भैरवगड शिरपुंजे भटकंती

शिरपुंजे भैरवगड भटकंती

दर महिना किमान एक दुर्ग किंवा ऐतिहासिक भौगोलिक स्थल भटकंती हे आमच्या शिवुर्जा प्रतिष्ठानचे ध्येय आहे ‌.दिव्यांगांसाठी व दिव्यांगांना घेऊन ही भटकंती आम्ही नियमित करत असतो. शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आमचे मोहीम मार्गदर्शक शिवाजीअण्णा गाडे स्वतः दिव्यांग आहेत. दीडशेहून अधिक किल्ले भटकंती करून झाले आहेत पण इतर दिव्यागांना भटकंतीचा आनंद मिळावा म्हणून त्यांच्या नियोजनात दुर्ग भटकंती आयोजन केल्या जाते.गेल्या काही वर्षांपासून सचिव म्हणून मी त्यांना स्थान देत आहे.


नेहमीप्रमाणे ग्रूपवर चर्चा होऊन एप्रिल साठी शिरपुंजे भैरवगड भटकंती ठरविण्यात आली‌. आमच्या दुर्ग भटकंतीत राज्यातील विविध जिल्ह्यांतून दिव्यांग बांधव सहभागी होत असल्यामुळे गडाच्या जवळच्या मोठ्या गावाजवळ एकत्र येणे व मग एकत्र प्रवास करणे ,ही आमची नेहमीची पद्धत आहे.भैरवगड नावाचे एकूण सहा किल्ले महाराष्ट्रात आहेत.त्यापैकी एक किल्ला सातारा महाबळेश्वर कोयना परिसरात आहे.वनविभागाच्या कडक नियमावलीमुळे व घनदाट जंगली पायवाटेमुळे तिथे जास्त भटके जात नाहीत.

मोरोशीचा भैरवगड भटकंती करणाऱ्या सर्वांना माहीत आहे पण तो चढाईच्या दृष्टीने कठीण श्रेणीतला आहे.सराईत व नियमित ट्रेकर्सने मोरोशीचा भैरवगड करावा .पायथ्याच्या गावावरून ओळख असलेला कळसुआई हरिश्चंद्रगड रांगेतील कोथळीचा भैरवगड व शिरपुंजेचा भैरवगड त्यामानाने बराचसा सोपा‌.आम्ही या महिन्याची भटकंती शिरपुंजे भैरवगड ठरवली व जवळचे मोठे गाव राजुर येथे येण्याबाबत सर्वांना सूचित केले.


मोहिमेचा दिवस ठरला शनिवार रविवार २० व २१ एप्रिल २०२४. एकूण नऊ दिव्यांग व पाच सुदृढ मित्र मोहिमेत सहभागी झाले होते.आपापल्या गावावरून शनिवारी आपापल्या सोयीने प्रवास सुरू झाला.प्रवासातील अपडेट देत प्रत्येक जण राजुर जवळ करत होता.


मी सुद्धा शनिवारी सकाळी सात वाजता बीड सोडले.धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील शिक्षक व नियमित भटकंते शिवशंकर राऊत सर मला जामखेडला भेटणार होते व पुढचा प्रवास आम्ही सोबत करणार होतो.नेहमी कल्याण घोलप बीड येथून माझ्या सोबत असतात, परंतु खंडोबा मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत.मी पुणे गाडीने जामखेडसाठी मार्गस्थ झालो.

योगायोग म्हणजे बीड पुणे व भूम पुणे दोन्ही गाड्या एकाचवेळी जामखेड बसस्थानकात शिरल्या‌. एकीतून मी व दुसरीतून राऊत सर खाली उतरलो. ही आमची पहिलीच भेट‌.हस्तांदोलन , गळाभेट घेऊन सरांचे शिवुर्जा प्रतिष्ठान परिवारात स्वागत केले. एव्हाना सकाळचे नऊ वाजले होते.बसस्थानकासमोरील एका भोजनालयात नास्ता केला व दहाच्या सुमारास बोईसर गाडीने तारकपूरकडे मार्गस्थ झालो.प्रवासात राऊत सरांनी त्यांनी केलेल्या अनेक भटकंतीचे अनुभव सांगितले,मी सुद्धा त्यांना आमच्या शिवुर्जा प्रतिष्ठानच्या मोहिमाविषयी सांगितले. राऊत सर प्राथमिक शिक्षक आहेत,माझंही तेच फक्त जिल्हा परिषद प्रशासन वेगळे.

भटकंती छंद व नोकरीचे प्रारूप एकच असल्यामुळे समान धाग्यातून गप्पांची मैफल अधिक रंगली. नगरला उतरायचे पण अंबादासदादा गाजुलचा चहा न घेता पुढे जायचे ,हे तर होणेच नाही ‌. नेहमीप्रमाणे अंबादासदादा तारकपूर बस्थानकावर आले.शिवशंकर,मैं और अंबादास तीन यार मिले और देखते ही देखते तीन कप चाय बिस्किट के साथ खाली हो गई.चाय खाली हो गई मगर बातोंकी मैफिल रंग लाई. हा अंबादासदादाही सह्याद्री भटकंतीने दिलेला एक मस्त दोस्त‌.


संगमनेरला पोहचलो तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते.वाटेतल्या अनेक परिचित गावांना मागे टाकत आम्ही संगमनेरला पोहचलो.अकोलेकडे जाणारा प्लॅटफॉर्म गर्दीने गच्च भरला होता‌.आतापर्यंत आरामशीर झालेल्या प्रवासाचा शेवटचा टप्पा त्रासदायक होण्याची शक्यता दिसत होती‌.एव्हाना बाहेर तापमानाचा जोर व पोटात भुकेचा ज्वर जवळपास कमाल बिंदूवर पण आपापल्या ठिकाणी होते.

घरच्या भाकरी सोबत होत्याच.दुपार टळलेली होती पण सावल्यांनी अजून उगमाचे बुड सोडलेले नव्हते.बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीच्या हातभर छायेत बसलो व पुढ्यात पोळी घेतली.जेवण चालू असतानाच एकाचवेळी तीन बस अकोलेसाठी लागल्या त्यामुळे जी पोळी पोटात गेली ,ती पोटात व उरलेल्या पोळीचे खायचे पान विडा करून तोंडात टाकले व गाडीत जागा पकडली.


अकोलेहून राजुरसाठी लगेच पाच वाजता गाडी मिळाली.अकोले बसस्थानकात दिव्यांग भटका गुरूजी विजय पाटील भेटले.दोघांचे तीन झालो व राजुरकडे निघालो.राजुरला आमच्या आधीच सतिश आळकुटे,जीवन टोपे,ओम तारू, अश्विनी तारू,सार्थक गायकवाड व मच्छिंद्र थोरात हे पोहचले होते.तेवढ्यात शिरपुंजे मार्गे कामशेत गाडी आली.काही जण त्या बसमध्ये गेले.


शिवाजी अण्णा गाडे व बजरंग काळे सर स्कुटीवर पैठणहून आले .ज्यांना बसमध्ये जागा नव्हती,त्यांच्यासाठी खाजगी वाहन केले व रात्री आठ वाजता शिरपुंजे गावात पोहोचलो.
गावात अलिकडेच पाच दहा घरांची छोटी वस्ती आहे.रात्रीच्या अंधारात गाव लवकर शांत झालं होतं.चहूबाजूंनी उंचच उंच डोंगररांग व मध्यभागी शिरपुंजे गाव आहे ‌‌.

गावच्या पश्चिमेकडील एक डोंगर म्हणजे किल्ले भैरवगड.गडावर पंचक्रोशीतील लोकांचे ग्राम दैवत भैरवनाथाची अश्वारूढ मूर्ती आहे.भैरवगडाला अगदी वरपर्यंत विद्युत खांब असल्यामुळे रात्रीच्या अंधारातही गडाचे अस्तित्व जाणवते.स्थानिक नागरिक किसन चिंदू दिंदळे व त्यांचा मुलगा एकनाथ दिंदुळे यांनी आमच्यासाठी घरगुती जेवणाची सोय केली होती‌.गरम गरम चपाती,बेसन,वांगी बटाटे मिक्स भाजी व भात असा साध्या जेवणाचा अस्सल चवदार शाही जेवणाचा बेत होता‌.

दिवसभराचा प्रवास झालेला असल्यामुळे जेवणासाठी फारशी उसंत मिळाली नव्हती,आता खूप निवांतपण हाताशी होतं.पोटभर , तृप्त जेवण झाले.रस्त्यावरच वनविभागाने उभारलेल्या निवाऱ्यात अंग टाकले. चंद्रप्रकाश अगदी दुधाळ व खूप स्पष्ट होता‌.आम्ही सर्व जण गप्पा मारत बसलो. एकनाथ दिंदोळे आम्हाला ग्रामीण परंपरांसह बऱ्याच अख्यायिका,गडाची माहिती सांगत होते‌.

बदलतं गाव ,विकास त्यांच्या बोलण्यातून कळत होतं.आमच्या गप्पा शाब्दिक अर्थाने बसून असल्या तरी प्राप्त परिस्थितीत त्या आडवं होऊन सुरू होत्या त्यामुळे ज्याचं तोंड बंद त्यांचे डोळेही बंद होत होते.हळू हळू एक एक करत सर्वांचे नयन दीप विझले व संपूर्ण शरीर झोपेच्या अधिन झाले.या गडबडीत नाशिकहून उशिरा आलेले सागर बोडखे,अंजली प्रधान व राहुल अग्निहोत्री पुढे निघून गेले व हनुमान मंदिरात थांबले.

भटकंती दिवस रविवार

मानवी कृत्रिम आवाजाचा लवलेश कानी नसलेली शनिवारची रात्र शिरपुंजे गावात पार पडली.पहाटे साडेपाचला आम्ही सारे जण उठलो.अंदाजे सहा सव्वा सहा वाजता भोवतालचे सारे स्पष्ट दिसू लागले होते.आमच्या आधीपासूनच पक्षांची घाई गडबड चालू झाली होती.पक्षातही व्यायाम म्हणून फेरफटका मारणारे व पोटापाण्यासाठी दूरवर जाणारे पक्षी असावेत.

कारण काही थवे तिथल्या तिथेच येरझारा घालत होते तर काही थवे एकदा उडाले की ते नजरेच्या खूप दूर जात होते.पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट साक्षी ठेवत आम्ही आमची आवराआवर करत होतो.आवराआवर सुरू असताना एक नजर भैरवगडाकडे आपोआप जात होती. गड हा कळसुआई समकक्ष उंचीवर असल्यामुळे आम्हाला खूप चालायचं आहे.एवढं कळत होती‌.

तेवढ्यात पूर्व दिशेने लालसर रंग उधळल्याची आभा दिसली.आता सूर्य नारायणाचे आगमन होणार ,ही ती खूण होती.दोन झाडांच्या अगदी मध्यातून अक्षरशः बैलगाडीच्या चाकाएवढा लालचुटुक सूर्य दाखल झाला‌.हे लालचुटुक फळ इतकं गोड दिसतं की हनुमान बालपणी का चुकला याचं उत्तर सूर्य पाहिल्याशिवाय कळत नाही.मोठ्या सूर्य बिंबाला साक्षी ठेवून आम्ही सर्वांनी किसन यांचेकडे घरीच चहा घेतला‌.चहा घेऊन भैरवगडाची चढाई सुरु केली.


करवंदाची हिरवीगार जाळी आमचं स्वागत करत होती.हिरवेगार करवंद झुपकेच्या झुपके लगडले होती.शेजारी विहिरीवर स्त्रिया पाणी भरत होत्या.डोंगराच्या पायथ्याला विहीर आहे ‌.पाणी शेंदून घ्यावे लागते‌.थंड व गोड , स्वच्छ व सुंदर असे ते पाणी आहे. थोडे पुढे गेलो की भैरवगडाचा पायथा लागतो.एक सुरम्य कमान आपलं स्वागत करते.शेजारीच दाट झाडी ,आंब्याची जांभळाची झाडे ,नावं माहीत नसलेले अनेक झाडं ,दाट सावली असा आमचा प्रवास सुरु झाला.गडाकडे जाणाऱ्या वाटेत त्रिशूल बाण आहेत.

भाविक भक्त व भटकंते यांची नेहमी वर्दळ असल्यामुळे वाट मळलेली व रूळलेली आहे.इथूनच खरा ट्रेक सुरु होतो.पायवाटेत दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत तर काही ठिकाणी जमिनीचाच सपाट भाग आहे.गडाच्या टोकापर्यंत पूर्ण रस्ता खडी चढण आहे.थोडंसं पुढे गेले की लोखंडी शिडी मार्ग सुरू होतो.ही शिडी थोडी तिरपी पण बरीचशी उंच आहे.अशाच अजून कैक पायऱ्यांच्या चार पाच शिड्या आहेत.आम्ही सारे दिव्यांग असल्यामुळे एकमेकांना आधार व मानसिक बळ देत पुढे सरकत होतो.

आम्ही जसं जसं डोंगराच्या उंचीकडे पुढे पुढे सरकत होतो तसंच तिकडं सूर्यही पुढे पुढे सरकत असल्याने ऊन वाढत होतं.आंबितकडून येणारी पायवाट व शिरपुंजेकडून येणारी पायवाट चढाईच्या अगदी शेवटच्या टप्प्यात एका खिंडीत भेटतात.उजव्या हाताची शिडी वाट घनचक्कर गडाकडे जाते ,डाव्या हाताची वाट भैरवगडाकडे जाते.मोजून अगदी पाच मिनिटे कातळातील कोरीव पायऱ्या चढून गेलो की आपण भैरवगडावर पोहचतो.

खाली डोकावून पाहिले की लक्षात येतं….. अरे बापरे! खरंच आपण किती उंच चालून आलो.गडावर पाय ठेवला की तिथून आपल्याला हरिश्चंद्रगड तारामती सुळका व टोलार खिंड दिसते.या दिशेला गडावर पाण्याची तीन टाकी एकाच ओळीत दिसतात.ही टाकी म्हणजे चार हजार फुटावरचं जल आश्चर्य आहे.


पाण्याच्या टाक्या पासून आता डावीकडे चालायला लागावे.तिथं एक रम्य गुहा आहे.त्यामध्येही भरपूर पाणी आहे.आश्चर्याचे कौतुक करत पुढं गेलो की आश्चर्यात अजून वाढ होते पण घट नाही ‌.तिथं आणखी तीन ,तीन टाक्याचे दोन समुह दिसतात. सुस्पष्ट दिसणाऱ्या दोन वीरगळ आपलं लक्ष वेधून घेतात.या वीरगळीजवळच दोन गुहा आहेत.

यांतल्या एका गुहेत अश्वारूढ भैरवनाथाची मूर्ती आहे.परिसरातील आदिवासी भाविकांची येथे रोज ये जा असते. ऊन ,वारा पाऊस अशा सर्वच ऋतूत ईथला स्थानिक भाविक अक्षरशः अनवाणी पायाने चालतो.रूतणाऱ्या खडा मातीला भाव न देत तो चालत आहे. आम्हा दिव्यांगाचे पुजाऱ्याने खूप कौतुक केले.सर्वांच्या हाती आरतीचे ताट देऊन भैरवनाथाचे जवळून दर्शन दिले.

उजव्या हाताच्या गुहेने आत शिरून भैरवनाथाचे दर्शन घेऊन डाव्या हाताच्या गुहेतून बाहेर पडले की आपले दर्शन पूर्ण होते. भैरवनाथ गुहेच्या बरोबर खाली उतरण्यास थोडी जागा आहे.तिथेही एक गुहा आहे.या गुहेतून संपूर्ण शिरपुंजे गाव नजरेच्या टप्प्यात येते.भैरवगडाच्या डोंगर पोटात अनेक गुहा आहेत.पावसाळ्यात गावातील गाय वासरे या गुहांत निवास करतात.


भैरवनाथ मूर्तीच्या अगदी समोर थोडा उंच टेकडी सदृश माथा आहे.हा माथा गडाची सर्वोच्च बाजू असून थोडे मोठे पठार आहे.या ठिकाणी एक कोरीव घर असल्यासारखी गुहा आहे ‌.या गुहेत बारमाही थंड व गोड , स्वच्छ व सुंदर पाणी असते. ईथं जो येणार तो इथलं पाणी पिणार ,इतकी त्याची आसक्ती आहे.आजूबाजूला अजून काही गुहा व पाण्याची टाकी आहेत.

एकूण अंदाजे पाच पंचवीस टाकी आहेत ‌‌.गडाचे सपाट पठार माथा,मुबलक पाणी पाहता हा गड देखरेखीचा किल्ला असावा किंवा इथं पशूधन राखलेले असावे.मनसोक्त गडावरून फिरलो.सकाळी अकरा वाजता गड उतरायला सुरूवात केली.चढाईच्या मार्गावर अनेक फोटो,व्हिडिओ काढलेली असल्यामुळे परतीच्या वाटेत फोटोचा मोह होत नव्हता.

लोखंडी शिड्या थोड्या गरम झाल्यामुळे चरचर पोळत नव्हतं पण हाताला जास्तवेळ स्थिरावू देत नव्हतं. दुपारी एक वाजेपर्यंत आम्ही सर्वजण खाली आलो.नऊ दिव्यांग व पाच सुदृढ मित्रांसह आमची शिरपुंजे भैरवगड मोहीम पार पडली.
भंडारदरा धरणाजवळ सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला.आम्ही तसेच पुढे सांदन व्हॅलीला गेलो.वेळेची मर्यादा लक्षात घेऊन काही जण व्हॅलीत खाली उतरून आले,चालण्यास मर्यादा असल्यामुळे काही जण वरंच थांबले‌.पुढच्या फक्त सांदन व्हॅलीच ही खुणगाठ बांधून आम्ही परत फिरलो.


राजुरला परत आलो तेव्हा रात्रीचे सात वाजले होते.अकोले संगमनेरला जाणाऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या.तरीही आमच्या सोबत असलेले खाजगी गाडी मालक रामभाऊ लामगे यांनी आम्हाला अत्यंत वाजवी प्रवाशी दरात थेट संगमनेरला आणून सोडले.गडकोट भटकंतीत अशी माणसं भेटणं म्हणजे भूगर्भातील गोड गोड पाणीच..


कल्पनेहूनही अधिक सुंदर, रोमांचकारी प्रवास झाला.
सहभागी सदस्य

शिवाजीअण्णा गाडे पैठण
कचरू चांभारे बीड
सागर बोडखे नाशिक
अंजली प्रधान नाशिक
सतिश आळकुटे जीवन टोपे मच्छिंद्र थोरात ओम तारू पुणे विजय पाटील जळगाव
राहुल अग्निहोत्री नाशिक
शिवशंकर राऊत वाशी धाराशिव
बजरंग काळे पैठण .

शब्दांकन ‌‌…. कचरू चांभारे बीड शिवुर्जा प्रतिष्ठान सचिव
9421384434शिरपुंजे भैरवगड भटकंती

52 thoughts on “भैरवगड शिरपुंजे भटकंती”

      • खूपच छान शब्द संकलन तुमच्यासोबत व शिव ऊर्जा सोबत असल्याची जाणीव होते सर
        १) भैरवगड मोरोशी (अवघड) (१ वेळा)
        २) भैरवगड कोथळे (९ वेळा)
        ३) भैरवगड शिरपुंजे (४ वेळा)
        पुढील सह्याद्रीतील गड किल्ले भटकंतीसाठी,वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
        दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे दिव्यांग योद्धा पुरस्कार प्राप्त (गड किल्ले१००*नाबाद)

        Reply
  1. तपशीलवार माहिती, बारकावे टिपले…. कोण कुठून कसे जोडत गेले, ते इति पर्यंत छानच छान
    (सावली ने उगमस्थान सोडले नव्हते👌🏻)
    छानच….

    Reply
  2. अतीशय सुंदर लेख .. पुर्ण न थांबता वाचलो.. लेखनाची अप्रतीम कला अस वाटत होत मीच फिरतोय की काय…याला म्हणतात लिखाण..

    Reply
  3. सर जी आपला प्रत्येक शब्द नी शब्द वाचकांसाठी एक मेजवानीच असते …फार छान केल, ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे .तुमचे शब्दांकन आणि लेखन वाचताना असे वाटते की जणू आपण त्या परिसरात गेलेले आहोत .असेच लिखाण करून आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावे. ही नम्र विनंती आणि भावी कार्यासाठी फार फार शुभेच्छा💐💐

    Reply
  4. वा सर, खुपच छान. लेखन.प्रत्यक्षात तुमच्या बरोबर असल्याची जाणीव होत होती.एकदा तरी तरी तुमच्याच संगतीत किल्यावर जायचा योग कधी येतो काय माहित .

    Reply
  5. खुप छान . Blog, Blog लेखन, Blog Subject and Blog writer हे सगळ कस दोरीत व ओळिंब्यात आहे. सर जी आपण एक यशवंत व नामवंत लेखक व साहित्यिक असून आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक आहात. त्यामुळे आपला विचार व आचारात एक क्रमबद्धता सातत्य असते. त्यामुळे आपलं मत व विचार लोकांच्या मनावर प्रभाव टाकतात लिहित चला.
    ॥ शुभेच्छा ॥

    Reply
  6. लेख वाचून भैरवगडाचा अप्रत्यक्ष प्रवास च घडला
    खूप छान लेख

    Reply
  7. खूपच सुंदर आणि मस्त किल्ले, गडकोट अस्सल कोल्हापुरी गावरान वर्णन वाचून मी पण तुमच्या सोबतच भटकंती करत आहे की काय❓ असा भास व भ्रम झाला. श्री कचरू दादा श्री शंकर पाटील यांची कादंबरीच वाचल्यासारखे वाटल. मस्त very nice👍👍👏👏😊

    Reply
  8. चांभारे सरचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच…
    मी 1914 पासून त्यांचं लिखाण सतत वाचत आलेलो आहे,असं म्हणावं लागेल की मी त्यांचा फॅन झालेलो आहे.
    एक दिव्यांग व्यक्ती असतानाही गडाबद्दल इतकं मोठं प्रेम हे मी आज तागायत पाहिलं नाही.
    या व्यक्तीमध्ये अद्भुत शक्ती आहे,जी स्वतःला व इतरांनाही असे कार्य करण्यास तयार करते या कार्यासाठी त्यांनी एक दोन नव्हे तर असे असंख्य मित्र तयार केलेले आहेत जे अनेक गड सर करण्यासाठी झालेले आहेत, आणि त्यानंतरचा हा भाग त्या गडाचे बारकावे आपल्या लेखनातून टिपणे आणि यामुळे त्यांचा अनुभव अनेक जणांना वाचावयास मिळतो, खरंतर गडावर जाणे तेथील प्रत्येक पायऱ्याची, कोपऱ्याची पाहणी करण म्हणजे जीवावर बेतण्या यासारखे आहे आणि म्हणूनच मी या लेखकाला धाडसी लेखक म्हणातो,आणि नक्कीच असे लेखन माझ्यासाठी एक पर्वणीच आहे.
    असे लेखन करणाऱ्या माझ्या मित्राला देव हत्तीचे बळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    ….संदेश लोळगे

    Reply
  9. जीवावर बेतण्या यासारखे आहे आणि म्हणूनच मी या लेखकाला धाडसी लेखक म्हणातो,आणि नक्कीच असे लेखन माझ्यासाठी एक पर्वणीच आहे.
    असे लेखन करणाऱ्या माझ्या मित्राला देव हत्तीचे बळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    ….संदेश लोळगे

    Reply
  10. सर खूप छान सुंदर आणि सोप्या भाषेत वर्णन केले आहे तुम्ही. असच लिहीत राहा.

    Reply

Leave a Comment