कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024
बारा पोर्णिमा वेगळेपण नवं

कोजागरी पौर्णिमा

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024 बाराही महिन्यातील अमावस्या व पौर्णिमांना आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे.वैदिक व अवैदिक अशा दोन्ही परंपरांमध्ये अमावस्या-पौर्णिमेला खास महत्व आहे.गावोगावीच्या ग्रामदैवतांच्या यात्रा या शक्यतो अमावस्या-पौर्णिमेच्या मुहूर्तावरच आहेत,यावरून अमावस्या-पौर्णिमेचे पारंपारिक महत्व व जनमाणसावरचं गारूड स्पष्ट दिसून येतं.
इंग्रजी नव वर्षाची सुरुवात जानेवारीने होते,अन् मराठी नव वर्ष चैत्र महिन्याने सुरू होते.शालेय वयात मराठी महिने बारा चैत्र वैशाख जेष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन असं मोठ्या आवाजात पण तालासुरात पाढे,महिने,वार म्हणणारी पिढी इंग्रजी शिक्षणाच्या वरवंट्याखाली हळूहळू निपचित पडत असल्यामुळे मराठी महिनेच अनेकांना सांगता येत नाहीत.


कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024 इंग्रजी कॅलेंडर वर्षाची चार पानं उलटून गेल्यावर मराठी वर्षाचा पहिला महिना येतो चैत्र.चैत्रात रखरख उन्हाळा असतो पण तरीही सृष्टीत पानगळ झालेल्या वृक्षवेलींना लालचुटुक कोवळी पाने आलेली असतात. ही पानं संदेश देतात की प्रतिकुलतेच्या स्वारीवर आम्ही स्वार होणार आहोत.


इंग्रजी मे मध्ये मराठी वैशाख पौर्णिमा येते.चैत्रापेक्षा वैशाखात ऊन जास्त असते.या महिन्यातल्या ऊनाला वैशाख वणवा म्हणतात. वणवा या शब्दातूनच आपल्याला ऊनाची दाहकता कळली असेलच.वैशाख पर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात.तथागत भगवान बुद्धांचा जन्म ,महानिर्वाण व ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेला झालेली आहे.
वैशाख पौर्णिमा चंद्रप्रकाश अतिशय स्पष्ट असतो.म्हणून या रात्रीला प्राणी गणना केली जाते.
चैत्रात सृष्टी नव्या पालवीचे स्वागत करते अन् वैशाखात प्राणी गणनेस प्रखर चंद्रप्रकाश देते.या दोन्ही पौर्णिमा निसर्ग पुजेचा संदेश देतात‌.

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

पुढची पौर्णिमा येते जेष्ठ पौर्णिमा. ही पौर्णिमा वटसावित्री म्हणूनही ओळखली जाते.कुटुंब संस्थेचा आरंभ नवरा बायको या नात्यातून होतो.इतर नाती इथूनच जन्माला येतात.नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागणारा हा सण.
आषाढ पौर्णिमा ही गुरू प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी पौर्णिमा तर श्रावणात येणारी पौर्णिमा म्हणजे बहीण भावाचा आदरभाव सांगणारी रक्षा बंधन पौर्णिमा. समुद्राला नारळ अर्पण करून अन्नदात्या,पोशिंद्या सागराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी हीच नारळी पौर्णिमा.


चैत्र ते श्रावण या पाच पौर्णिमात वनस्पती,प्राणी ,नवरा बायको बहीण भाऊ यांचा गौरव झाला.पण भूतलावर आपल्याला आणून सोडल्यावर जे मातापिता हे भूतल सोडून गेले त्यांचे काय ? स्मृतीत असलेल्या पितरांना श्रद्धेने आमंत्रित करणारी पौर्णिमा म्हणजे भाद्रपद पौर्णिमा व पुढचे पंधरा दिवस म्हणजे पितृपक्ष.

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024
कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024


मराठी कालगणनेनुसार अश्विन महिन्यात व इंग्रजी कालगणनेत बहूवेळा ऑक्टोबर व कधीकधी सप्टेंबरमध्ये येणारी आश्विन पौर्णिमा शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.आजकाल कधीही पावसाळा येत असल्यामुळे ऋतूचक्राची अवकळाच झाली आहे पण आमची पिढी पावसाळ्याचे महिने म्हटलं की अजूनही जून ते सप्टेंबर असाच उल्लेख करते.नवरात्रानंतर सहसा पाऊस येत नाही.

कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024

ऑक्टोबरमध्ये आकाश निरभ्र असते.शरदाचं टिपुर चांदणं पावसाळा समाप्तीनंतर पाहण्याचा दिवस म्हणजे आजची कोजागरी पौर्णिमा.काजू बदाम मिश्रित दूधात ,निरभ्र आकाशीच्या निशराजाच्या धवल किरणांना डोकावू देणं व ते दूध प्राशन करून थंडीच्या स्वागताला आम्ही तयार आहोत.हा संदेश देणं म्हणजे आजची पौर्णिमा. तसं पाहू जाता चंद्र व आपली धरणीमाय यांचं फार जवळचं नातं आहे.बाळ म्हणून आईच्या मांडीवर खेळताना चंद्राची ओळख होते ती मामा म्हणून.हाच मामा ऐन तारूण्यात प्रियकर-प्रेयसीचा चेहरा होऊन येतो.मुलबाळं झाले की लेकराच्या मुखवड्यात पुन्हा चंद्र दिसतो.संसाराचा गाडा ओढताना भाकरीतही चंद्र दिसतो.निंबोनीच्या झाडामागं दडलेला हा चांदोमामा आज खूप मोठा दिसतो कारण की तो आज पृथ्वीपासून खूप जवळ असतो.म्हणूनच आजचा चंद्रप्रकाश भगिनी धरणीमाईस दुधाळ प्रकाशानं सचेल न्हाऊ घालतो.


दुधाळ चंद्रप्रकाशात चिंब न्हाऊन घ्यायचं असेल तर थोडं शहराबाहेर जायलाचं हवं.कारण कृत्रिम प्रकाश प्रदूषणामुळं चंद्रप्रकाशाचं शुद्ध रूप शहरातून अनुभवता येत नाही.आता तुम्ही म्हणाल प्रकाश प्रदूषण हे काय नवीनच. हो ,ते सत्य आहे.जसं ध्वनी प्रदूषण,जल प्रदूषण ,मृदा प्रदूषण आहे तसं कृत्रिम प्रकाश प्रदूषणही असतं.शहरात व गावात दिवे लागणीची वेळ झाली की ,मानवनिर्मित प्रखर विद्युत रोशनाई आपला अंमल प्रसविते.हवेतील धुलिकण व प्रखर प्रकाश किरण यांच्या अभद्र मिलनामुळे कृत्रिम प्रकाशाचं आवरण शहराभोवती तयार होतं.या प्रकाशामुळे चंद्रप्रकाशाला पृथ्वीवर थेट प्रवेश करता येत नाही.त्यामुळे चातकाला अभिप्रेत असलेलं चांदणं प्यायचं असेल तर शहराबाहेर जायलाचं हवं.


कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024 कोजागरी पौर्णिमेच्या कथा वैदिक पुराणात ,बौद्ध जातककथेत वाचायला मिळतात.आणि हो ,एक कथा सांगायची राहूनच गेली राव.ती कथा आहे हिरकणीची.आठवलं ना.कुळवाडीभूषण रयतेचा वाली राजा शिवछत्रपती यांच्या काळातली ही हिरकणीची कथा म्हणजे मातृत्वाच्या महा मांगल्याचं देदिप्यमान काव्य आहे.कातीव काळंपाषाण डोंगररांगेत वसलेला बेलाग किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड.

सूर्यास्त झाला की किल्ल्याची दरवाजे बंद होणारच ,हा महाराजांचा हुकूम.कोजागरीच्या दिवशी गडावर दूध विकता विकता ,डोंगररांगेने सूर्य केव्हा गिळला हे दूध विकणाऱ्या हिरकणीला कळलेच नाही.गडावरची दारे बंद झाली,अन् अंधारानं किल्ला गिळायला सुरूवात केली.त्याक्षणी हिरकणीच्या डोळ्यापुढे अंधार अन् मनात घरी ठेवलेल्या बाळाची आठवण दाटून येऊ लागली.गडावर एक नवा अध्याय हिरकणीच्या मातृत्वातून जन्माला आला.कोजागरी पुनवेच्या दुधाळ प्रकाशात हिरकणी रायगडाचा उभा चखोट कडा उतरत होती.जंगली श्वापदं ,सापविंचू ,बाभळीबोरीचे काटे ,झाडाझुपांचं खरचटणं ,तोल जाऊन कपाळमोक्ष होणं अस कसंलही भय तिच्या मनात नव्हतं.मनी होतं ते फक्त तान्हुलं.तान्हुल्याच्या ओढीनं हिरकणीनं जीवाचं मोल पणाला लावून खेळलेला खेळ जिंकला होता.ती रात्र होती कोजागरीची,मातृत्वाच्या मांगल्याचं तोरण बांधल्याची.


कार्तिक पौर्णिमा गुरू नानकांची जयंती.समतेची शिकवण देणाऱ्या संताची आठवण.दिपावलीत सुरू केलेल्या पहाटेच्या काकडा भजनाची सांगता दिवस.मार्गशीर्ष,पौष,माघ देवींचे उत्सव असतात.फाल्गुनात येते होळी पौर्णिमा व धुलिवंदन.पुन्हा चैत्र ते फाल्गुन वर्ष चक्र.


तारकांची रम्यता ,फुलांची मोहकता ,चंद्राची शीतलता आपल्या आयुष्यात येवो.ही कोजागरी निमित्त शुभेच्छा .निर्मळ निर्भेळ चांदणं आमच्या मित्र परिवाराला लाभो,ही कुलदैवत खंडेराया चरणी प्रार्थना.

कचरू चांभारे बीड 9421384434

xr:d:DAFyWDs3T8I:3,j:1333472687157799427,t:23102608

25 thoughts on “कोजागरी पौर्णिमा व आई हिरकणी 2024”

  1. प्रिय मुख्याध्यापक,

    आपल्या शिवाजी युगातील हिरकणी माता आणि कोजागिरी पौर्णिमेवरच्या विचारांमुळे मला खूप आनंद झाला.

    ऐतिहासिक महत्त्व आणि आपल्या सांस्कृतिक परंपरांचा जोड दर्शविण्याची आपली क्षमता विद्यार्थ्यांना शिक्षित आणि प्रेरित करण्यासाठी एक महत्त्वाचा गुण आहे.

    आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाला अधिक समृद्ध करण्यासाठी जो उत्साह दर्शवित आहात, त्याबद्दल व आपली इतिहास आणि संस्कृतीवरील आवड निश्चितच आमच्यात आदररशवाद जागवते.

    Reply
  2. खूप छान सर, खूप दिवसानंतर आपला लेख वाचायला मिळाला. मी आतुरतेने वाट पाहत होतो.

    Reply
  3. मराठी महिन्यातील सर्व पौर्णिमेचे महत्त्व विशद करणारा त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेची महती तसेच माता हिरकणीचे कर्तृत्व सांगणारा उत्तम लेख.

    Reply

Leave a Comment