व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025

व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025
जीवनाचा पाया असे प्रीत
प्रेम तसा शब्द अडीच अक्षरांचाच पण व्याप्ती लहानथोर ते सर्व प्राणीमात्रात नसानसात भिनलेली. माया ,ममता ,प्रीती,वात्सल्य अशा कितीतरी भावछटाही प्रेमाच्याच शाखा.
ना.सी.फडके,वि.स.खांडेकर,कुसुमाग्रज,प्र.के.अत्रे ,राम गणेश गडकरी या सारस्वत पुत्रांनीही प्रेमाचा सागर ,कालसुसंगत लाटांसह कागदावर बंदिस्त केला आहे.आजही अनेक जण लेखनीला धार लावताना प्रेमाचाच आधार घेतात.कुणाला प्रेम फुल वाटतं तर कुणाला ते दगडही वाटतं.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025
14 फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.अमेरिकेत आजच्या दिवशी प्रिय जनांना गुलाब पुष्प,भेट कार्ड ,मीठाई देण्याची परंपरा आहे.ख्रिसमस डे नंतर सर्वाधिक भेटकार्ड विक्री होते ती आजच्याच दिवशी.यावरून
14 फेब्रुवारी व्हलेंटाईन डे ची व्याप्ती लक्षात येते.
आपल्या भारतातही हा दिवस चोर पावलांनी शिरलाच.नव्वदीच्या दशकात तर व्हॅलेंटाईन डे विरोधाची धार इतकी तीव्र होती की 14 फेब्रुवारी रोजी हातात गुलाब घेऊन फिरणारे गुन्हेगार वाटावेत व फुल विक्रेते म्हणजे चोरून लपून शस्त्र पुरवठा करणारे अवैध पुरवठादार.पण आता काळ बदलला आहे.तरीही समस्या मात्र आहेतच.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025
गुलाबासारखं नाजूक असलेलं प्रेम प्रकरण रक्त रंजित सडा पसरवून त्यात प्रेमाच्या विस्कटलेल्या पाकळ्या भिजवून टाकतं तेव्हा निष्ठुरता कळसाच्या खूप पुढे गेलेली असते.
हसणं,रडणं,घाबरणं ,नाचणं,प्रेमभावात राहणं या जगण्याच्या हळूहळू उत्क्रांत होणाऱ्या पायऱ्या आहेत.प्रेमभाव ही पायरी मात्र अत्यंत गुंतागुंतीची आहे.माणसानं स्वीकारलेली सामाजिक व्यवस्था हा प्रेम मार्गावरचा सर्वात मोठा अडथळा आहे.कारण ज्या वेगाने जीवनमार्ग बदलतो,त्या वेगाने समाज बदलत नसतो.जीवनप्रवाह चित्त्याच्या वेगाने धावतो तर समाजप्रवाह हा गोगलगायीच्या चालीने चालतो.त्यामुळे वेगातला हा फरक कुठे मोहक पाकळ्यांचा गालिचा अंथरतो तर कुठे रक्त सिंचनाचा सडा टाकतो.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025
धर्म ,जात,प्रतिष्ठा या इंधनाच्या ऊर्जा पुरवठ्यावर कुणाची बोट वादळवारा पेलून किनाऱ्यावर लागते तर कुणाची बोट उद्धवस्त होते.
प्रेमाची सुरूवात कधी ,कोठे व्हावी याचे काही लिखित नियम नाहीत.प्रेम हे जरी नर नारीत उत्पन्न होत असले तरी ते नराला नारी व नारीला नर दिसताच भरभरून यायला लागतं असंही नसतं.
निसर्गानं सर्वच सजीवात निसर्गाच्या अस्तित्वासाठी व सजीव सातत्यासाठी सर्वच सजीवात जन्म,मृत्यू,श्वसन,वाढ,पचन,उत्सर्जन या शक्तीसोबतच प्रजनन ही शक्तीही पेरलेली आहे.माणुस वगळता सर्वच प्राणी काम भावनेचा वापर प्रजननातून वंश जीव निर्मितीसाठी सातत्यासाठी करतो.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025
माणुस हा एकमेव सजीव असा आहे की जो काम भावनेचा वापर आनंदासाठी,लैंगिक सुखासाठी करतो.आनंद भोगताना,वासनेचे वारू शांत करताना अपघाताने प्रजनन घडते व समाजमान्य चौकटीमुळे घडलेल्या प्रजननाला नैतिक व अनैतिक चौकटीत मापले जाते.प्रेम निर्माण होणे हे नैसर्गिक लक्षण आहे कारण निसर्गतः याच्या मुळाशी प्रजनन हा भाव आहे.नर नारीची आराधना येथूनच जन्माला येते.
किशोरावस्था संपून कुमार अवस्था सुरू झाली की ओठावरील मिशांची कोवळी लव मुलांना आपण कोणीतरी वेगळे आहोत अशी जाणीव करून देत असते.या जाणीवेतूनच त्याला भिन्नलिंगी जोडीदार मनातली फुलपाखरं वाटायला लागतात.मनात लगेच घरट्यांची विण सुरू होते.मंदीरं बांधली जातात.मूर्तीच्या शोधात पुजारी भटकायला लागतात.स्वभाव,विचार अनुरूप जुळला की मूर्ती प्राण प्रतिष्ठा करावी असं दोन्हीकडून ठरतं.मग समाजभानाचा विचार येतो व देऊळ रिकामं राहतं.काही जण तर रिकाम्या देव्हाऱ्यात कल्पनेतल्या मूर्तीची पूजा करतात,त्या देवतेला तिच्या पूजेचा पाट मांडून कोणीतरी आंतरपाट धरायची वाट पाहतेय,हे गावीही नसते.
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2025
तुला पाहते रे या मालिकेने काही वर्षापूर्वी खूप धुमाकूळ घातला होता.मालिकेमधला चाळीशीतला नायक व वीशीतली नायिका या वय समीकरणावर चर्चा झडल्या.पण प्रियकर प्रेयसीतलं असं वयाचं अंतर हा काही पहिल्यांदाच घडलेला प्रकार नाही.वास्तव जीवनात अशी प्रकरणे झालेली आहेत.सुपरस्टार राजेश खन्ना पन्नाशीच्या जवळ होते व डिंपलला सोळावं सरलं होतं .त्यावेळी ती दोघं पती पत्नी म्हणून एकत्र आली.लहानपणापासूनच ते कौटुंबिक शेजारी शेजारी राहणारी असते तर राजेशकाकांनी फावल्या वेळात डिंपल बाळाचा पाळणा हलविला असता.विनोद मेहरा या चॉकेलेट हिरोचे चार लग्न झाली होती .त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री बिंदिया गोस्वामी मेहराजींहून सोळा वर्षांनी लहान होती.हे झालं फक्त पुरूष मोठा व स्त्री लहान असल्याची उदाहरणं.
स्त्री मोठी व पुरूष लहान असलेली सुद्धा काही उदाहरणे आहेत.सैफ अली खान ,पत्नी अमृता सिंग पेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.डॉ.अंजली मेहता जी पुढे तेंडूलकर झाली ती आपल्या सचिनपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे.सचिनने सतरावं ओलांडलं होतं अन् अवघ्या वर्ष दीडवर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीनं तो विश्व मानांकित झाला होता.अंजलीने त्याची विकेट घेतली.
प्रेम ही पूर्णतः नैसर्गिक भावना आहे.मनाचा भाव ओळखून , हा च माझ्या मनातला मोर पिसारा हा भाव उत्कटतेने जन्माला आला की अंतरीची अशी ओढ तयार होते की तीच ओढ जन्मांतरी पुरते. प्रेमाविन जीवन म्हणजे कस गेलेली माती आहे.
सख्याला सखीचा व सखीला सख्याचा मोरपीस स्पर्श खुणवत राहतो.प्रेम ही विकृती नसावी ती संस्कृती असावी.संपूर्ण आयुष्यच प्रेममय असावे.कारण प्रेमभाव हाच जगण्याचा पाया आहे.प्रेम ही तेजासाठीची धार आहे.प्रेम हे अजरामर काव्य आहे.प्रेम हे अखंड गद्य आहे.जोडीदाराचे सुख चिंतनं हा प्रेमाचा शाश्वत पाया आहे.माझी नाहीतर कुणाचीच नाही ,या विकृतीने ग्रासलेली माणसं कधीच जीवन प्रेमी नसतात.त्यांच्या प्रेमाची वेल आकर्षणातून भोगाकडे झेपवलेली असते.प्रेम हे खूप मुलायम असते ,जीवनाची आसक्ती पेरण्याची मनोरम्य भूमी म्हणजे प्रेम .हे विकृतांच्या माथी कुणी पेरलेलेच नसते. आप पर भावाचं समर्पण म्हणजे प्रेम.

प्रेम भावनेचा आदर हृदयी जपायला हवा.
प्रेमभावे प्रेमदिनी नमस्कार.
कचरू चांभारे बीड 9421384434

RELATED POSTS
View all