चिमण्यांनो परत फिरा ,पाणी प्या जेवण करा चिऊताई चिऊताई अंगणी ये गं बाई


जागतिक चिमणी दिन 20 मार्च चिमणी चिमणी ये अंगणी
प्रिय चिऊताई ,
माझं पत्र पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल, नाही का ? अगं पत्रं व तू दोन्हीही दुर्मिळच झालंय.तसं तुला पत्र लिहायचंच होतं पण वेळच साधत नव्हती.काही महिन्यापूर्वी तू आमच्या घरात घर केलं होतंस ,तेव्हाच माझ्या मनातही तू घर केलं होतंस.आज 20 मार्च जागतिक चिमणी दिन म्हणजे तुझाच गौरव दिवस म्हटलं चला चिमणी दिनानिमित्त तुझ्याशी काहीतरी बोलावं ,म्हणून हा पत्र प्रपंच . लिहिलेलं पत्र पुन्हा पुन्हा वाचता येईल.
जागतिक चिमणी दिन 20 मार्च
आमच्या मानवात लोकोत्तर महान व्यक्तींच्या जयंती, पूण्यतिथी तसेच काही विशेष दिन आवर्जून साजरे केले जातात.असाच एक खास दिवस म्हणजे जागतिक चिमणी दिन 20 मार्च. तो आम्ही तुझ्यासाठी राखून ठेवला आहे.आता तुला प्रश्न पडला असेल ,हे सगळं कशासाठी ? पण ऐक, जागतिक चिमणी दिन 20 मार्च दिन विशेष जरी तुझा असला तरी तो आमच्या मानव जातीसाठी आहे.
सलीम अली,मारूती चितमपल्ली यांनी पाखरांवर आईगत माया केली.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नाशिकच्या मोहमंद दिलावरनेही नेचर फॉरएव्हर सोसायटी स्थापन करून पक्षांसाठी खास करून तुम्हा चिमण्यांसाठी खूप काम केले आहे. त्यांच्याच प्रयत्नांची दखल घेऊन 2012 पासून जागतिक स्तरावर जागतिक चिमणी दिन 20 मार्च साजरा करण्यात येत आहे.
जागतिक चिमणी दिन 20 मार्च
आम्ही जागतिक चिमणी दिन 20 मार्च आजच्या दिवशी चिमणी संवर्धनाची हाक देतो.अरे यार सॉरी ,तुला संवर्धन शब्दाचा अर्थ कळला नसेल.सांगतो सांगतो ,सगळं सांगतो.आज सविस्तर बोलतोय ,काही कळजी करू नकोस.

निसर्गामध्ये आमच्या आधी हवा,पाणी,प्राणी,वनस्पती व पक्षी तुम्हीच सृष्टीचे आद्य पंचप्राण. तुम्हा सर्वांचा सृष्टीवर पहिला अधिकार. आम्ही माणसं पृथ्वीवर खूप मागावून आलो पण सांगायला लाज वाटते की ,आम्हा मानवांच्या हव्यासी प्रमादामुळे नैसर्गिक अधिवासावर घाला घातला गेला आहे.त्यामुळे अनेक छोट्यामोठ्या पशूपक्षांचे जीवन धोक्यात आलं आहे.
जागतिक चिमणी दिन 20 मार्च
सृष्टीतलं तुम्हा सर्वांचं महत्व लक्षात घेता आता आम्हाला उपरती झाली आहे.म्हणून आहे ते पशूपक्षी वाचविणं ,त्यांची संख्या वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार करणं या कार्यक्रमाला आम्ही संवर्धन म्हणतो. चिमणी दिनाच्या औचित्याने आम्ही सारं करतो. जागतिक चिमणी दिन 20 मार्च यासाठीच तर आहे.
प्रिय चिऊताई ,अगं तुला सांगतो माणुस व चिमणी हे नातं फार फार पुरातन काळापासून चालत आलेलं.आमच्याकडे बाळाच्या पाळण्याला कापडाच्या चिमण्या बांधतात ,पाळणा हलला की हललेल्या चिमण्या पाहणं बाळासाठी खूप मौजेचं.आई ,बाबा ,भाऊ बहीण या आमच्यातल्या ओळखीच्या नात्यानंतर थेट ओळख होणारा पक्षी म्हणजे तूच गं चिऊताई .चिवचिव करत थवेच्या थवे अंगणी बसत.अंगणात वाळवत घातलेलं धान्य ,धान्यासोबत छोटेछोटे कीडे मुंग्या ,आळ्या हे तुझं आवडतं खाद्य.ते तेव्हा मुबलक होतं म्हणून तुमची संख्याही खूप असायची.
जागतिक चिमणी दिन 20 मार्च
जागतिक चिमणी दिन 20 मार्च चिऊताई अंगणी ये
लहान लेकराला घास भरवताना चिऊचा घास ,काऊचा घास असं ऐकल्याशिवाय घासच गळ्याखाली उतरत नाही.पहिल्या घासापासूनच तू आमच्या ओळखीची.चिऊ व काऊ हे दोन्ही शब्द उच्चारायला यमक सदृश्य असले तरी तुम्हा दोहोत खूप भेद आहे. चिऊचा घास लहानबाळाला भरवताना घासागणिक बाळ वाढत राहतं पण काऊला दिलेला घास पिंडदान ,श्राद्धाचा म्हणजेच शेवटचा घास असतो.काऊपेक्षा आमचा जीव चिऊवरच जास्त म्हणून तर आम्ही गोष्टीत पण तुझं घर मेणाचं बांधलं अन् काऊचं घर शेणाचं बांधलं.
आमच्या भारत देशात पशूपक्षी जगतात तुझी संख्या सर्वात जास्त आहे.तुझं मूळ स्थान आमच्या आशिया खंडातलं पण नंतर तू संपूर्ण जग व्यापलंस.युरोप ,अमेरिकेचे दोन्ही खंड ,आफ्रिका ,ऑस्ट्रेलिया अशा संपूर्ण भूभागावर,पर्वतावर तुझा वावर आहे.
जागतिक चिमणी दिन 20 मार्च
तुझ्या नराच्या कपाळाचा ,शेपटीचा राखाडी रंग ,छातीवरचा भला मोठा काळा डाग ,पांढरंशुभ्र पोट ,पाठीवरच्या तपकिरी तुटक तुटक रेषा खरंच छान दिसतात. मादी म्हणून तुझा तपकिरी रंग तर लय भारी.अजून एक गंमत सांगू का ? तुमच्या चिमणी वर्गाला एक एक पाऊल मागंपुढं असं आमच्यासारखं चालता येत नसल्यामुळं तुम्हाला दोन्ही पायं एकाचवेळी उचलून टुणुक टुणुक उडी मारत चालावं लागतं.या तुमच्या उड्यांमुळे हालचालीतली लयबद्धता लय भारी दिसते बघ.
गवत ,काडी ,कापूस ,दोरीचे धागे असं मिळेल ते उचलून काडी काडी जमा करून तुम्ही बांधलेलं सुबक घरटं मला खूप आवडतं.बरं अजून एक विशेष म्हणजे घर बांधताना तुझं आमच्या माणसासारखं कॉर्नरचाच प्लॉट पाहिजे ,मोठा रस्ताच पाहिजे असलं काही नसतं.तुम्हाला फोटोमागची ,भिंतीतल्या फटीची ,दिव्याजवळची,पुस्तकाच्या कपाटाची,घड्याळामागची अशी कुठलीही वळचणीची जागा चालते.झाडावरही तुझं घरटं असतं पण माणसाच्या घरात ,घर बांधणारी पक्षी जगातली तू एकटीच.बाकी दुसरा कोणताही पक्षी असं आमच्या घरात घर बांधत नाही.एवढ्या जवळून उडतेस पण कधी कुणाच्या हाती लागल्याचं ऐकण्यात नाही.
तुम्ही नरमादी दोघे मिळून घर बांधता ,जबाबदारीने बाळांचे संगोपन करता ,या गुणासाठी तुम्हाला मानलंच पाहिजे.फिकट हिरव्या रंगाच्या अंडीतून बाहेर आलेली कोवळी कोवळी पिले मी खूप वेळी पाहिली आहेत.पिल्यांना तुम्ही दोघेही भरवता ,त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत थांबता.खरंच हे कौतुकास्पद आहे.आमच्याकडे तर सगळ्या मुलखाचा हुशार म्हणणारा माणुस पण काही काही जण कुटुंब व्यवस्थाच नष्ट करायले निघालेत.बरं जाऊ दे ,चालायचंच. नीतीमत्ता व सामाजिक उत्तरदायित्वात तुम्ही चिमण्या माणसाच्या खूप पुढे आहात. एकदा तुम्ही जोडीदार म्हणून परस्परांना निवडलं की तुम्ही जन्मभर एकमेकांना सोडत नाहीत. माणसं मात्र नीतीमत्ता सोडून वागत आहेत.
जागतिक चिमणी दिन 20 मार्च
आम्ही माणसं चिमणी हा शब्द अजून दोन तीन ठिकाणी वापरतो बरं.जुन्याकाळी घरात एक छोटासा दिवा असायचा त्यालाही चिमणीच म्हणतो.माझ्या आधीच्या पिढीतले व सोबतच्याही अनेकजनांनी चिमणीखाली अभ्यास केलेला आहे.मोठ्या-मोठ्या कारखान्यात धूर बाहेर पडण्यासाठी धुरांडे (बॉयलर)असतात ,त्यालाही चिमणीच म्हणतात.किचनमध्येही चिमणी असते.एक गोष्ट ऐकून तुला खरोखरीच खूप आनंद होईल ,ते म्हणजे आम्ही लेकीच्या जातीला चिमणी म्हणतो.माहेरवाशीण म्हणून आलेल्या नववधूच्या तोंडावर हात फिरवून तिला थोरल्या आया ,वडीलधाऱ्या बाया चिमणी गं माझी असं म्हणत हाक मारतात तेव्हा आमच्या चिऊचं मन भरून येतं.एखादी चिमणी दुःखात असली की चिमणी गं माझी असं नुसतं म्हणायचा अवकाश की ती टपकन अश्रू ढाळते.असं नाही व्हायला पाहिजे पण आमच्या मनुष्य जातीची तऱ्हाच न्यारी.
तुझ्यासाठी गौरवाची बातमी सांगतो आमच्या भारत देशातल्या दिल्ली राज्याने तुला राज्य पक्षी म्हणून घोषित केलेलं आहे.मराठी साहित्यातले एक सारस्वत कवी ग्रेस यांनी त्यांचे एक पुस्तकच अंगणातील चिमण्यांना अर्पण केलेले आहे.माझे आवडते लेखक आचार्य अत्रेंची कन्या शिरीष पै यांनी चिमण्यांवर धडा लिहिला आहे. चिव चिव चिमणी अगं ए चिमणी,लग्न झाल्यावर चिमणी जाशील उडून,उठा उठा चिऊताई अशी कितीतरी गाणी तुझ्यावर आहेत ,कविता आहेत.चतुर चिमणी, एकीचे बळ असे धडे आहेत.
चिमणी पाखरं हा पिक्चरपण आहे.तुला वेळ मिळाला तर जरूर बघ.बरं थांब,नको बघूस नाहीतर.लेकराच्या ताटातुटीनं मन लई व्याकुळ होतं ,तुला असलं बघणं सहन नाही व्हायचं.
गेल्या पंचवीस वर्षात तुमच्यात 79 % घट झालीय. चीन नावाचा एक देश आहे, त्यांनी तर चिमण्या नष्टच केल्या आहेत. तुला म्हणून सांगतो, या चीनवाल्याचं काहीपण उरफाटेच असतं गं बाई. नको जाऊ तिकडं आता.
चिमणी नष्ट झाली की शेतातील पिकांवरील अळ्या सेवन करणारा हक्काचा पीक संरक्षक नष्ट होतो.
मुठभर धान्य अन् घोटभर पाण्यासाठी तुमचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.हे आता आम्हाला समजलं आहे म्हणूनच आमच्या अंगणाची शोभा नष्ट होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे कामाला लागलो आहोत.तुम्हाला धान्य,मध,शिजवलेला भात खूप आवडतो म्हणून हे अन्न आम्ही अंगणात टाकू. पण
तू अंगणी ये.येताना तुझ्या संपूर्ण समुहाला घेऊन ये.अंगणातले दाणे टिपून घे .तिथंच पाणी ठेवलंय ,घोटभर पिऊन घे.
चिऊताई तू आमच्या अंगणाची शोभा आहेस गं.जिथं असशील तिथून लवकर अंगणी ये.माझ्या घरातील चिमण्याही तुझी वाट पाहत आहेत. तुमच्यासाठी बाभुळ बोर या काटेरी झाडांची लागवड करू.तुम्हाला या झाडावर राहायला फार आवडतं.
जागतिक चिमणी दिनाच्या तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा .

कचरू चांभारे
बीड 9421384434


अप्रतिम लेख सर 🙏
आजही चिमण्या कुठेही दिसिली की लहानपणच्या आठवणी येतेच..आपला पहिला संगी साथी च आहे. आई,आजी हे त्या काळी जात्यावर भरडन सुपाने पाखडण्याचा आवाज झाला की भर-भर चिमण्या उडत यायच्या. हे पक्षी एकटे कोणतेही खाद्य खात नव्हते साऱ्या पक्षांना आवाज देऊ-देऊ खात होते. यात कावळा, मैना असे बरेच पक्षी यायचे.यांना बघणे व त्यांचे कडून शिकणे आनंदच होता.घरा लगत हे सर्व पक्षी आपले हितचिंतक आहे.कुणीही अनोळखी,साप, बिछू, पक्षी खाणारे पक्षी घार दिसला की खूप जोर जोरात ओरडुन आपणास अवगत करून देत.आवाज आला की आई,आजी लगत ओळखून घेत. आजही ज्या गावाचा विकास झाला नाही कवेलू,मातीचे, कुडाचे घर आणि गरिबी,गुरे ढोरे आहे त्या ठिकाणी हे सर्व पक्षी बघायला मिळतात.
जागतिक चिमणी दिनाच्या आपना सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 💕🙏💕
मनःपूर्वक धन्यवाद काका
Good आर्टिकल
Thank you so much sir
खूप छान आठवणी चिमणी च्या, आजकाल बघायला ही मिळत नाहीत चिमण्या, चिऊताई म्हणून लहानांना सांगता येत नाही, जोपासना व्हयला हवी, छान माहिती. धन्यवाद
धन्यवाद
जागतिक चिमणीदिनानिमित्त चिऊला लिहिलेलं पत्र आशयपूर्ण आहे. काँक्रिटीकरणामुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत आणि काही प्रजातीदेखील. अगदी लहानपणापासून आपल्या जीवनाशी जोडल्या गेलेल्या चिमणीचं नात्याचं छान वर्णन करतानाच, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी चिऊला वाचवणं गरजेचं आहे, हे आपण या लेखात प्रभावीपणे मांडलं आहे.
Thank you
खुप छान
माझ्या मुलीला ही चिमणी व तिची पिले फार आवडतात खुप छान लेख
Thank you
खूप छान लेख आहे
Thank you
अगदी खरं आहे , आत्ता चिमण्या दिसत नाहीत , अंगण नाही, अंगणवाडीत वाढणाऱ्या मुलांनाच कांही प्रमाणात चिमण्या दिसतात. शहरात अंगणं नाहीत, अंगणवाड्या नाहीत. सिमेंटची जंगलं सारी.
कॉन्व्हेंट मधे जाणारी या पिढीतली मुलं, आमच्या पिढीची
ही नातवंडं यांना चिमण्या चित्रात दाखविण्याची वेळ येऊ नये म्हणून चिमण्यांचं संवर्धन अतिशय महत्वाचं आहे, नाही कां ? या छोट्याश्या पक्षाने ” खरंच खूप
मोठी जागा व्यापलेली आहे, आपल्या भावविश्वात ….
धन्यवाद मातोश्री
सर्वांना आवडणाऱ्या,सर्वांच्याच परिचयाच्या या चिमण्या आणि आज त्यांचा जागतिक “चिमणी दिवस ” आहे त्या निमित्ताने….. आजचा हा आपला लेख खूप कांही सांगून जातो. खूप आठवणी पण आठवतात.
चिमणा चिमणी, त्यांचं भुर्रर्रकन घरात येणं, फिरक्या घेत बाहेर जाणं, आरशात पाहून चोचीने आरशावर मारणं,
एखाद्या फोटोवर बसून टकामका बघणं . अंगणात येणं, उन्हाळ्यात तर हमखास धान्य वाळवण्यासाठी
घातल्यामुळे,अंगणात गच्चीवर
या पिल्लाचं येणं, काय काय आठवतंय .
फोटोफ्रेमच्या मागे हमखास चिमण्यांचे घरटे , घरी असायचे. चिमणी चिमणा घरटे बांधू लागले की, मोठी मंडळी
म्हणायची आम्हा मुलांना, घरट्याला हलवून बघू नका,पिल्लाना तुम्ही हात लावलात तर त्यांचे आई वडील
त्यांना शिवून घेणार नाहीत. मग त्या पिल्लाचं कसं होणार ? असं आठवतं आत्ता. त्यामागचं कारण पण खूप मजेशीर असायचं. त्याचं संरक्षण करायचं असतं. त्यातली छोटी पिल्लं , गुलाबी गुलाबी रंग, त्याचं ते चिमणी चिमणा तोंडात खाऊ देतानाचा प्रसंग, त्यांचा नाजूक
चिवचिवण्याचा आवाज, सारं सारं आनंद देणारा , काय काय आठवलं. आम्ही भावंडं हे सारं दुरून बघायचो.
सर्वात महत्वाचं काय तर आपल्या घरातली ही छोटी चिमणी पाखरं, मुलं यांचं आणि चिमणा चिमणीच नातं तर
जन्म जन्मान्तरीच जणू !!! प्रत्येक घरातली मुलं चिऊचा घास , काऊचा घास घेऊनच वाढत असायचा. ये ग ये ग चिमणी, तुला गाते गाणी असायचं. “एक होती चिमणी एक होता कावळा ” साऱ्यांच्या घरी असायचं. ” चिमणी चिमणी दार उघड “कावळा म्हणतो. चिमणी त्याला थांबवत अससते दाराशी.” थांब माझ्या बाळाला अंघोळ घालतेय .”
या बाळाचं, सारं सारं करता करता किती वेळ जायचा
चिमणी आईचा, हे तर साऱ्या आयांचं प्रतिनिधित्व
करायची ही चिऊताई नाही कां? असं वाटतं.
मग कावळेदादाला थांबवून ठेवायची दाराशी. याचा अर्थ एका आईसाठी तिचं मूल, तिचं बाळ किती महत्वाचं असतं हेही कळतं. मानवी जीवनाचा दैनंदिन भाग असलेल्या या चिऊताई चिमणेदादांचं परत येणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे.चिमणी संवर्धनाचं कार्य आता झाले पाहिजे. तसा प्रयत्नही होतांना दिसतोय. ” ये गं ये गं चिमणी
माझ्या बाल्कनी च्या अंगणी “.. असं म्हणू या.
आज मी स्वतः त्या काळात जाऊन एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घेत होते. मनस्वी आनंद होत होता.
छान सर, परत एकवेळ शब्दांची गुंफण घालून आम्हाला तृप्त केले त्याबद्दल धन्यवाद, असेच आपल्या लेखणीतून उत्तम उत्तम लेख येत राहोत
धन्यवाद दादा
जागतिक चिमणी दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आपला लेख खूप छान होता
Thank you so much
आमच्या इथे पुष्कळ चिऊताई येतात.इतर खाद्यान्न देऊनही रोपं फस्त करतात.तरीही हा इवलासा पक्षी प्रिय आहे.
बालपणीची आठवण आहे चिऊताई.
पूर्वी मुलांना चिऊताई,कावळेदादा,कबूतर वगैरेंशी गप्पागोष्टी करत जेवण भरवलं जाई.आजकाल त्यांच्या हाती मोबाईल दिला जातो.
काहीही असो!
परंतु ही लाडकी चिऊताई जगलीच पाहिजे.
उत्तम लेख
मनःपूर्वक धन्यवाद
शहरातील सिमेंटच्या जंगलात चिमण्या आणि तत्सम पक्षी कमीच झाले आहेत. सुदैवाने आमच्या परिसरात बऱ्यापैकी हिरवळ(वृक्ष) असल्याने चिमण्यांचा चिवचिवाट कानावर येतो. प्रसन्न वाटते.
सर, आपण सुंदर लिहिले आहे. धन्यवाद!
धन्यवाद ताई
चिमणी जशी आपल्या जिव्हाळ्याची.. तसं जिव्हाळा जपून, अत्यंत सुंदर, रसाळ वाचनीय लेखन केले आहे. समृद्ध वाचनातून व अनुभवातून माणूस तयार झाला, की त्याला अभिव्यक्ती करावीशी वाटते. ही अभिव्यक्ती लेखनातून होणे …मोबाईल,इंटरनेट, फोटो, व्हिडिओ, इंस्टा या जमान्यात दुरापास्त होत आहे. मग लिहिलं म्हणून थोडी सगळे वाचणार… तेव्हा वाचावेसे वाटण्यासाठी .. सहजता, सुलभता आणावी लागते…., किती वेगवेगळ्या क्षेत्रातील चिमणी व तिचे चिमणीपण आपण लेखात आणले… खरंच खूप जबरदस्त लिहिले आहे…आपल्या लेखनाच्या नेहमीच प्रेमात असतोच…सलाम तुमच्या लेखनाला🙏🙏🙏🙏आपल्या लेखनातून आपण खूपच आनंद देता . धन्यवाद 🙏🙏
मनापासून आभारी आहोत दादा