आता पुढचं सर्व काही महाराज स्वतः करणार होते.
सह्याद्रीतील गडकोट,जंगल,घाटावाटा यांचा रणांगण म्हणून शिवरायांनी ज्या खुबीने वापर केला त्याला अन्य कुण्या राजाची उपमा देताच येत नाही.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
उंबरखिंडपर्यंत कारतलबखानास उतरू देणे ही शिवरायांची रणनीती होती.उंबरखिंड ही रचना लौकिक अर्थाने दोन डोंगरांना जोडणारा दुवा अशा प्रकारची खिंड नाही.सह्याद्रीची विशाल पर्वत रांग येथे नलिकाकृती खिंडीसारखी दिसते.इतिहास कळण्यासाठी लढाई झालेल्या भौगोलिक स्थळांना भेट दिल्यास लढाई वेळेसच्या परिस्थितीचा अदमास बऱ्यापैकी लावता येतो.
दुपार टळून गेलेली वेळ होती अन् कारतलबखानाचे सैन्य अचानक स्तब्ध झाले होते.कारण लढाईला तोंड फुटले होते अन् इथं शत्रू दिसत नव्हता.महाराजांचे मावळे दगडगोटे,बाण,भाला यांचा मारा करत मोगली सैन्याला सळो की पळो करून सोडत होते.महाराजांचे सैन्य डोंगरझाडीत उंचावर मोक्याच्या ठिकाणी थांबलेले होते.स्वतः महाराज कमरेला तलवार,पाठीवर ढाल ,हातात धनुष्यबाण घेऊन लढत होते.ही एक अशी लढाई होती ज्या लढाईत स्वराज्य सेनापती नेतोजी पालकर,तानाजी मालुसरे, येसाजी कंक अशी मातब्बर सरदार मावळे मंडळी सहभागी झाली होती.रयतेचा पालनकर्ता खुद्द शिवाजी राजे लढाईत सामील असल्यामुळे मावळ्यांना स्फुरण आले होते.स्वतः महाराज व स्वराज्याचे सर्व बिनीचे सरदार या लढाईत सहभागी झाले .या वरून या लढाईचे महत्व लक्षात घ्यावे.
दाट झाडीतून,डोंगराआडून दगडगोट्यांचा,बाणांचा वर्षाव मोगली सैन्यावर होत होता.सैन्य तर समोरासमोर दिसत नव्हतं पण मार काही चुकत नव्हता.मोगली सेना या अचंबित भुताटकीचे रट्टे खात हवालदिल झाली होती.कारतलबखानाची ऐट आता पुरती जिरली होती.त्याने शिवरायांकडे जीवाचे अभय मागून सपशेल शरणागती पत्करली.महाराजांनी सर्वांस अभय देऊन सर्व ऐवज जागेवर टाकून आलेल्या वाटानेच परत जायला सांगितले.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
आलेल्या वाटानेच परत जाणं किती भयंकर असू शकते याची कल्पना समरभूमी उंबरखिंड परिसर पाहिल्यावरच येतो.या लढाईत छत्रपती शिवरायांची अजोड, अकल्पित, अचंबित रणनीती दिसून येते.
समरभूमी उंबरखिंड मोहिमेचा उल्लेख सविस्तर वर्णनाने शिव भारत ग्रंथात तसेच वा.सी.बेंद्रे, सेतू माधवराव पगडी,बाळशास्त्री हरदास,गजानन मेहंदळे,श्रीनिवास सामंत इत्यादी इतिहासकारांच्या पुस्तकात विस्तृतपणे आलेला आहे.
इतिहास घडलेल्या वाटा जिवंत ठेवण्यासाठी त्या वाटेवरून सातत्याने भटकंती व्हायला हवी.प्रस्तुत लेखकाने कुरवंडा ते चावणी कारतलबखान चाललेल्या सोळा किमी घाट वाटेची भटकंती पाच वेळा केली आहे.याचे श्रेय समरभूमी भटकंती मोहीम आयोजक प्राचीन नाणी अभ्यासक किरण शेलार यांना जाते.किरण शेलार हे अखंडपणे चोवीस वर्षांपासून कुरवंडा ते चावणी पायी भटकंती आयोजन करतात व भूगोलाच्या साक्षीने इतिहास जिवंत करतात.
समरभूमी उंबरखिंड युद्ध वर्ष 364
कुरवंडा ते चावणी ही वाट पायी चालून गेल्यावर मोगली फौजेचा मार्ग व शिवरायांनी मोगली फौजेची केलेली कोंडी व्यवस्थित समजते.
खजील होऊन परतलेला कारतलबखान खाल मानेने पुण्याला परततो.संपूर्ण रूतबा ,नूर हरवलेला कारतलबखान पाहणं शायिस्ताखानास किती पिळ देणार असेल ? पण त्याला हे माहीत नव्हते की अजून दोन वर्षांनी त्याचीही तीच गत होणार आहे.
कचरू चांभारे
मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड 9421384434
Very good 💐
जबरदस्त लिखाण सर
मनःपूर्वक धन्यवाद
Nice 👍
Thank you
Very good.
Thank you sir
खरंच खूप भयंकर आहे ही वाट. मागील वर्षी उंबरखीड मोहीम केल्या मूळे खरा इतिहास समजण्यास मदत होते.
जय शिवराय 🚩
मस्त लिहिले आहे.
Thanks
अप्रतिम लेखन सर……. शिवरायांच्या संयम आणि पूर्वतयारी सोबत नियोजनाची किती आवश्यकता असते…..हा अप्रत्यक्ष सल्ला या लेखातून मिळतो.
मनःपूर्वक धन्यवाद
अप्रतिम लेख
धन्यवाद दोस्त
इतिहास पुन्हा एकदा नजरेसमोर उभा केला सरजी.
मनःपूर्वक धन्यवाद दादा