पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजमातेच्या जयंती विशेषाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा गौरव , कर्तृत्वाचा जागर मांडतो आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
समाजाचं तोंड कुणीकडं फिरवायचं ?याचे सर्वस्वी अधिकार पुरूष सत्तेकडे असलेल्या कालखंडात काही स्त्रीयांनी काळाच्या पलीकडे रेघोटी ओढणारा पराक्रम केलेला आहे.राजमाता जिजाऊ माँसाहेब,भद्रकाली ताराराणी ,लोकमाता अहिल्यादेवी,क्रांतीज्योती सावित्रीमाई ,मानवतावादी दृष्टीने आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ.रखमाबाई राऊत ,डॉ.आनंदीबाई जोशी, ही उदाहरणे म्हणजे काळाला भेदून ,काळावर चितारलेली कायमची चित्रे आहेत.अराजकतेची तोंडं तलवारीनं बंद करायच्या कालखंडात ,ज्या मातोश्रीनं समता व न्याय बुद्धीने राज्य कारभार केला ,त्या लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती.
अंगीच्या गुणावरच माणुस मोठा होत असतो पण प्रारब्धाचीही योग्य जोड असावी लागतेच .तरच हे मुमकिन होतं.मी दैववादी आहे म्हणून असं विधान करत नाही ,साऱ्याच थोर नर नारी नारायणांचा पराक्रमी इतिहास वाचला तर एक गोष्ट ध्यानी येतेच ती म्हणजे लोकोत्तर ऐतिहासिक पात्रांच्या अलौकिक यशात त्यांच्या भोवतालच्या इतर पात्रांचा ,सामाजिक व भौगौलिक परिस्थितीचा खूप मोठा वाटा आहे.
लोकमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचा जन्म बालाघाटच्या कुशीत वसलेल्या बीड नगर सीमेवरील एका छोट्या पठारावरील चोंडी या गावातला.कर्तृत्वाची मशाल देदिप्यमान झाली ती नर्मदेच्या तीरावरील इंदूर महेश्वरी नगरीत. राजमाता ,लोकमाता,महात्मा,महर्षी ,आचार्य ,कर्मवीर ,प्रज्ञासूर्य ,क्रांतीसूर्य ,युगप्रवर्तक अशा काही विशेषनांनी लोकोत्तर महापुरूषांची ओळख करून दिली जाते.एखादं विशेषण जन्मतः मिळत नसतं ,त्या विशेषनामापर्यंत पोहचण्यासाठी त्या व्यक्तिमत्वाचे खडतर प्रयास असतात.तो खडतर प्रवास एकमेवाद्वितीय असतो म्हणून ते विशेषण उच्चारलं की तेवढी एकच किंवा फार तर दुसरी अजून एखादी व्यक्तिरेखा डोळ्यापुढे येते.बाकी तिथं कुणीच नसतं.पुण्यश्लोक या शब्दाने अहिल्यामाईंचा गौरव केला जातो.पुराणातल्या अर्थानुसार पुण्यश्लोक म्हणजे पवित्र व चरित्रसंपन्न व्यक्ती.आपल्या पुण्यकर्माने जनहित साधणारी व्यक्ती.पुण्यश्लोक म्हणून पुराणात सीतामाईचे तात राजा जनक ,धर्मभास्कर राजा पांडव युधिष्ठिर धर्म ,परम भगवान विष्णू ,पराक्रमी राजा नल यांचा उल्लेख आलेला आहे.इतिहासात मात्र पुण्यश्लोक हे विशेषण एकट्या अहिल्यामाईंसाठी वापरले जाते.त्यांच्या थोरवीसाठी पुण्यश्लोक व लोकमाता हे दोन शब्द पुरेसे आहेत.ही दोन विशेषणं अहिल्यादेवीसाठी कशी आली ?हे जाणुन घ्यायचं असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गाथा वाचावीच लागेल.संपूर्ण वर्षभरात माझ्या वाचनात आलेली तीन पुस्तके म्हणजे विजया जहागीरदार यांचं कर्मयोगिनी ,विनया खडपेकर यांचं ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई व मुक्ता केणेकरांचं लोकराज्ञी .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
परंपरेनुसार वंशिक सरदारकीचा वरदहस्त नसलेला धनगर समाजातील एक तरूण केवळ तलवारीच्या पातीवर व बुद्धीचातुर्याच्या जीवावर आपलं स्स्थान निर्मितो ,तो तलवार बहाद्दर म्हणजे होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर व होळकरशाहीची पताका आसेतुहिमाचल कीर्तीवंत ठेवली ,ती कर्तबगार व्यक्ती म्हणजे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
शासनयंत्रणा राबविणं म्हणजे भोग नसून एक योग आहे,साधना आहे.ही बांधीलकी मानूनच अहिल्यादेवी होळकरांनी राज्यकारभार केला.पराक्रमाचं शिवतेज असलेल्या खुद्द बाजीराव पेशव्यांनी सुभेदार मल्हाररावांच्या चिरंजीवांशी म्हणजे खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह घडवून आणला.त्या काळात भारतभर दरारा असलेलं राज्य म्हणजे मराठेशाही व मराठेशाहीचे शासक होते थोरले बाजीराव पेशवे.बाजीराव पेशव्यांनी मराठेशाहीची राजधानी नुकतीच शनिवारवाड्यात आणली होती.या वास्तुत खुद्द बाजीराव पेशव्यांनी अहिल्या-खंडेराव विवाह घडवून आणला होता.सुनमुखाच्यावेळी मल्हारबाबांनी एका मांडीवर सुनेला व एका मांडीवर मुलाला घेतलं होतं नंतर हीच कृती खुद्द बाजीराव पेशव्यांनी करून पितृत्वाचा हात डोई फिरवला होता.चार दिवसाच्या शाही सोहळ्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इंदूरला आल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
शिंदे-होळकर-पवार म्हणजे पेशवाईचे खांबच.इंदूरचा परगणा होळकरांकडे तर उज्जैन प्रांत शिंदेंकडे.धारची सुभेदारी पवारांकडे.उत्तरेतल्या साऱ्या राजकारणाची भिस्त या तिन्ही खांबावरच.मल्हारराव होळकर आपल्या सुनेस मुलाप्रमाणेच वागवत असत.कारकुनी कारभार (मुलकी प्रशासन) व मैदानी कारभार असे राज्यकारभाराचे ठळक दोन भाग पडतात.दोन्ही विभागाचा समन्वय साधूनच काम करावे लागते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून मल्हारराव होळकरांनी राज्यकारभाराची धडे गिरवून घेतली होती.इंदूरची होळकरशाही सुवर्णयुगाच्या शिखरी असतानाच होळकरशाहीला पहिला तडाखा बसतो ,तो खंडेराव होळकरांच्या वीर मरणाने.कुंभेरीच्या लढाईत जाटाकडून होळकरशाहीचा एकुलता एक वारसदार धारातीर्थी पडतो.होळकरशाहीवर हा खूप मोठा आघात असतो , पुण्यश्लोक अहिल्यादेवीसाठी तर आभाळ कोसळणं व धरणी दुभंगणं एकच.रीतीप्रमाणे सती जाण्यास निघालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना मल्हाररावांनी अडवलं.गेली ती अहिल्या व राहिला तो खंडू.तूच माझा पुत्र खंडेराव आहेस.तू थांबलंच पाहिजेस.मल्हारबाबांचे ऐकून सती जाणारी आहिल्यादेवी थांबली पण रक्तातल्या जवळच्या आठ्ठावीस मृत्यूंनी ती रोजच सती गेली होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
होळकरशाहीचा कारकुनी कारभार पूर्णपणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाहत होत्या.वात्सल्याने परिस्थिती हाताळणाऱ्या मातोश्री , अहिल्यादेवी होळकर वेळप्रसंगी कठोरही होत असत.खंडेरावांच्या पहिल्या वर्ष श्राद्धाचं प्रकरण खूप बोलकं आहे.खंडेरावांसोबत त्यांच्या अकरा स्त्रीया सती गेल्या होत्या ;त्यात दोघी मुसलमान होत्या.सती गेलेल्या स्त्रीयांस त्यांचं नाव घेऊन विधिवत पाणी सोडायचं असतं.इतर स्त्रीयांची नावं ब्राम्हण पुजाऱ्यांनी घेतली पण मुस्लीम स्त्रीयांच्या नावे श्राद्ध करण्यास त्यांनी नकार दिला.दुःखात असूनही आहिल्या कडाडल्या .. शास्त्र आपण माणसांनीच निर्माण केलं आहे ,योग्य अयोग्य बाबींचा विचार करून ते आपण तोडलंही पाहिजे.मुस्लीम आहे म्हणून श्राद्ध करता येत नसेल तर मग कोण्या शास्त्राने त्यांना सती जाऊ दिलं ते सांगा? ज्यांनी आमच्या स्वारीसाठी जिंदगी वेचली त्यांच्या नावाने पळीभर पाणी ओतण्यास इतराजी असेल तर आम्हाला विधीच मान्य नाही.असं खडसावताच श्राद्ध विधी करावाच लागला.धर्म परंपरेचं जोखड भिरकावून द्यायला खूप मोठी ताकद लागते .ती त्यांच्यात होतीच.
पेंढाऱ्यांचा बंदोबस्त …. चोर लुटारू ,पेंढाऱ्यांनी इंदूर संस्थानात उच्छाद मांडला होता.जो कोणी या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करील ,त्याचा विवाह माझ्या मुलीशी मुक्ताशी लावून देईन.असा शब्द भर दरबारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी उच्चारला होता.लढवय्या काटक उमद्या तरूण यशवंत फणसे यांनी पेंढाऱ्यांचे मत परिवर्तन केले.संस्थानातली वाटमारी थांबली ,चोरी डकैती थांबली.दिल्या शब्दाप्रमाणे लोकमातेने लाडक्या मुक्ताचा विवाह यशवंतरावांशी लावून दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरा यांचे राज्य न्यायप्रिय होते.प्शेरजेला त्जाया आपलं कुटुंब मानत असत. राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे शांततेचं राज्य होते.भारतातल्या सर्वच प्रमुख देवस्थानातली बांधकामं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी करवून घेतली .देवाच्या नावानं छन्नी हातोडा चालवणारी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्वतः तलवार बहाद्दर व मुत्सद्दी होत्या.राघो पेशव्याच्या निमित्तानं हे इतिहासानं अनुभवलं आहे.ज्या शिंदे होळकरांच्या जीवावर अटकेपर्यंत राघोनं भरारी घेतली ,याच राघो दादासाहेबांनं शिंदे होळकरांचा घात केला व पेशवाईलाही नख लावलं.माधवराव पेशव्यांसारख्या शूराला राघोदादाची साथ लाभते तर पेशवाई निशाण अजून निखारलं असतं.राघोला करारी जबाब देणाऱ्या लोकमाता , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुढं राघो कैदेत असताना वणवण भटकणाऱ्या आनंदीबाईंना, राघोदादाच्या बायकोला आर्थिक मदत करतात.न्याय निवाड्याचेही काही प्रसंग इतिहासात आलेले आहेत.सुनावणीस आलेल्या प्रकरणाची खास गुप्तहेरांकडून शहानिशा करून घेण्याची अहिल्यादेवी होळकरांची पद्धत होती.संस्थानिकांनाही आर्थिक मदत देण्याचे काम होळकरशाहीने केले.खुद्द माधवराव पेशवे अडचणीत असताना त्यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवींकडे पन्नास हजाराची मदत मागितली होती तेव्हा खास दुतासोबत बंदोबस्त देऊन पाच लाख रूपये व माता रमाईसाठी सौभाग्याचे अलंकार अहिल्यादेवींनी पाठविले होते.मदतीमागचं कारण सांगाताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जवाब सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे,त्या म्हणतात पेशवे याचक नाहीत ,ते स्वामी आहेत आपले.आपलं दैवत जेजुरी असलं तरी मार्तंड पेशवा आहे.पेशवे मसनदीसं इमान राखणं आपलं कर्तव्य आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
साध्या घोंगडीवर बसून तब्बल चाळीस वर्षे राज्यकारभार करताना , अहिल्यादेवींनी प्रजेला पुत्रवत सांभाळलं.त्या म्हणायच्या रयत राखली की राज्य विनासायास राखता येतं.पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा उपदेश फार प्रभावी असायचा.उत्तर पेशवाईच्या काळात अनंतफंदी हे थोर कवी होऊन गेले.मराठी व्याकरणातलं शार्दुलविक्रिडीत व शिखरिणी वृत्ताची निर्मिती अनंतफंदीकडे जाते.फटका हा लावणी काव्यप्रकारही त्यांचाच.स्त्रीयांवर शृंगारिक लावण्या रचणं हा अनंतफंदीचा आवडता काव्य विषय होता.महेश्वर संस्थानात त्यांचा एक कार्यक्रम झाला.बिदागीही त्यांना मिळाली.निरोपावेळी ते मातोश्रींच्या दर्शनाला आले.त्यावेळी मातोश्री त्यांना कौतुकवजा उपदेश मिश्रणात बोलल्या …आपण ज्या कविता करता ,गायन करता.त्यावरून आपण थोर प्रतिभेचे आहात .पण हेच काव्य ईश्वर स्तवनासाठी वापरले तर तुमच्या वाणीचे सोने होईल.झालं तिथंच अनंतफंदीतला शृंगारिक कवी लोप पावला व त्याच गर्भातून उदयाला आला एक प्रसिद्ध कीर्तनकार.पुढं फंदीची मुलंही कीर्तनकार झाली.
लोकमातेचा आदर्श ,न्यायी कारभार समजून घेण्यासारखा आहे.होळकरशाहीचं निशाण लहरतं ठेवताना अश्रूंनी लोकमातेची पाठ कधीच सोडली नाही.ऐन वैभवात असताना पती खंडेरावांचा मृत्यू ,पतीसोबत सती गेलेल्या अकरा स्त्रीया,पुत्र वियोगानं हताश झालेल्या मातृछत्र सासू गौतमाबाईचा मृत्यू ,मल्हारबाबांचा मृत्यू मल्हारबाबांचा मृत्युयोग तर किती कष्टप्रद असेल याची कल्पनाही करवत नाही.,पुत्र मालेरावाचा मृत्यू .आईच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू ? यापेक्षा भयंकर अजून काही असू शकतं का ? पुत्राच्या सरणावर सती गेलेल्या दोन सुना ,त्या तर अर्धवट फुललेल्या फुलाप्रमाणे होत्या.मृत पुत्राच्या शेजारी दोन जिवंत मरणं लोकमातेनं कशी पेलली असतील ?.होळकर वंशात आता लेकीचा वंश तेवढा वाढत होता.लाडका नातू नथोबाही एका आजाराने गिळला.पुत्र वियोगानं यशवंत फणसे यांनी हाय खाल्ली व ते ही गेले.यशवंतासोबत लेक मुक्ता सती गेली.लेकीचं सती जाणं वृद्ध आईला रोखता आलं नाही.धरणीमाय दुभंगलेली व आभाळ कोसळलेलं अशी म्हातारपणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची अवस्था होती.मनाची कणखरता दाखवायलाही शेवटी मर्यादा असतेच.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकमातेने लाडक्या मुक्ताच्या मृत्यूनंतर अंथरूण धरले.साल होतं 1795 व मास होता श्रावण.पुण्य दान आदानप्रदानाचा पवित्र मास म्हणजे श्रावण मास.याच महिन्यात श्रावण अमावास्येला 13 ऑगस्ट 1795 रोजी काळाच्या झडपेने लोकमातेच्या शरीरातला प्राण काढून घेतला.
अशी ही थोर माता व तिची थोर,लोककल्याणकारी कहाणी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती 31 मे 2024
कचरू सूर्यभान चांभारे
बीड 9421384434
kacharuchambhare.com
अतिउत्कृष्ट लेखांकन सर
मनःपूर्वक धन्यवाद सर
मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता..
31 मे पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यामाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद काकाश्री
आमच्या ग्रुप चे सोनोपंत डबीर या नावाने गौरवलेले, प्रतिभावान लेखक, मुख्याध्यापक, श्री. कचरू चांभारे सर, आपले, कोणत्याही विषयावरील लेख हे वाचनीय असेच असतात, आपल्यातील या अद्भुत लेखन कलेला, कल्पकतेला, विलक्षण प्रत्येक विषयाची परिपूर्ण माहिती ठेवण्याच्या कलेला, आपल्या प्रतिभासंपन्न लिखाणाला तोडच नाही आहे … !!
असेच लिहिते रहा, आम्हा सर्वांना ज्ञानामृत पाजत रहा..
खुप धन्यवाद, समग्र लेख लिहून आम्हाला एकाच वेळी, संपूर्ण इतिहास या लेखाद्वारे कळला.. !!!
खूप खूप धन्यवाद दादासाहेब
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन …
अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची सारांश रूपाने लेखन.
अहिल्यादेवी होळकर यांचा समग्र इतिहास थोडक्यात शब्दबद्ध केला .
पुण्यश्लोक या शब्दाचा अर्थ अगदीच वाजवी शब्दात समजून सांगितलात.
या लेखाच्या मदतीने मोलाचा इतिहास कळला.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
मनःपूर्वक धन्यवाद