जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

मैत्र शिंपल्यात मोती जन्मतो ,अट एकच..पाऊस मैत्री नक्षत्राचा हवा

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

मैत्रीशिवाय आयुष्य म्हणजे एक कलेवर

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट .दरवर्षी ऑगस्ट चा पहिला रविवार जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो.
शालेय वयात मला बिरबल अकबराच्या कथा फार आवडत असत.चतूर बिरबलाच्या चातुर्याच्या अनेक कथा मी शाळेत ,कॉलेजला असताना सांगत असे.पुढे मी शिक्षकी व्यवसायात आलो त्यामुळे कथा सांगणे व ऐकणे या दोन्ही पातळीवरचा आनंद चाखण्याची संधी मला मिळाली.


जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

बीड जिल्ह्यात अजूनही मोठा पाऊस झाला नाही.त्यामुळे सहजच मला आज अकबर-बिरबलाची एक कथा आठवली.ती कथा पावसाळी नक्षत्रांचं महत्व सांगणारी आहे.एकदा अकबर दरबाराला प्रश्न विचारतात की 27 मधून नऊ गेले तर किती उरले ? बिरबल वगळता सर्वांच्या मुखातून एकमुखी 18 हे उत्तर आले.चतुराई व वेगळेपणाची मिसाल असलेला बिरबल मात्र शांत होता.गुणग्राहक राजाने ताडले की बिरबलाला वेगळे उत्तर द्यायचे आहे.राजसिंहासनावरून नजर संमती मिळताच बिरबल उत्तरला.
महाराज सत्तावीसमधून नऊ गेले तर खाली शून्य उरतं.बिरबलाच्या या उत्तरानं दरबार कावराबावरा झाला व कुतूहलाने एकमेकांकडे पाहू लागला.या एकमेकांकडे पाहण्यातले काही चोरटे कटाक्ष सम्राटाकडेही होते व बिरबलाकडेही होते.अकबरालाही कुतूहल असले तरी तो आतून आश्वस्त होता कारण बिरबलाचा बकूब राजा जाणून होता.


बिरबलाने शून्य उत्तराचे स्पष्टीकरण दिले ते असे की वर्षमानात एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत.या सत्तावीस नक्षत्रापैकी रोहिणी ,मृग,आश्लेषा ,पुष्य ,हस्त ,मघा असे नऊ नक्षत्र पावसाचे असतात.जर ही नऊ नक्षत्रे कोरडी गेली तर बाकी नक्षत्रांना काहीच अर्थ राहत नाही.पाऊस पाणी नाही तर बाकी काही नाही.म्हणून सत्तावीसमधून नऊ गेली तर शून्य उरतं.कोरडंठाक शून्य.


नक्षत्रावरून मला अजून एक आठवलं स्वाती नक्षत्र.समुद्र शिंपल्यात मोत्याची निर्मिती होती ती स्वाती नक्षत्रातील जलधारेत.या नक्षत्रातील जलधारा शिंपल्यात पडली तर त्या शिंपल्यात मोती निर्माण होतो.म्हणजेच शिंपल्याकडे मोत्याचं नैसर्गिक मातृत्व जात असेल तर स्वाती नक्षत्रातील जलधारेकडे पितृत्व आपसूकच जातं.


मानवी जगताला मिळालेलं मैत्री धन हे ही असंच एक सुंदर नक्षत्र. शिंपल्याचं मोती करणारं.अंधार दाटला की हात धरून पावलागणिक पाऊल पाऊल सोबतीनं चालणारं.मैत्रीतही शिंपल्यात मोती जन्माला येतो पण या मैत्री जलधारा नैसर्गिक मैत्रीतल्या असल्या पाहिजेत.या मैत्रीत भूतकाळात काय दडलंय व भविष्यात काय घडणार आहे हे विचार करण्यात वेळ दवडला जात नाही.यावेळी फक्त मैत्री हात एवढंच जपलं जातं.हाच तो क्षण असतो जगण्याला समृद्ध बनविण्याचा अन् मित्राकडे देवदूत म्हणून पाहण्याचा.समृद्ध मित्रांचा सहवास ज्याला लाभला तो खरोखरच भाग्यवान .


मित्र सखा म्हटलं की मला श्रीकृष्णाची आठवण येते.मनाच्या व डोळ्याच्या कक्षेच्या मर्यादा पडाव्यात इतकं श्रीकृष्ण चरित्र मोठं आहे.श्रीकृष्णाची तीनरूपे मला विशेषत्वाने आवडतात.सुदामासारख्या गरीब बालमित्राचं आर्थिक दारिद्रय पिटाळून लावणारा मित्रसखा सवंगडी श्रीकृष्ण.दुसरं म्हणजे करारापुढे हतबल झालेले पांडव व अगतिक असलेल्या वयोवृद्ध तपोधारींच्या समक्ष वस्त्रहरण होत असलेल्या सभेत द्रौपदीची इज्जत राखणारा बंधूसखा श्रीकृष्ण .तिसरं म्हणजे गोंधळलेल्या अर्जूनाला उपदेश करणारा गुरूसखा .कमीअधिक प्रमाणात आजही माणसाच्या वाट्याला हे तीनही प्रसंग येतातच.हतबल झालेल्या माणसाच्या हाती उरतो फक्त धावा अन् हाकेला ओ देऊन धावत येतो बंधूसखागुरूसखा मित्र श्रीकृष्णच पण मुरलीधारी रूपात न येता तो येतो मित्राच्या रूपात रोज भोवताली वावरणाऱ्या सख्यासवंगडीच्या रूपात.

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

मैत्री ही निकोप सामाजिकतेची पाठशाळा आहे.
मैत्री व माझं आयुष्य यांचं नातं काय ? याच्या उत्तरासाठी मी एवढेच म्हणेन की सत्तावीस नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्र वजा केली तर बाकी नक्षत्रांची किंमत शून्य होते.तसं आयुष्यात मिळालेल्या अनेक नातेसंबंधातून मित्रता वजा केली तर आयुष्य शून्य होऊन जाते.


मैत्री ही खूप विशाल संकल्पना आहे.माझ्यासाठी तर मैत्री हाच जीवनरस होय.सोडावॉटरची बाटली उघडताच फसफसत सळाळत फेस वर यावा अन् काही क्षणातच सर्वकाही थंड पडावं .असली प्रतिसादकावर आधारित तात्पुरतं चैतन्य असलेली मित्रता मला मुळीच मान्य नाही.खरी मैत्री मुळापासून ते खोडापर्यंत ,खोडापासून ते फांदीपर्यंत ,फांदीपासून ते पानापर्यंत ,पानापासून ते कोवळ्या पालवीपर्यंत असं झाडाच्या सर्वांगात रसरस चैतन्य भरावं अन् त्या जीवनरसानं झाड टवटव दिसावं अशी असावी मैत्री,आयुष्याच्या सर्वच पायऱ्यांवर रसरसीत ,टवटवीत.


कारण न सांगताही जो दुःख जाणतो ,परिस्थितीने निर्माण केलेली विवशता जो जाणतो तोच सर्वोत्तम मित्र होय.आपलं जीणं हे उपकारकर्त्या मित्रांनी दिलेल्या चैतन्यमयी क्षणातून उतराई होण्यासाठी नियतीकडून उसणं घेतलेलं आयुष्य आहे,असं वाटत राहावं.मैत्रीच दु:ख विसर्जित करून हास्य फुलविते.

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट
जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

अनपेक्षित वळण घेणाऱ्या आयुष्य जीवनवाटेवर अनेक प्रसंग असे असतात की एकतर माणुस कोसळतो ,उद्धवस्त होतो किंवा संपतो.अशा कोसळत्या क्षणी निसरडत्या बाजूने वेगाने घसरण चालू असताना कोणीतरी आपला हात घट्ट पकडून आधी घसरणं थांबवितो व मग पुन्हा उभारी देऊन नव्याने जगण्याची मांडणी करून देतो.त्या घसरत्या क्षणाला जो वाचवितो तो एकतर देवदूत असतो नाहीतर देवापेक्षाही श्रेष्ठत्वाचा अविष्कार असतो.ती असते मैत्री.मी तुझ्यासोबत आहे ,काळजी करू नकोस,हा सर्वोच्च शक्तीमान मंत्र मैत्री विश्वाचा प्राण जप आहे.मित्राने पाठीवर ठेवलेल्या हाताने अंगात बळ येतं अन् समस्यांचं पाणीपाणी होऊन जातं.

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

जगण्याचे धागे अर्थकारणाशी जोडले गेल्यामुळे मात्र मैत्री धाग्याला कुरतडलं जात आहे.मैत्री हे एक असं नातं आहे जिथं सहवासाच्या व विरहाच्या आठवणी सारख्याच ताकदीने माणसाला चैतन्य देतात.तुटलेल्या मैत्रीच्या ओरखड्यातूनही सोबत घालवलेल्या सुखद क्षणांचीच भळभळ वाहत असते.


जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

मैत्री ही बँड नव्हे तर तो काळीज धाग्याचा ब्रँड असला पाहिजे.
शालेय वयातील मैत्री चिरकाल स्मरण देणारी असते.श्रीकृष्ण सुदामा यांच्या मैत्रीचे गोडवे आजही गायिले जातात पण आज आपण भोवताली पाहिले तर श्रीकृष्ण व सुदामा यांची मैत्रीच होऊ नये यासाठी खुद्द पालकच अग्रेसर असतात.मैत्री ही निरामय प्रेम भावना आहे.तिचा उगम हृदयातून होत असतो.निर्मळ मनाचे सुमधुर संगीत म्हणजे मैत्री होय.एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे पण वेगवेगळ्या आईच्या पोटी जन्माला आलेले जीव म्हणजे मैत्री होय.


लहानपणी मैत्री सहज जुळते. एकत्र खेळता खेळता सामाजिक समायोजनाचे , ताणतणावाच्या समायोजनाचे ,राग व प्रेम व्यवस्थापनाचे धडे मैत्रीतच गिरवले जातात. शालेय वयातील मैत्री ही सहज व तितकीच सुंदर असते आजही ती मैत्री आठवली म्हणजे सर्वच घटना दृष्टी पटलावरुन तरळून जातात.

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट


व्यावसायिक मैत्री ,नोकरीच्या ठिकाणी जुळलेली मैत्री ह्या बाबी जरी मैत्री सदरात येत असल्या तरी ह्या गोष्टी झाडाला कलम केलेल्या घटनेप्रमाणे असतात.व्यवहारात व नोकरी कर्मात कुठेही थोडी जरी बाधा आली तर मैत्री संपलीच म्हणून समजा.कारण बालमैत्री सोडून इतर मैत्रीस कळत नकळत व्यावहारिक किनार असते.समज गैरसमजातून बळी जातो तो मैत्री धाग्याचाच.परस्पर सामंजस्य , त्याग ,विश्वास हे मैत्रीचे प्राणवायू आहेत यापैकी एखादा जरी घटक कमी झाला तर मैत्रीचा गुदमरून मृत्यू होतो. विनिमयाचे साधन पैसा झाल्यापासून मानव जातीतील अनेक नातेसंबंध धोक्यात आले आहेत.त्याला मैत्री हे नातेही अपवाद उरले नाही.


जगण्याची उमेद ही मैत्रीतूनच फुलते.त्याने दिलेला पाठीवरचा हात व आधार शंभर पहाडाचं बळ देऊन जातो.मैत्रीत ढाळलेला एक अश्रू सागराच्या बरोबरीचा असतो.सुखात व दुःखात मित्राला मारलेली मीठी सुखाला आसमंती उंची देणारी असते तर दुःखाला खोल जमिनीत नेऊन गाडणारी असते.मित्र दिसता क्षणी दोघांच्याही चेह-यावर तराळणारे हसू हे जन्मोजन्मीच्या हृदय मिलनाची खूण असते.


बालपणीचे मित्र हे जीवनाचे नैसर्गिक खत आहे. नंतरच्या आयुष्यात मिळणारे मित्र हे रासायनिक खत आहे.रासायनिक खतामुळे वाढ जोमाने होते पण खताची मात्रा चुकली तर पीकच जळून जाते.सहवास ,विचारधारा हे मैत्रीचे पैलू दृष्टीआड करून चालत नाहीत.मैत्री नात्याची सुंदरता निकोप समाज निर्मितीत मोलाची भर टाकत असते.कुणाला मित्र म्हणण्यापेक्षा ज्याला आपल्या काळजातील व आपल्याला त्याच्या काळजातील गीत कळत असेल तरच त्याला काळीजमायेचं पांघरूण द्यावे मग हे गीत सुखाचे असो वा दुःखाचे.डोळ्यातल्या अश्रुमागचे सुखाचे उधान व दुःखाचे उमाळे ज्यांना दर्शनाने अथवा स्पर्शाने जाणवते ती मैत्री मानवजातीच्या कल्याणाची पायाभरणी असते.

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

मैत्री वय ,उंची ,जात,धर्म, लिंग,गाव,शिक्षण,व्यवसाय ,संपत्ती या मानकावर आधारित कधीच नसावी नाहीतर शुद्र विचारधारेची मंडळी गरजेच्या अपूर्णतेतून मैत्री संपुष्टात आणतात व मैत्री या त्रैलोक्य भावनेला ,नात्याला कलुषित करतात.


कारण न जाणता,केवळ स्नेहभाव जपून निस्वार्थ निर्मळ सर्वकालीन क्षण क्षण मैत्री जपणाऱ्या स्नेही जनांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .गुरू , मित्र ,आप्त अशा सर्व संबंधातून माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक मैत्री तत्वाचा ऋणी आहे.मैत्री विश्वातल्या संपत्तीचा मला अभिमान आहे.कोलमडत्या जीवनाचा आधार म्हणजे मैत्री ,वेदनेतली छाया म्हणजे मैत्री.

मैत्री आहे तर जगण्यात प्राण आहे नाहीतर हे जीवन एक रंगबिरंगी सजावटीचे कलेवर आहे.

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट


कचरू चांभारे बीड 9421384434

kacharuchambhare.com

जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट

22 thoughts on “जागतिक मैत्री दिन 4 ऑगस्ट”

  1. मैत्री दिना निमित्त आपला लेख सर्वांनी वाचवा व बोध घ्यावा असा आहे. सर आपण कितीतरी मित्र परिवार जोडले आहे. मला आपल्या मैत्रीचा खूप खूप अभिमान आहे. 🙏🙏🙏

    Reply
  2. आमचे कचरू चांभारे सर म्हणजे मैत्रीच्या दुनियेतले राजा माणूस लेखणीतली महालक्ष्मी कडकलक्ष्मी तोफ एका पायाने अपंग असून देखील एखाद्या सृजान व्यक्ती पेक्षा जास्त गड किल्ले सर केले ला असा आमचा जिवलग मित्र त्यांना मैत्री दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

    Reply
  3. मैत्री च्या वलयातील पदर अलगद उलगडून मैत्रीपूर्ण सरीनी चिंब भिजवल्याबद्दल धन्यवाद

    Reply
  4. दादा मैत्री कशी असावी हे तुमच्या सहवासात राहून मला उमगले.
    मैत्री मध्ये कधीच स्वार्थ आड येता कामा नये.
    खूप छान वाटले आपला लेख वाचून

    Reply
  5. मित्राचा लेखातील पितृत्व, मातृत्व आणि कृष्णाच्या तीनही रूपे जबरदस्त मांडणी.
    उत्तम मैत्री लेख

    Reply

Leave a Comment