#जागतिक कुटुंब दिन 15 मे 2024
#जागतिक कुटुंब दिन 15 मे 2024. 1995 पासून 15 मे रोजी जागतिक स्तरावर कुटुंब परिवार दिन साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.जागतिक कुटुंब दिन साजरा करणे संयुक्त राष्ट्रसंघटनेत 1994 साली एक ठराव पास झाला तो ठराव असा होता की,कुटुंबाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या समोरील आव्हाने अधोरेखित करण्यासाठी एकत्रिततेच्या आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील कुटुंब एककांना बळकटी देणारे आदर्श प्रदर्शित करण्यासाठी #जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात यावा.
वरील ठरावाचा आशय कुटुंब संस्थेचे जागतिक महत्त्व अधोरेखित करतो.
#जागतिक कुटुंब दिन 15 मे 2024
व्यक्तिमत्व विकासाची बीजे रोवणारा पहिला कारखाना म्हणजे कुटुंब.कुटुंब हा रक्तसंबंधाने तयार होणारा आकाराने छोटा असलेला मानवी समुह होय.कुटुंबातील व्यक्ती परस्परांशी वेगवेगळ्या नातेसंबंधाने जोडलेल्या असतात.उदा.माझ्या आईवडीलांसाठी मी मुलगा असतो तर ते दोघे पतीपत्नी असतात.आईवडीलांची मुलगी माझी बहीण तर मी तिचा भाऊ असतो.आईची बहीण मावशी तर वडिलांची बहीण आत्या असते.माझी सासू बायकोसाठी आई असते तर तीच माझ्या लेकरांची आजी असते पण माझी लेकरं तिची नातवंड असतात.असा नात्यागोत्याचा दुहेरी गुंता असतो. काका ,मामा,भाचा,भाची,पुतण्या, पुतणी ,मावशी ,आजी ,आजोबा ,मामी सासरा,मेहुणा ,जावई ,दीर,भावजय,नणंद अशा कितीतरी नावांनी नात्यातील रक्तसंबंध ओळखले जातात.
एकजिनसीपणा व प्रेम हा कुटुंबाचा पाया असतो.कुटुंबातल्या एकाची समस्या किंवा अडचण ही रक्तसंबंधाने सर्वांची अडचण असते.एकाचा आनंद हा सर्वांचा आनंद असतो.कुटुंब हे एकेरी जीवन नसते तर ते सामुहिक सहजीवन असते.या सहजीवनाचा पाया प्रेम व प्रेमापोटी निर्माण झालेला जिव्हाळा हाच असतो.
नोकरी ,व्यापार ,स्वातंत्र्य भोगण्याची लालसा , पुसटसे मनभेद या व अशा कारणांमुळे लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली कुटुंब आता परस्परांपासून विभक्त होऊन लहान संख्या समुहात विसावली आहेत.खरं तर हा लहान गट अत्यंत जवळचा समुह असतो.इथे सर्वाधिक प्रेम ओसंडायला हवे पण तरीही दैनंदिन गरजा ,स्वतंत्र अभिलाषा ,इतर नातेसंबंधाने होणारे व्यवहार ,क्षुल्लक बाबी अशा अनेक कारणे या विभक्तांनाच पुन्हा विभक्त करत आहेत.कुटुंबातल्या कुटुंबातच एकमेकांच्या मायेला पारखं होणं,विसंवादी होणं कुटुंबाच्या मूळ व्याखेलाच छेद देणारे आहे.
#जागतिक कुटुंब दिन 15 मे 2024.
त्यागाची तयारी व संस्काराची आठवण ही सुखी कुटुंबाची पायवाट असते.कुटुंबामुळेच आपल्याला नाव ,गाव ,रुढी परंपरा ,जात धर्म ,प्रांत ,संस्कार ,सामाजिक समायोजन ,मानसिक ,भावनिक व शारीरिक संरक्षण नैसर्गिकरित्या आपोआपच मिळत असते.
आकाशात झेप घेतलेलं ,हवेत धावणारं विमान सर्वांचे लक्ष वेधून घेतं पण विमानाच्या या यशस्वी उड्डाणाची निर्धोक पायाभरणी एका जागी स्थिर असलेल्या धावपट्टीने केलेली असते.समाजातही यशस्वी विद्यार्थी,उद्योजक ,नोकरदार समाजाचे लक्ष वेधून घेतात पण या यशाची पायाभरणी कुटुंबाने केलेली असते.
प्रेमरसाचा अखंड झराच कुटुंब व्यवस्थेला जिवंत ठेवतो.मानवी भावभावनांच्या कल्याणासाठी कुटुंब संस्था जिवंत ठेवणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.
#जागतिक कुटुंब दिन 15 मे 2024
पाश्चात्य देशांनी सुरू केलेले वॅलेंनटाईन डे ,मदर्स डे ,फादर्स डे असे काही दिनविशेष काही भारतीय लोकांनी आवडत नाहीत.पण जागतिकीकरण इतके झपाट्याने वाढले आहे की जगच एक कुटुंब झाले आहे.त्यामुळे असे जागतिक दिन जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक देशांनी स्वीकारले आहेत.जागतिक कुटुंब दिन ही भारतासह 140 देशात साजरा करण्यात येतो.म्हणजेच जागतिक कुटुंब दिन अधोरेखित झाला आहे.
भारतीय समाज व्यवस्थेला कुटुंब संस्थेचे वरदान आहे.कौटुंबिक मूल्ये ,परिवार या शब्दांचे अर्थ व व्याप्ती समजून घेण्यापूर्वी आपण आगोदर #जागतिक कुटुंब दिनाची पार्श्वभूमी समजावून घेऊ या.
15 मे 1994 रोजी अमेरिकेत #जागतिक कुटुंब दिन प्रथम साजरा करण्यात आला.लिंडा ग्रोवर या अमेरिकन समाज कार्यकर्तीचं प्रचंड मोठं योगदान या चळवळीत आहे.अमेरिकन ,ब्रिटन या देशात आर्थिकदृष्ट्या संपन्नता असली तरी तिथे मानसिक सुखाचे दारिद्रय बघायला मिळते.स्थिर कौटुंबिक जीवन तेथील समाज जीवनाची दुर्मिळ घटना आहे.एखाद्या महिलेच्या सातव्या लग्नाला तिचा चौथा, पाचवा पती त्याच्या पाचव्या बायकोसह सहकुटुंब सहपरिवार उपस्थित असतो. पुरूषाच्या पण दहाव्या अकराव्या लग्नाला त्याची सातवी आठवी माजी पत्नी नवीन गव्हाळ वर्णांच्या पिल्लासह उपस्थित असते.विवाहसाठी उल्लेखिलेले संख्याचिन्ह तेथील विवाह संस्थेचा पाया किती ठिसूळ आहे हे दर्शविण्यासाठी वापरले आहेत.अशा कुटुंब व्यवस्थेत सर्वाधिक होरपळ होते ती लहान मुलांची म्हणूनच त्यांचं बालपण मग प्रौढांप्रमाणे जातं.
जगातल्या प्रत्येक व्यक्तीने अहिंसा ,शांती आणि सहभाग यासंबंधी व्यक्तिगत प्रतिज्ञा करून आपला समाज व आपले जग सुरक्षित असल्याची ग्वाही एकमेकांना द्यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लिंडा ग्रोवरने कुटुंब व्यवस्थेची चळवळ दहा वर्षे चालविली.एकत्र या ,संवाद साधा ,प्रोत्साहन द्या हे या चळवळीचे ब्रीद होते.1999 साली इस्त्रायली व पॅलेस्टिनी निर्वासित छावण्यात परस्परांची गळाभेट घडवून आली हे या चळवळीचे मोठे यश आहे.
#जागतिक कुटुंब दिन जागतिक स्तरावर संमत होऊन एक प्रकारे लिंडा ग्रोवरच्या कार्याचा गौरवच झाला.
#जागतिक कुटुंब दिन दरवर्षी एक थीम घेऊन त्या थीमवर वर्षभर काम करत असतो.2024 ची जागतिक कुटुंब दिन ची थीम आहे कुटुंबातील सदस्यांची विविधता आत्मसात करणे व विविधतेचा सन्मान करत कुटुंबांना बळकट करणे.लोकांना एकत्र बांधणाऱ्या नाते संबंधाचे कौतुक करत विविधतेचा स्वीकार करण्याचा संदेश या थीमवर जागतिक कुटुंब दिन लक्ष वेधत आहे.
भारतीय समाज व्यवस्थेतून आपण कुटुंब संस्थेचा विचार करू.भारतातील कुटुंब व्यवस्थेला अत्यंत प्राचीन इतिहास आहे.स्थिरता हा कुटुंब संस्थेचा पाया असला तरी रक्त संबंध हा मूळ गाभा आहे.पितृसत्ताक व मातृसत्ताक अशा दोन्ही प्रकारच्या कुटुंब व्यवस्था प्रकारांचा उल्लेख प्राचीन इतिहासात सापडतो.हा प्रकार संस्कृती व परंपरा यातून पुढे आला आहे.कुटुंब व्यवस्थेचे आणखी दोन मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे संयुक्त व विभक्त कुटुंब पद्धत.हे दोन्ही प्रकार जीवन जगण्याच्या बदलत्या शैलीमुळे रुढ झाले.आजही आपल्याला हे दोन्ही कुटुंब प्रकार संपूर्ण भारतभर पाहायला मिळतात.विभक्त कुटुंबाची संख्या प्रचंड गतीने वाढली आहे.
कुटुंब हा प्रामुख्याने एक जिनसी रक्तगट समुह असतो.जन्म व विवाह या दोन मुख्य कारणाने कुटुंबातील सदस्यत्व प्राप्त होत असते.परस्पर संबंधांना वेगवेगळ्या नावांची संबोधने असली तरी सर्वांमध्ये एक समान धागा असतो .तो म्हणजे प्रेमाचा.अनेक कुटुंबातील संख्येनुसार कुटुंबाचे दोन प्रकार पडतात लहान कुटुंब व मोठे कुटुंब.
#जागतिक कुटुंब दिन 15 मे 2024
कुटुंब व्यवस्थेमुळे आपणास नाव ,जात ,नैसर्गिक संरक्षण हे आपणास आपोआप मिळत असतं.
छोटे कुटुंब सुखी कुटुंब असं ठामपणे म्हटल्या जाणाऱ्या कुटुंब व्यवस्थेला आता ग्रहण लागलेले दिसून येत आहे
.
अमेरिकन ब्रिटन नागरिकांच्या व तेथील मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांनी आता भारतातील कुटुंब जीवनालाही व्यापून टाकले आहे.संयम ,सोशिकता ही मूल्य आहेत हेच आपण विसरलोत.अंधाराचा प्रभाव प्रकाशाने जातो.द्वेषाचा प्रभाव प्रेमाने जातो.तसं संयम व सोशिकता संपली की क्रोध ,असूया ,सुडभावना ,अशा वितंडवादी शक्तीचा उदय होतो.संयुक्त कुटुंबात वैयक्तिक भावभावनांची कुचंबना होते या कारणास्तव वेगळे होऊन प्रेमाच्या पायावर विभक्त कुटुंब तयार केलेले किती लोक त्या प्रेम रसावर तृषार्त होऊन जीवन जगत आहेत ? हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे.पतीने पत्नीला जाळणं ,मारणं ;तसेच पत्नीनेही सुपारी देऊन आपला नवरा संपविणे ,पोटच्या अपत्यांना विहिरीत फेकणे किंवा अपत्यांकडून आई वडीलांचा तर कधीकधी दोघांचाही जीव घेणे या गोष्टी विभक्त कुटुंबात जास्त प्रमाणात घडलेल्या आहेत.अशा घटनांना पायबंद बसण्याऐवजी फक्त स्थळ व नावे बदलून या घटनांची पुनरावृत्ती वारंवार घडताना दिसून येते आहे.हे आत्यंतिक दुर्दैवी आहे.
कुटुंब व्यवस्था टिकविणे ही त्या कुटुंबातील प्रत्येकाची व त्या कुटुंबाचा परिवार म्हणून भोवती जगणाऱ्या सर्वांचीच जबाबदारी आहे.जिव्हाळा हा घराचा कळस आहे.गोड व समंजस संवाद ही घरातील खरी धनदौलत आहे.धकाधकीच्या व गतिमान अर्थार्जन जीवनपद्धती आपण स्वीकारल्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती वेगाने वाढली.यामुळे घरातले आजी आजोबा हद्दपार झाले व आई वडीलही मुलांना पुरेसा वेळ देण्यात अपयशी ठरले.लहानमुलांच्या डब्यातली लोणचेपोळी ,भाजीपोळी गायब झाली.कुरकुरत कुरकरत मुलांना कुरकुऱ्याची आवड निर्माण झाली.छोट्या कुटुंबातही घरातल्या घरात परस्परांचे संवाद ऐकू न येणाऱ्या भिंती तयार होऊ लागल्या आहेत.एकेकाळी ग्रामीण भारतात आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण कौटुंबिक सुखाने श्रीमंत माणसे राहायची.हीच श्रीमंती टिकविणे ,वाढविणे आपल्या सर्वांची गरज आहे.यासाठीच तर जागतिक कुटुंब दिन आहे.
कुटुंबाशिवाय व्यक्तीस पूर्णता नाही.कुटुंबातील प्रिय जनांची पोकळी कधीही भरून येत नाही.यशाच्या शिखराचा आनंद घेताना न कळत अश्रू येतात व या क्षणाला माझी आई, वडील हवे होते असं आपसूकच वाटतं.एखाद्या विधवा स्त्रीने पतीच्या मागे मुलांना वाढविले,मोठे केले यशस्वी केले .तर ती स्त्री दिवंगत पतीच्या फोटोकडे पाहत म्हणत असेल तुम्ही असायला हवे होते.पदराने डोळे पुसता येतात पण आठवणी नाही पुसता येत.सदोदित तिला पतीसोबत असल्याची जाणीव असते.
कौटुंबिक स्वास्थ्यावरच सामाजिक आरोग्य अवलंबून आहे.अनुकरणीयता हा माणसाचा सहज स्थायीभाव आहे.आजचे मायबाप प्रेमरस पाझरविण्यास अपयशी ठरले तर पुढच्या पिढीतील प्रेमाचे झरे आटलेच म्हणून समजा.कुटुंब दिन हा एका दिवसाचा नाहीच.तो त्याग व समर्पण भावनेची समिधा गिळणारा धगधगता अग्निकुंड आहे.त्याग व समर्पणाची समिधा कमी पडली की कुटुंब अग्निकुंड धुमसते ,काळवंडते अन् मानवजातीलाच काळोखात नेते.
परस्परांना आदर देऊ ,संवाद करू,जीवलगांना अलिंगन देऊन भेटू अशा कृतीतून मनामनाला समजावून घेऊ व कुटुंब संस्थेची पावित्र्यता व परिणामकारकता वाढवू या.हाच जागतिक कुटुंब दिनाचा मुख्य उद्देश आहे. शांतता या स्थायीभावाची जन्मदात्री कुटुंब ही परिसंस्था आहे.हे सकल मानवजातीच्या कल्याणासाठी लक्षात ठेवावे.
परस्परांचा आदरभाव वाढला तरच संत ज्ञानदेवांची व रविंद्रनाथ टागोरांची विश्व हे एकचि कुटुंब ही संकल्पना अस्तित्वात येईल.
दीर्घकालीन मानवी मूल्ये ध्यानात ठेऊन कुटुंबास सुखाचे पाणी देणारा माळी होऊ या.
जागतिक कुटुंब दिनाच्या सर्वांना शुभेच्छा .सर्वे सुखी भव......
कचरू सूर्यभान चांभारे
मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड 9421384434
kacharuchambhare.com
#जागतिक कुटुंब दिन
छोटे कुटुंब सुखी कुटुंब & हॅप्पी फॅमिली
मनःपूर्वक धन्यवाद केशवदादा
अप्रतिम लेखन सर.
मनःपूर्वक धन्यवाद सर
जगातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब आहे.. कुटुंबाने केलेल्या कौतुकाची सर जगातील जगातील कोणत्याही कौतुकाला येणार नाही आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
मनस्वी धन्यवाद काकाश्री
एकत्रित कुटुंब काळाची गरज आहे
अगदी रास्त आहे
भारतीय संस्कृती व कुटुंब पद्धती चे महत्त्व विशद करणारा लेख.
मनःपूर्वक धन्यवाद सर जी