थोरांची ओळख इयत्ता 3 री

थोरांची ओळख इयत्ता 3री

थोरांची ओळख इयत्ता 3 री
थोरांची ओळख इयत्ता 3 री

थोरांची ओळख इयत्ता 3 री समृद्ध वारसा
तिसरीच्या जुन्या पुस्तकाची ओळख

थोरांची ओळख इयत्ता 3 री हे पुस्तक इयत्ता तिसरीसाठी इतिहास म्हणून 1969 पासून होते.तर भूगोल विषयासाठी दोन विभाग समाविष्ट असलेले एक छोटे वेगळे पुस्तक होते.यातील पहिल्या भागात पृथ्वी, सूर्य,चंद्र,ग्रह,तारे,वेळ,दिशा,उपदिशा इत्यादी भौगोलिक घटकांची ओळख होती.हा आशय महाराष्ट्रात सर्व शाळांत समान होता व दुसऱ्या भागात आपापल्या जिल्ह्याची ओळख होती.पुस्तकाचे नावच होते आपला …. जिल्हा. या पुस्तकात आपला जिल्हा, मुख्यालय,तालुके,जिल्ह्यातील नद्या,धरणे,पर्वतरांगा, उद्योगधंदे,ऐतिहासिक ठिकाणे,बाजारपेठा,रस्ते मार्ग अशी ओळख असे‌.

इतिहास व भूगोल दोन्ही पुस्तकाची मांडणी मुलांना ज्ञानवर्धी बनविण्यास उपयुक्त होती.
थोरांची ओळख हे पुस्तक तिसरीसाठी इतिहास म्हणून तब्बल पंचवीस वर्ष अभ्यासक्रमाचे क्रमिक पुस्तक होते.म्हणजेच 1969 ते 1993 या पंचवीस वर्षाच्या काळात तिसरीत शिकलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक अभ्यासलेले आहे,पाहिलेले आहे.आणखी वेगळ्या भाषेत सांगायचे म्हणजे आज रोजी हयात असलेला ,मराठी भाषेत शिकलेला एकतीस वर्ष व पुढील वयाचा प्रत्येक व्यक्ती थोरांची ओळख शिकलेला आहे.


थोरांची ओळख इयत्या 3 री या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आजचा लेख लिहित आहे.ज्यांनी थोरांची ओळख इयत्ता 3री अभ्यासलेले आहे,त्यांच्यासाठी आजचा लेख म्हणजे आठवणींना उजळणी असेल व नवीन वाचकांसाठी थोरांची थोर ओळख असेल.

थोरांची ओळख इयत्ता 3 री

माणुस घडविणारे पुस्तक


थोरांची ओळख इयत्ता 3 री या पुस्तकाशी माझे खास नाते आहे. भाषणाची आवड असल्यामुळे तिसरीत असतानाच मी हे पुस्तक तोंडपाठ केले होते.याच पुस्तकामुळे मला महापुरूषांची चरित्रे वाचण्याची आवड निर्माण झाली. थोरांची ओळख इयत्ता 3 री या पुस्तकासोबतची दुसरी आठवण म्हणजे जन्मभूमीतील मातंग समाजाचे ,उत्तम पिपानीवादक बाबुराव कारके यांची व माझी गट्टी.बाबुराव कारके हे दोन्ही डोळ्यांनी अंध होते.त्यांचा भाचा केरबा गायकवाड माझा वर्ग मित्र असल्याने माझी त्यांच्याकडे खूप ये जा असे. थोरांची ओळख इयत्याता 3 री या पुस्तकातील दलितांचे कैवारी डॉ. आंबेडकर हे प्रकरण ते मला मोठ्याने वाचायला लावत व ते फार मन लावून ऐकत.थोरांची ओळख इयत्ता 3 री हे पुस्तक 1969 साली आलेले असल्यामुळे व डॉ. बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न दिलेला असल्यामुळे तिथे बाबासाहेबांसाठी भारतरत्न शब्द वापरलेला नाही. बाबुराव मला विचारायचे की इथं भारतरत्न छापलं नाही का ? मी नाही म्हणायचो पण ते मला भारतरत्न उच्चारायला लावायचे.हे बाबुराव मला पुस्तक मोठ्याने वाचल्यामुळे दर गुरूवारी बाजारातून आणलेला शेवचिवडा देत असत.गुरूवारी खरेच माझ्या वाचनाला विशेष सूर लागत असे.संस्कार घडविणारे पुस्तक म्हणून मी थोरांची ओळख पुस्तकाकडे पाहतो.


केवळ घटनांचा मागोवा,सिंहावलोकन म्हणजे इतिहास नव्हे तर थोरांचे कर्म,शिकवण, त्यांची जडणघडण ,वैचारिक वारसा लक्षात घेऊन ते सर्व जपणारी कृती करून मानवी कल्याण साधण्याचे वर्तन करणे व अशा आचरणाचा समुह विकसित करणे हा खरा इतिहास आहे.


थोरांची ओळख इयत्ता 3 री पुस्तक छोटे आहे. परंतु वैद्यकीय औषध मात्रांत जसे आवश्यकतेप्रमाणे अनेक घटक एकत्र करून एकच परिणामकारक औषध तयार केले जाते तसं थोरांची ओळख हे सामाजिक भान व देश अभिमान भाव वृद्धीस लावणारे प्राथमिक औषध आहे.


थोरांची ओळख 3 री या पुस्तकात एकूण 25 प्रकरणे असून शेवटचे पंचवीसावे प्रकरण नागरिकशास्त्र बाबत आहे.या प्रकरणात ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांची रचना व कार्य बाबत लहान मुलांना समजेल अशा अतिशय सोप्या भाषेत मांडणी आहे.


प्रकरण एक ते चोवीसमध्ये इंग्रज राजवटीखाली आपला देश असताना, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींचा परिचय आहे. हा परिचय केवळ बायोडाटा अशा स्वरूपाचा नसून त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख आहे.ही ओळख मुलांच्या मनात जिज्ञासा निर्माण करते व महनीय थोर पुरूषांची अधिकची माहिती घेण्यास प्रवृत्त करते.


थोरांची ओळख इयत्ता 3 री पुस्तकातील पहिलेच प्रकरण आहे पितामह दादाभाई नौरोजी यांचे.इंग्रजी राजवटीखाली आपला देश कंगाल होत चालला होता. भारतीय जनतेच्या समस्या इंग्रज सरकारला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन ठणकावून सांगणारा भारतीय म्हणून दादाभाईंची ओळख आहे.
दुसरे प्रकरण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आहे.या देशाने टिळक पर्व पाहिलेले आहे.त्यांच्या स्फूर्तिदायी ओळखीचे प्रसंग व कार्य इथे आहे.

क्रांतिकारी नेता,पंजाबचा सिंह म्हणून लाला लजपतराय यांची ओळख तिसऱ्या प्रकरणात येते.लाला लजपतराय यांचे नाव समोर आले की आपल्या मनात लगेच सायमन कमिशन गो बॅक चे चित्र उभे राहते.हे चित्र आपल्या पिढीत शिल्पागत कोरल्याचे काम थोरांची ओळख पुस्तकाने केलेले आहे.


थोरांची ओळख इयत्ता 3 री पुस्तकात चौथ्या प्रकरणात गांधी बापूजी भेटतात. गरीब ,दीन दुबळे ,हरिजन यांविषयी संवेदनशील असलेले बापूजी वाचायला मिळतात. पाचव्या प्रकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांची ओळख आहे. लहानपणी त्यांच्या बगलेतली गाठ स्वतः च्या हाताने तप्त सळईने चर्रर कापणारा धाडसी नेताच पुढे लोह पुरूष म्हणून कर्म सिद्ध झाला.


थोरांची ओळख इयत्ता 3 री सहाव्या प्रकरणात मौलाना अबुल कलाम आझाद यांची ओळख आहे.वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी अल् हिलाल हे वर्तमानपत्र काढून त्यांनी इंग्रजी सत्तेला हलविले होते.चले जाव चळवळीत त्यांना तुरूंगवास झाला.स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.


भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची व आपली भेट सातव्या प्रकरणात होते.बिहार राज्यातला त्यांचा जन्म.बिहार राज्याने अनेक देशभक्त नेते दिले.
नवभारताचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना अर्थात पंडित नेहरूंना आपण भेटतो आठव्या प्रकरणात.माझ्या देहाची मुठभर रक्षा गंगेत,मातृ भूमी मातीत टाकावी.कण कण मिसळून जावा,इथल्या मातीत. किती उदात्त ! नाही का ?


स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस नवव्या प्रकरणात भेटतात. परदेशात राहून त्यांनी आझाद हिंद सेना ,जय हिंद च्या जय घोषात लढती ठेवली.निसर्गाच्या सान्निध्यात गुरूकुल चालविणारे थोर लेखक, कवी देशभक्त गुरूदेव रवींद्रनाथ टागोर दहाव्या प्रकरणात भेटतात.


थोरांची ओळख इयत्ता 3 री पुस्तकात सरोजिनीदेवी नायडू अकराव्या प्रकरणात आहेत.कविता करणं व सुस्वर, मधुर आवाजात कविता गाणं हा जन्मजात गर्भश्रीमंती लाभलेल्या सरोजिनीदेवी यांचा छंद. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या आग्रहाने त्या स्वातंत्र्य लढ्यात आल्या‌.दांडी यात्रेवेळी महात्मा गांधी यांना अटक होताच शेवटच्या टप्प्यात दांडी यात्रेचे नेतृत्व सरोजिनीदेवी यांनी केले.

थोरांची ओळख इयत्ता 3 री
थोरांची ओळख इयत्ता 3 री


आजही भारतीय उद्योग जगतावर टाटा नावाचे गारूड आहे.प्रखर देशभक्त उद्योजक म्हणून टाटा समुहाची ओळख आहे. टाटा उद्योगाचे जनक,पितामह जमशेदजी टाटा यांची ओळख बाराव्या प्रकरणात आहे.जिद्द व जिद्दीचे उत्तर आहे उद्योगनगरी जमशेदपूर.

दलितांचे कैवारी डॉ.आंबेडकर भेटतात तेराव्या प्रकरणात.दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले.वनस्पती व प्राणी यांनाही माणसाप्रमाणेच भाव भावना संवेदना असतात. हे सिद्ध करणारे संशोधक शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस पुढच्याच प्रकरणात भेटीला येतात त्यांची आगळी वेगळी माहिती सांगून जातात.


पंधराव्या प्रकरणापासून आपल्याला परिवर्तनवादी सुधारकांची ओळख होते.देश बांधवांसाठी इंग्रजी शिक्षणाचा आग्रह व सतीसारख्या अमानुष चाली बंद करण्याबाबत त्यांनी इंग्रज सरकारला बाध्य केले. सर्व धर्म सम भाव शिक्षण देणारे रामकृष्ण परमहंस व युवाशक्तीचे जगज्जेते स्वामी विवेकानंद लागोपाठच्या दोन प्रकरणात भेटतात. हिंदू धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवर प्रहार करणारे स्वामी दयानंद सरस्वती अठराव्या प्रकरणात भेटतात.


क्रांतिकारी समाजसुधारक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ,ते महात्मा फुले एकोणिसाव्या प्रकरणात भेट देतात. हौदातील पाणी सर्वांसाठी खुले करण्याची त्यांची कृती किती क्रांतिकारी होती हे मोठं झाल्यावर समजले.
महात्मा गांधी व सरोजिनीदेवी नायडू यांच्यासारख्या अनेक दिशा दर्शी महापुरूषांना समाजसेवेत व राजकारणात आणण्याचे श्रेय गोपाळकृष्ण गोखले यांना जाते.त्यांच्या नावासोबत असलेल्या भारतसेवक या उपाधितच त्यांचे थोर कार्य सामावलेले आहे.त्यांचे प्रकरण आहे विसावे.


देशबंधू चित्तरंजन दास व योगी अरविंद घोष यांची माहिती प्रकरण वीस एकवीस मध्ये मिळते. राजा होण्यासाठी आलेला ,आत्मविश्वासाने भरलेला बालक व तरूणपणीचा थोर राजा महाराजा सयाजीराव गायकवाड तेविसाव्या प्रकरणात भेटतात. स्त्री शिक्षणाचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे यांची थोरवी गात पुस्तकास पूर्णविराम मिळतो.
पण हे पुस्तक इथंच न थांबता देशसेवक,उद्योजक, महनीय नेते घडविण्यास हे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करते.
म्हणून मला वाटतं की थोरांची ओळख हे पुस्तक आणखी काही थोर व्यक्तींची चरित्र समाविष्ट करून पुन्हा नव्याने कायमस्वरूपी यावं.

थोरांची ओळख इयत्ता 3 री

थोरांची ओळख इयत्ता 3 री
थोरांची ओळख इयत्ता 3 री

कचरू सूर्यभान चांभारे
मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी
9421384434
kacharuchambhare@.com

29 thoughts on “थोरांची ओळख इयत्ता 3 री”

  1. आम्ही हे पुस्तक स्वतः शिकलोत व शिक्षक म्हणून शिकवले सुद्धा . थोरांची ओळख हे इतिहासाचे व आपला बीड जिल्हा हे भूगोलाचे पुस्तक कधी कळलेच नाही. थोरांची ओळख व आपला बीड जिल्हा हे दोन्ही पुस्तके मला तर पाठच झाली होती . तुमच्या आजचा लेख वाचून मला विद्यार्था असतांना ही पुस्तके कोणत्या गुरुजीनी शिकविले व आपण कोणत्या शाळेवर शिकविली याचे स्मरण तर झालेच पण त्या बरोबर मी विद्यार्थी ते शिक्षक असा प्रवास देखील वाचतांना झाला . आपले लेखन वाचनीय व प्रमाणित असते त्यामुळे मी आवर्जून वाचतो धन्यवाद कचरू गुरुजी.. 🌷🌹🙏

    Reply
      • 1979 मध्ये तिसरीत असताना आपल्याला हे पुस्तक होते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील सेनानी यांची माहिती देणारे बालवयातील सर्वात पहिले पुस्तक होते. आजच्या तिसरीच्या मुलांना यातील काहीच समजू शकत नाही. त्या काळात ते पुस्तक तोंडपाठ झाले होते. लोकमान्य टिळक महात्मा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी दयानंद सरस्वती यासारख्या थोर पुरुषांची चरित्रे त्या काळात फार लवकर वाचली गेली.
        चांभारे सर अतिशय सुंदर पुस्तकाचा आपण परिचय करून दिला.
        प्रतिक्रिया :-
        श्री धनंजय सुलाखे मुख्याध्यापक जि प प्रा शा राजपिंपरी तालुका गेवराई जिल्हा बीड

        Reply
  2. या पुस्तकाची आठवण सदोदित येते.
    एकत्रित रित्या या पुस्तकाने भारतीय इतिहासातील विविध प्रांतातील नेत्यांनी केलेले कार्य त्याकाळात समजेल अशा भाषेत समजून गेले.हा नेता आवडतो तो नाही असे काही झाले नाही.शिकविणाऱ्या शिक्षकांनी देखिल गोष्टीरुप पुणे शिकविले.त्या नेत्यांच्या रंगीत फोटो बरोबर अजूनही कार्य लक्षात आहे.

    Reply
  3. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपली पोस्ट वाचनात आली आणि थोरांची ओळख ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसताच मी थेट 70 सालात मी शिकत असलेल्या माझ्या 3रीच्या वर्गात जाऊन बसले, ऐक्या छोट्याश्या मातुलठाण तालुका येवला ह्या गावातील माझी शाळा पहिली ते चौथी एकच गुरुजी आणि आम्ही सर्व एकत्र चार वर्ग सरळ रेषेत चार ओळीत बसत होतो, आमची शाळा आम्ही विद्यार्थी शेण पाण्याने सारवत असे आमचे पोत्याचे बस्कर घेऊन आम्ही सर्व विद्यार्थी थोरांची ओळख अगदी मन लावून ऐकत असत त्या वेळी खरोखर आपण ही भविष्यात असे काही कार्य करावे असे मनोमन वाटे त्यामुळेच की काय शाळेची स्वच्छता करताना कधी लाज नाही वाटली, आम्ही सर्व पहिली ते चौथ्या वर्गातील विद्यार्थी शाळा आणि शाळेबाहेरील आवार झाडून स्वच्छ करायचो त्याबद्दल आमच्या पालकांनी सुद्धा कधी आक्षेप घेतला नाही, कधी एकदाची सकाळ होते आणि आम्ही शाळेत जाऊ असे वाटायचे, आणि त्याच वेळेस मनात रुजलेल्या सेवाभावी वृत्तीने आज मी डॉक्टर होउन लोकांसाठी काहीतरी करू शकते ह्याचा मला मनापासून आनंद आहे, खरेच असे पुस्तके पुन्हा आपल्या लहानग्यांच्या वाचनात यावेत हीच मनोमन इच्छा, कचरू सर आपल्या ह्या कार्यास मनापासून सलाम

    Reply
  4. थोरांची ओळख या पुस्तकाचे आपण अतिशय सारांश रुपाने इथं महत्व विषद केल पुन्हा एकदा गत काळातील आठवणी ना उजाळा मिळाला.

    Reply
    • आदरणीय K C सर, नमस्कार.

      आपले लेखन नेहमीच अभ्यासपूर्ण व वाचनीय असते. ते उपयुक्तही असते.
      पूर्वीचे इ. ३री चे सदर पुस्तक अतिशय आदर्श असेच आहे. त्याचा परिचय छान दिला आहेत.
      सदर पुस्तक उपलब्ध होईल, का ?
      नव्या लेखांच्या पतिक्षेत,
      ….हेमलता देशपांडे, पुणे.

      Reply
  5. सर, हे पुस्तक म्हणजे नवरत्नांचा हार आहे. स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त, देशप्रेमी महान कवी यांचा आलेख असलेल्या या पुस्तकाचे परीक्षण आणि परिचय खूप सुंदर. आणि या पुस्तकाचा सकारात्मक परिणाम आणि प्रभावही नेमकेपणाने मांडला आहे.

    Reply
  6. आदरणीय K C सर, नमस्कार.

    आपले लेखन नेहमीच अभ्यासपूर्ण व वाचनीय असते. ते उपयुक्तही असते.
    पूर्वीचे इ. ३री चे सदर पुस्तक अतिशय आदर्श असेच आहे. त्याचा परिचय छान दिला आहेत.
    सदर पुस्तक उपलब्ध होईल, का ?
    नव्या लेखांच्या पतिक्षेत,
    ….हेमलता देशपांडे, पुणे.

    Reply
  7. सर 🙏
    आपण थोरांची ओळख इयत्ता ३ री सन 1969 या पुस्तकाची आठवण करून दिली. यास आपले अभिनंदन सर 💐🙏
    आमच्या लहानपणात जी. प.प्राथमिक शाळा कुडा मातीची,त्यावर छप्पर हे लहान कवेलू असे होते. त्या काळात पावसाळा हा झडीचा असायचा.शाळा भरली की घरूनच ज्युटच्या पोत्याची घोंगशी घेवून जावं लागे.जमीन ओलीचीप असली की याच घोंगशी ला घडी मारून बसावं लागे.
    जी. प. शाळेतील शिक्षक खूप जीव लाऊन शिकवत होते.शिकवणी वर्ग नव्हताच..सर वर्गात हुशार विद्यार्थी कडून शिकून घ्या असे मार्गदर्शन करायचे. थोरांची माहिती ने आपल्या देशा करीता त्यांनी कसे योगदान दिले या बाबत शिक्षक सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे शिकवत.आजही त्यांचे शिकवायची पद्धत आठवते. सरांनी या थोरांची ओळख शिकविल्याने 15 अगस्त,26 जानेवारी 1 मे या दिवशी शाळेत देश भक्ती गीते लागले तर अंगावर शहारे यायचे.(सरांनी शिकविलेले थोरांची ओळख ने )
    याच शिक्षकाने मला घडविले आहे.त्यांनी शिकवील्याने व शिस्त लावल्याने मी माझ्या वन विभागात केलेल्या कार्याची ओळख मिळविली आहे.
    मला माझ्या जिल्हा परिषद शाळा शिक्षकाचा अभिमान आहे.
    🙏🙏🙏

    Reply
  8. सर थेट इ.३ लीच्या वर्गातच नेऊन बसवले आपण आपल्या अभ्यासपूर्ण लेखनाची ही ताकद.असेच वाचनीय लेख लिहू आम्हाला वाचनप्रेमी बनवा .

    Reply
  9. थोरांची ओळख लहानपणी अगदी प्रभावी पद्धतीने शिकविल्यामुळे आजही जयंत्या पुण्यतिथी जशाच्या तशा पाठ आहेत.आणि तो शिकलेला इतिहास आज तितक्याच प्रभावी आठवतो.
    उत्तम लेख सर

    Reply
  10. गुरुजी ,
    हॅट्स ऑफ 🙏🏼🙏🏼
    पुस्तक परिचय तर भन्नाटच, प्रश्नच नाही, त्याहून
    कौतुक वाटतं ते आपल्या बुद्धिमत्तेची. या लिखाणात
    इतकी शक्ती आहे की, 73 व्या वर्षाची मी थेट
    तिसऱ्या वर्गात बसले आहे असं वाटलं. अध्यात्मिक
    भाषेत याला विदेही स्थिती म्हणतात आणि जो
    आनंद अनुभवला त्याला आत्मिक ” बेहद का आनंद ” म्हणतात 🙏🏼💐🙏🏼

    Reply
  11. अतिशय उत्तम माहिती व मांडणी असे संस्कार क्षम पूस्तके प्रत्येक इयत्तेत असायला हवे सरजी…
    तोड नाही सर आपल्या मांडणीला..

    Reply
  12. सर नमस्कार,
    तुमच्यामुळे विश्शेचोवीस मधून थेट १९७८ सालच्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या तिसरी”अ” तुकडीत कल्पनेनं जाण्याचा आनंद मिळाला.
    लिहित रहा,लिहितच रहा हीच सदिच्छा.
    परिश्रम, चिकाटी आणि तन्मयतेने जोपासत असलेल्या उपक्रमास मनापासून शुभेच्छा.

    Reply

Leave a Comment