जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024 माहिती
गोष्ट आहे कालचीच. मी व माझा मित्र कल्याण देवराई डोंगररांग उतरत होतो.दोन दिवसावर आलेल्या जागतिक पर्वत दिनाबाबत आम्ही चर्चा करत होतो. तेवढ्यात एका मोठ्या दगडाच्या फटीतून आवाज आला.
सृष्टीपुत्र मानवा ,तुमचे बोलणं मी ऐकलंय. खरंच तुम्हाला पर्वताविषयी ममत्व आहे.तुमच्या बोलण्याने मी सद् गतित झालोय पण तरीही मला वाटतंय की पर्वताची कहानी मीच सांगावी.अन् पर्वत बोलू लागला…..
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
प्रथमतः आधी तुमचं कॅलेंडर विसरा.कारण तुमची कालगणना खूप तोकडी , मानवाला कालगणनेचा शोध लागण्यापूर्वीपासून आम्ही अब्जावधी वर्षापासून इथं आहोत.
पाणी,हवा,माती ,वनस्पती, पर्वत यांना अजिबात वेगळं करता येत नाही.त्यांचे स्वभावधर्म वेगवेगळे असले तरी सृष्टीचं टिकणं या पाचाशिवाय होऊच शकत नाही.पृथ्वीवरील जीव सृष्टीचं गमक आम्हा पंच पाचात आहे.
कैक अब्जावधी वर्षापूर्वीची बात आहे. तप्त गोळा असलेल्या पृथ्वीवर फक्त आम्ही तिघेच होतो.पहिले म्हणजे पाण्याने भरलेले पण जमिनीच्या भागाने थोडे थोडे अडवलेले अखंड महासागर , व दुसरे म्हणजे महासागरांनी वेढलेली जमीन .पृथ्वी निर्मितीवेळी डोळ्यांनी दिसणारे आम्ही दोघेच पाणी व जमीन पण आमच्यात तिसरा होता ,जो कधीच कुणाला दिसला नाही,दिसणारही नाही तो घटक म्हणजे हवा.असे आम्ही तीन यार.
नव निर्माणाचं वरदान असलेली पृथ्वी ही एकमेव आहे.सजीवांतील विविध जीवांचे आगमन नेमकं कधी ,कसं ,कुठं झालं हा इतिहास खूप रोचक आहे.आम्ही पर्वत जन्मापासूनच खूप राकट,खूप टणक.पाणी व पर्वत आमचा जन्म सोबतचाच,जणू आम्ही पृथ्वीमातेचे जुळेच.वसुंधराआईनं खुल्या आभाळ पितृछत्राखाली आमची वाटणी करून दिलेली.सागर अमर्याद असला तरी त्याने पर्वतावर चढायचं नाही व पर्वत कितीही उंच असला तरी त्याने महासागरात डोकायचं नाही.हे आमचं ठरलेलं ,त्यामुळे अब्जावधी वर्षानंतरही आमच्यात कधीच संघर्ष झाला नाही.धरणीआईनं सांगितलं होतं महासागर व तू म्हणजे पर्वत जीवसृष्टीचा मुलाधार आहात.त्यामुळे आम्ही परस्पर पुरक वागत आलो आहोत.सागराच्या पाण्याची वाफ होते ,ती वरवर जाते व पावसाच्या रूपाने माझ्या डोक्यावर पडते.कुठलाही मोह न धरता जगण्यापुरतं थोडं पाणी माझ्याजवळ ठेऊन उरलेलं सगळं पाणी मी नद्यांमार्फत महासागराला पोहच करतो.
पण पण पण….. मानवांनो तुम्ही धरतीवर आलात अन् सारा खेळच असमतोल झाला.बोलू या आज जरा निवांपणे. इतर ग्रहांप्रमाणेच पृथ्वी हा ही एक ग्रहच.पण पाणी ,भूमी व वातावरण यांमुळे पृथ्वीआईचं वेगळं पण लय न्यारं.
मंगळमावशीकडेही असंच आहे म्हणतात पण जाण्यायेण्यात लय अडथळा असल्यामुळे ख्यालीखुशाली कळत नाही.
देखण्या सृष्टीची जन्म कथा सांगताना धराआई सांगत होती.पहिला प्राणी जीव पाण्यात तयार झाला.पर्वत म्हणून मी तेव्हा अजून तसाच राकट,दणकट,बलदंड,खड्या चढणीचा होतो.पाण्यात पहिला जीव तयार झाल्याची वार्ता कानी आली होती परंतु माझ्या कुशीत मात्र अजून काही बदल झाला नव्हता.एके दिवशी मात्र काय कसं झालं काही माहीत नाही पण पर्वताच्या कुशीत दोन पानांच नवं काहीतरी वर येत असलेलं जाणवलं.मी धरती आईला विचारलं तर ती म्हणाली नवनिर्माणाचा हा आरंभ आहे. तिकडे महासागराच्या प्रसुतीत प्राणी येऊ लागले आहेत ,अन् इकडे पर्वताच्या कुशीत वनस्पती.ती पाने हळुवार वाढू लागली ,मला त्या नव निर्मितीचे भारी कौतुक.हळूहळू उंच पर्वतराजी,मध्यम डोंगररांगा, छोट्या टेकड्या ,सपाट जमीन नानाविध वनस्पतींनी गच्च भरली.मी काही वनस्पती सागराकडे पाठवल्या व सागरानेही काही प्राणी जमिनीकडे पाठवले.हळूहळू बदल होत महासागर व जमीन वनस्पती, प्राणी मुबलकतेने समृद्ध झाली.प्राणी,वनस्पतींचे आवाज,रंग,रूप,आकार पाहून धरणीमाता हरखून गेली.पर्वताच्या राकटपणाला,देखणेपण लाभलं.
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024 पर्वत दिनाचे महत्व
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
अव्याहत ,सुरळीत चाललेल्या आमच्या जीव सृष्टी चक्रात मानवी जीवाचं आगमन झालं.भीमकाय, अजस्त्र प्राणी सृष्टीत या दुबळ्या जीवाला मी माझ्या पोटात म्हणजे गुहेत आसरा दिला.वनस्पतींना मानवाचे अन्न व्हा म्हणून आज्ञा दिली. नव निर्माणाच्या कैक हजार वर्षांनी मानव रूपात एक वेगळाच जीव पर्वतराजीच्या कुशीत आला होता.आम्ही त्याचं खूप कौतुक केलं.
पर्वत दिनाच्या निमित्ताने तुम्ही मानव आमचं खूप खूप कौतुक करता पण या कौतुक सोहळ्यास खूप उशीर झालाय रे लेकरांनो.मला मारत मारत तुम्ही तुमच्या मरणाच्या रेषा गडद करत आहात.
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
चाकाचा,धातुचा,अग्निचा,शेतीचा शोध लावून तुम्ही स्थिर झालात.तुमच्या आधीपासून हत्ती,डायनोसॉर, वाघ,सिंह,चित्ता असे अगणित प्राणी सृष्टीत होते.त्यांच्या कुणाच्याही डोक्यात हे असलं काहीच आलं नाही म्हणून ते पृथ्वी निर्माणापासून ,त्यांच्या कित्येक पिढ्या गेल्या पण ते तसेच आहेत.माणुस मात्र पिढी गणिक बदलत गेला.दुबळा जीव इतका बलशाली झाला की विचारूच नका…. आम्हाला मानवाचं खूप खूप कौतुक.
पण आता मानवाने आमच्या नरडीलाच नख लावलंय त्यामुळे कौतुकाचा आमचा आवाज दबलाय,आमचा जीव आमचं अस्तित्व माणसामुळेच धोक्यात आलंय.गुहेत राहिलेल्या दुबळ्या माणसा,ज्यांनी नवागत जन्मजात माणसाच्या पिलाला निवारा दिला,आधार दिला त्याच माणसाची आधुनिक पिलावळ पर्वताच्या जीवावर उठली आहे.
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
प्रिय मानवा ,तुमचे व पर्वताचे नाते समजून घ्या.पर्वतदिनासारखा सुदिन हे नातं उलगडण्यास मदत करील.मानवी जीवनात पर्वतांचे महत्व व पर्वत संरक्षण व संवर्धन बाबत जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो.महासागर वगळता उर्वरित जमिनीच्या 22 % हिस्सा पर्वत ,डोंगराळ भागांनी व्यापलेला आहे. सपाट जमिनीच्या समतल भागापासून जो खडकाळ नैसर्गिक उंचवटा असतो तो भाग म्हणजे पर्वत.साधारण हजार फुटाच्या आतील भाग टेकडी,डोंगर या नावाने ओळखला जातो.व हजार फुटाच्या वरची डोंगररांग पर्वतराजी नावाने ओळखली जाते.
पर्वत हा जैव विविधता सांभाळण्यात अव्वल आहे.शेतीसाठी माती डोंगरावरून वाहत येते.नद्यांचे उगम पर्वतातच होतात.शुद्ध हवा व शुद्ध पाण्याचा स्त्रोत पर्वत आहे. पुरापासून संरक्षण करण्याची ताकद डोंगरात आहे.शेती,गुरे चरणे ,मौल्यवान लाकडं,औषधी वनस्पती, भक्कम निवारा या सर्वांसाठी पर्वतच आहे. पृथ्वीची त्वचा म्हणजे माती व पृथ्वीचे कवच म्हणजे आम्ही पर्वत.
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
देशोदेशींच्या सीमा ठरविण्यात आम्हीच पुढाकार घेऊन आमच्या उरातून सीमारेषा जाऊ दिली.तुम्ही दीर्घकाळ शांत राहत नाहीत.तुमच्या सीमा रक्षण करण्याच्या नादात आम्ही किती गोळ्या,किती बॉम्ब झेलले त्याची गणताच नाही.भेद माणसाचे पण त्रास पर्वतातील देशोदेशीच्या सीमांना.
हिमालय,कांचनजंगा,नंदादेवी, कैलास,सह्याद्री, गिरनार,विंध्य,अरवली,सातपुडा,तिरूमला,मनसादेवी,पावागड ही सारी माझ्याच कुशीतली ठिकाणं.धार्मिक,ऐतिहासिक, भौगोलिक वारशात आम्ही पर्वत माणसांसोबत आहोत.
विकासाच्या नावाखाली घाटवाटा ,खिंडीतले चार दोन दगड तुम्ही कापले .आमच्या उरात तेव्हाही जखम झालीच होती पण आमचा अगडबंब भव्य देह पाहता ती जखम छोटी होती.शिवाय माणसाचे सुख पाहण्याची चटक आम्हाला लागली होती.माणसाच्या विकासासाठी आमचे टवके इ्उडाले तरी आम्ही ते सहन केले.
यंत्र युगातला माणुस प्रचंड … हव्यासी निघाला.दगडाच्या ही कानठळ्या बनविणाऱ्या आवाजाच्या मशिन माणसाने आमच्या दारात आणून बसविल्या.कर्ण कर्कश आवाजात डोंगरच्या डोंगर सपाट करण्याचा सपाटा सुरू आहे. जैव विविधता नष्ट होत आहे. वनस्पतींचा आधार,प्राण्यांचा निवारा नष्ट होत आहे. हे माणुस लक्षात घेत नाही. डोंगर नाही तर पुढे शेतीसाठी माती नाही. भीतीने गर्भगळीत झालेले डोंगर पावसात स्वत:चे अंग कोसळताना पाहत आहेत.माळीण,ईर्शाळवाडी,वायनाड या दुर्घटना डोंगर पोखरण्याचा परिणाम आहे.समुद्रात भर टाकत तुम्ही सागराचा आकार कमी करत आहात .एकमेकांच्या अंगणात जायचे नाही हा पर्वत व सागरांतला करार आहे.माणुस या कराराला छेदत आहे.पण पर्वतांनी बर्फ सागराला दिला तर सागरातलं मानवी अतिक्रमण नष्ट होईल.
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
या मानवांनो, पुन्हा पर्वताकडे या.माझं देखणेपण पाहा.ट्रेकिंगला या,पर्यटनाला या.आपलं नातं समजून घ्या.पर्वतराजीने थोर महाराज छत्रपती शिवाजी महाराज घडविले आहेत.शत्रू सैन्याला खिंडीत कोंडण्यात आम्ही पर्वत राजीने महाराजांना मदत केली.मराठ्यांच्या गोफणीस दगड पुरविले.शत्रूच्या कपाळाचा वेध घेतला. सिंधु,नाईल, ॲमेझॉन, गंगा,यमुना,गोदावरी,कृष्णा,तापी,नर्मदा या पवित्र नद्या माझ्याच कुशीतून आल्या आहेत.तीर्थक्षेत्र निर्मिली.नानाविध रंग,रुप,आकार धारण केलेली फळे फुले झाड झुडपे वेली माझं वैभव आहे.त्यांचा आस्वाद घ्या.
पर्यटनाला फळे खा,बिया मला द्या.पुढच्यावेळी पुन्हा या ,त्या बियांचे फळ मी तुम्हाला देईल.
कवितेत,धड्यात,चित्रपटात,गीतात तुम्ही माझे खूप गोडवे गायिले आहेत.
पर्वतके पिछे चम्बेला गॉंव गॉंवमें दो प्रेमी रहते है कसलं भारी गाणं आहे राव .क्षणभर मी माझं राकट पण विसरून जातो.लहान मुले पळा रे पळा डोंगर पेटला हा खेळ खेळायची मस्त वाटायची.महादेव,खंडोबा, काळुबाई,कळसुबाई या देवता पर्वतराजीतच वसलेल्या आहेत.
जागतिक पर्वत दिन 11 डिसेंबर 2024
एक जपान देश आहे .जो की जागतिक पर्वत दिन दिवशी देशभर सुट्टी घेतो.अबाल वृद्धांसह जवळच्या डोंगराला भेट देतो.माऊंट फुजी हे माझं जपानी रूप त्यांना खूप पवित्र आहे.डोंगर राखणीत जपानचा आदर्श सर्व जगाने घ्यायला हवा.सूर्योदय व सूर्यास्त पाहण्याचं देखणं वैभव पर्वतांमुळेच देखणं असतं.सूर्य अलगद डोंगरातून वर येतो.चराचराला चैतन्य, ऊर्जा देत पुन्हा डोंगराआड जातो.
पर्वत नष्ट करण्याच्या नादात माणसा तूच नष्ट होशील.प्रगतीच्या लढाईत ,भव्य रणांगणात सर्वात शेवटी फक्त दोनच प्रेतं असतील
एक असेल माणुस व दुसरा असेल पर्वत.बाकी हवा वाहत राहील,पाऊस पडेल.सृष्टी पुन्हा बहरेल… नसेल तो फक्त माणुस.
पर्वत बोलायचा थांबला.आम्ही केवळ निःशब्द.
कचरू चांभारे बीड 9421384434
पर्वत दिनानिमित्त छान लेख वाचून कथा व व्यथा पर्वताची मानवाने समजून घेणे आवश्यक आहे.
डोळ्यात अंजन घालणारा लेख.. खूप छान 👍
धन्यवाद आचार्य
Good information 💐
Thank you so mach
Thanks
Thank you
खूपच छान !!
पर्वताचे आत्मवृत्त.
Thank you sir