सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर
मानवी मूल्याचा आदरभाव सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर
सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर
युद्धाचे ढग,अशांतता,उपासमार ,अज्ञान,दारिद्रय, आजार ,हिंसाचार असे नानाविध विकार समस्त मानवजातीला कुरतडत असतात. रक्तबंधनाने वा समान हेतूने एकत्र आलेला मानवी समुह म्हणजे समाज अशी समाजाची एक व्याख्या आहे.समाजाचा छोटा घटक म्हणजे कुटुंब पण आज संपूर्ण जगच एक कुटुंब बनले आहे. जैविक व अजैविक साधनसंपत्तीच्या संतुलनावर जगाचे सामाजिक आरोग्य अवलंबून आहे. मानवी मूल्यांची वृद्धी होण्यासाठी जगात शांतता नांदायला हवी.
सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर
सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर. मानवजातीस भेडसावणाऱ्या समस्या या धर्म,पंथ, जात ,पात, प्रांत ,भाषा , देशांच्या सीमा ओलांडून जगभर विकार पसरवत असतात. त्यामुळे मानवी मूल्यांची हानी होते.मानवी मूल्य हळूहळू कुरतडली जाऊन जग एक दिवस अराजकतेच्या उंबरठ्यावर जाऊ शकते.चिरंतन मानवी जीवनाचे मोल लक्षात घेऊन समस्त मानवांत शांतताच असायला हवी.कारण प्रगतीच्या,समाधानाच्या सर्व वाटा शांततेतूनच जातात
शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाच्या पाठीवर अनेक व्यक्ती वैयक्तिक पातळीवर,संस्था पातळीवर काम करत असतात.युनेस्को ही जागतिक पातळीवरील जगमान्य संघटना आहे ,जी जागतिक शांततेसाठी सदैव अग्रेसर असते.16 नोव्हेंबर हा युनेस्कोचा स्थापना दिवस..
जागतिक शांतता पेरण्यासाठी,मूल्यांचा वारसा जोपासण्यासाठी युनेस्को जागतिक स्तरावर वेगवेगळे दिन विशेष साजरे करत असते.आज 16 नोव्हेंबर रोजीचा दिनविशेष आहे जागतिक सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर.
युद्धजन्य परिस्थिती दूर ठेवण्यासाठी, सामंजस्य,आदर भूमिका वाढविण्यासाठी युनोस्कोने हा दिवस १९९५ पासून साजरा करण्यास सुरूवात केली आहे.परस्पर मतांचा आदरभाव व संवाद यांवर सहनशीलता भर देते.सहनशीलता हा शिष्टाचार आहे. दोन देशात,दोन समाजात तात्कालीन कारणांतून संघर्ष उभा राहतो व क्षणिक रागलोभातून जेव्हा दोन राष्ट्र एकमेकांसमोर उभे राहतात तेव्हा केवळ देशांच्या सीमा होरपळत नसतात तर मानवी मूल्येही होरपळली जातात.शांततेचे ढग हटले की वेदनेचे ,चिंतेचे ढग तिथं जमा होतात.सहिष्णुता निर्माण करणं हा जागतिक सहनशीलता दिनामागचा हेतू आहे.
राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पातळीवर जशी सहनशीलता हवी तशी वैयक्तिक व्यक्ती पातळीवरही ती हवीच.थोड्याशा राग लोभाने संपवून घेणाऱ्या व्यक्ती पाहिल्या की मन विषन्न होते. तसंही सहनशीलता हा गुण म्हणजे एक प्रकारची साधनाच आहे.संयमाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा अभ्यासक्रम म्हणजे सहनशीलता.वयानुरुप ,काळानुरुप ,परिस्थितीनुरुप , सहनशीलतेचे प्रसंग वाट्याला येतच असतात.मनाच्या संयमाला भेदणाऱ्या लाटा मानवी मनाच्या अथांग सागरात उचंबळत असतात.जीवनाला उभारी देणाऱ्या व जीवनाचा कडेलोट करू पाहणाऱ्या अशा दोन्ही स्वरूपाच्या अजस्त्र लाटा मानवी मनात उठतात,या लाटांच्या सोबतच सुखदुःखाच्या छोट्या छोट्या लहरीही आपली आवर्तनं पूर्ण करत असतात.एकंदरीत जीवनाकडे पाहताना कडेलोट करू पाहणाऱ्या लाटांना संयमाने हाताळता येणं हेच जिवंत राहण्यामागचं गमक आहे.अपमानाचे कढ ,पचनीय अन्न म्हणून सेवन करून त्यात सकारात्मक वैचारिक पाचकरस मिळविण्याची कला जमली की जगणं सुकर होतं.कारण आज अपमानाचा आवंढा गिळायची वेळ असली तरी उद्या मानाचा क्षण येणारच आहे.आज अपमानाचा वार करणारी माणसं उद्या मानाचे हारतुरे घेऊन येताना दिसतील कारण मान-अपमानाचे प्रसंग बदलतात पण भोवतालची माणसं तीच असतात.षभोवती वावरणारी माणसं देहानं तीच ती असली तरी वर्तनाने बदलते किस्से दाखविणारी असतात.भोवतालची माणसं जर प्रसंगपरत्वे आपापली भूमिका बदलवत असतील तर आपण तरी का एकाच भावनेवर जीवाचं मोल देऊन ठाम राहावं ?
सहनशीलता ही फक्त भावना नाही तर तो गुण आहे,अफाट यशाची पायाभरणी करण्याचा.मनाविरूद्ध घडत जाणाऱ्या गोष्टीही शिकवण देत असतात.मन हे आपल्या शरीराचा भाडेकरू आहे पण मन असं भाडेकरू आहे की ,त्यानं घर सोडल्यावर त्या शरीरात कुणी राहायला येत नाही .मन संपलं की शरीर नावाच्या घराचं अस्तित्वही राहत नाही.
एखादं संशोधन ,प्रयोग हे सुद्धा सहनशीलतेचा अंत पाहणारं असतं.आज रोजी जगात मान्यता पावलेले अनेक शोध वा सिद्धांत हे सहनशीलतेच्याच शाळेतलं अपत्य आहेत.सहनशीलता हा केवळ भाव नाही ,ती जडणघडण आहे पाय घट्ट रोवून उभं राहण्याची.ती कला आहे कडवट घोटातून स्मित हास्य पेरण्याची.
सहनशीलता दिन 16 नोव्हेंबर . सहनशीलता गुण पेरणाऱ्या दिन विशेषासारखा अजूनही असाच एक दिनविशेष जागतिक पातळीवर केला जातो.तो दिन विशेष आहे,जागतिक दयाळूपण.2018 पासून हा दिवस जागतिक पातळीवर दयाळूपणाची पाठराखण करणाऱ्या व्यक्ती,संस्थाचा गुण गौरव करण्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी जागतिक दयाळूपणा साजरा करण्यात येतो.दयाळूपण दिनाचे मूल्य सहनशीलता दिनाला पुरक आहे म्हणून लिहिले. कौटुंबिक हिंसाचारात लहान मुलांची खूप आबाळ होते.त्यांचे मानसिक आरोग्य ढासळते.दयाळूपणाची हाताळणी मुलांना वाचवू शकते.दयाळूपणात वाढलेली मुले सहनशीलता गुणास वाढीस लावतात.मैत्री संस्कारही सहनशीलता भाव दृढ करतो.
मनाची अशांतता सहनशीलता गुणास घातक आहे.वर्तनात शारिरीक वा मानसिक हिंसा करण्याची प्रवृत्ती निर्माण होणं अशांततेचे दृश्य स्वरूप आहे.राग गिळता आला पाहिजे.नुसता गिळून उपयोग नाही, तो पचवता आला पाहिजे.तरच चौरस व्यक्तिमत्व घडते.राग पचविण्याची क्षमता नसेल ,राग गिळण्याचा गुण व्यक्तीस मारक ठरतो.राग पचविण्याची शक्ती निर्माण करणं ,हे एक जीवन कौशल्य आहे. ते साधण्याचा मार्ग जमला की आयुष्य सुकर झालेच म्हणून समजा.पुस्तक वाचन,मनुष्य स्वभाव वाचन ,समर्पण भावनेतून कृती आचरण सहनशीलता भाव वाढविते.
सहनशीलता दिना निमित्त सर्वांना शक्ती मिळो ,सहनशीलतेला साधना म्हणून स्वीकारण्याची.
कचरू चांभारे बीड. 9421384434
kacharuchambhare.com
Nice Sir
Thank u sir
खूप छान सहनशीलता किती महत्त्वाची आहे ते आज समजले.जीवनात आनंद पाहीजे असेल तर सहनशील झाले पाहिजे, आज घरी दारी मनाविरुद्ध घटना घडत असतात त्याला आपण संयमाने तोंड दिले पाहिजे.
मनस्वी धन्यवाद सर जी
Very Nice, Sirji
मनस्वी धन्यवाद डॉ.साहेब
खरोखरच सहनशिलता हा खूप महत्वाचा गुण असून मानसान सहनशील असन खूपच महत्वाचे आहे व ते महत्प्रयासाने अंगी येऊ शकतं हेही तेवढेच खरे.
धन्यवाद रेखा