All blog posts
Explore the world of design and learn how to create visually stunning artwork.
जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर 2024 व आनंदग्राम पाली
November 30, 2024 | by kacharuchambhare.com
लाडके मराठी लेखक पु.ल.भाई जन्मदिन 8 नोव्हेंबर
November 8, 2024 | by kacharuchambhare.com
भारतरत्न विश्ववंद्य डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर 2024
November 7, 2024 | by kacharuchambhare.com
शिक्षक दिन: आठवणीतले शिक्षक 5 सप्टेंबर 2024
September 5, 2024 | by kacharuchambhare.com
आयुष्याच्या साक्षीदार जेष्ठ भांड्यांचा 30 वा वाढदिवस
August 27, 2024 | by kacharuchambhare.com
श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त श्रीकृष्णास खुले पत्र 2024
August 26, 2024 | by kacharuchambhare.com
जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024
जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024

जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024. माती व माता फक्त वेलांटीचाच काय तो तेवढा फरक बाकी दोघी एकच.
जागतिक माती दिन साजरा करायचं ठरल्यापासून हे दहावं वर्ष सुरू आहे. मातीचे महत्व प्रतिबिंबित। करण्याचा आणि तिचे रक्षण करण्यासाठी जगभरात केलेल्या कृतीचा उत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे जागतिक माती दिन.
वनस्पती व प्राणी सृष्टीची निर्मिक माती आहे.वातावरणाचे ती एक अविभाज्य भाग आहे अन् महत्वाचे म्हणजे ती सर्वांचे वसतिस्थान आहे. पृथ्वीची ती त्वचा आहे.त्वचा या अर्थाने ती पृथ्वीची रंग रूप ठरविणारी सौंदर्य खणी आहे.माती म्हणजे केवळ खडकाचे बारीक चुर्ण नसून त्यात जीवाश्म घटक आहेत.जैव विविधता टिकवून ठेवण्यात,जैव विविधता जोपासण्यात माती महत्वाची आहे .
https://en.wikipedia.org/wiki/International_Year_of_Soil
जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024. दररोजचं सकाळचं फिरणं आटपलं की पाच ते दहा मिनिटे काळ्या मातीत पडून शवासन करणे हा माझा शिरस्ता आहे. शवासनात अचानक आजच्या माती दिनाची आठवण झाली व वरीलप्रमाणे कच्चे टिपण काढले.आरामदायी अवस्थेत माती दिनाचा विचार करत रोजच्या प्रमाणे शवासनात डोळे मिटून शांत पडलो होतो.तेवढ्यात कानात काहीतरी कुजबुज ऐकू आली.हळूच एक डोळा उघडून पाहिलं ,भोवताली कुणीच नव्हतं.आवाज तर येतच होता मग दोन्ही डोळे उघडून पाहिले ,तरीही कोणी दिसत नव्हतं.आवाजाचा भास आहे असं समजून दुर्लक्ष करून पुन्हा डोळे मिटून पडणार एवढ्यात थोडा चढलेला स्त्री स्वर कानी पडला.अरे भोवताली काय बघतोस ? कानाजवळ बघ.मी माती बोलतेय.तुला निसर्गाची हाक ऐकू येते.तुझ्याजवळ माती अन् माताशी ममत्व दिसलं म्हणून तुझ्याशी बोलायचे आहे.
आणि ती माती पुढे बोलू लागली मी फक्त ऐकत होतो.
जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024
जमिनीचा सर्वात वरचा थर म्हणजे माती.थोड्याशा जाडीचा अंदाजे दीड ते दोन सेमी आमचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात.पण आम्हाला नष्ट व्हायला तुफान पाऊस ,वादळीवारा पुरेसा आहे.ही संकटं कधीतरी येतात त्यामुळे आम्हाला त्याची फारशी चिंता वाटत नाही पण तुम्ही मानवाने सुरू केलेले पिकाऊ जमीनीत बांधकाम,सततचं उत्खनन व रासायनिक औषधी खतांचा अतिरेकी वापर यांमुळे जीव अगदी नकोसा झाला आहे.खरं तर मी बोलणारच नव्हते.मी सुद्धा तुमच्या माणसातल्या स्त्री जातीसारखीच स्त्री आहे.सोशिकता ,सहनशीलतेला आम्ही अलंकार म्हणून मिरवितो पण हा अलंकार आता बोचतो आहे म्हणून बोलणे भागच आहे.5 डिसेंबर रोजी तुम्ही माणसं जागतिक माती दिन साजरा करता.मातीबाबत व कृषी विषयक जागृतीसाठी हा उत्सव तुम्ही जगभर साजरा करता.मातीचे संरक्षण व शाश्वत व्यवस्थापन यांवर तुम्ही सारे जण बोलता.
खरंतर हा दिवस आमच्यासाठी उत्सवच.सगळीकडे माती रक्षणाचे संवर्धनाचे गोडवे गायिले जातात .पण प्रत्यक्षात काय ? तुमच्या जागतिक महिला दिनाचे व आमचं सारखंच आहे.महिला दिनी महिलांचे गोडवे गाता पण खरंच ती सुरक्षित आहे का ? शेवटी काय माता व मातीत फक्त एका वेलांटीचा फरक आहे.पण साम्य विचाराल तर पदोपदी दिसेल.मानवी माता जसं उदरात बाळाला वाढवून मानवी वंश टिकविते तसंच मी सुद्धा माझ्या उदरात अन्न धान्य उबविते.तुम्ही माणसांनी हर एक गोष्टीचा कारखाना काढला असेल पण मातीवाचून अन्ननिर्मिती हा विचार तरी पटतोय का ?
जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024
अन्नधान्यासह इतरही मानवी गरजा फक्त माझ्यामुळेच पूर्ण होतात.जमीनीचा तुकडा वाढत नसतो.माझ्या आकारमानाला मर्यादा आहेत.तेव्हा माणसाच्या हाती एवढंच आहे की त्याने माझा पोत सांभाळावा.
अन्न वस्त्र निवारा या तुमच्या मुलभूत गरजांचा मीच मूळ स्त्रोत आहे.एवढंच नाही तर पाणी व हवासुद्धा माझ्याच कुशीत तयार होते.प्राणी व वनस्पती सृष्टीला माझ्यामुळेच जीवन आहे.मातीचं भांडं होऊन मी तुमच्या घरात राहते.मुलतानी माती होऊन चेहऱ्याला देखणं करते.अन्नात माती कालवू नये असं तुम्ही म्हणता पण मातीत विष कालवताना माणुस शुद्धीवर असतो का ? माती होणे या शब्दाचा अर्थ तुम्ही लोक सर्वस्व हरणे या अर्थाने वापरता .रांगोळी म्हणजे सुबकता ,रांगोळी म्हणजे प्रसन्नता.पण याच रांगोळीला राख असा शब्द जोडून आला की राखरांगोळी शब्द तयार होतो व याचा अर्थ खूप भयानक आहे.माती ही माता असेपर्यंत तुमचं कल्याण आहे.
मातीचीच माती करायला निघालात तर मानवी जीवनाची राखरांगोळी ठरलेलीच आहे.निसर्गात मी अनेक रंगात सापडते.तरीही माझ्या चार पाच रंगाचीच चर्चा जास्त होते.लालसर जांभी ,काळी,गाळाची व वाळुची माती असे माझे ठळक प्रकार आहेत.बळीराजा मला काळी आई म्हणून पुजतो.तो माझा सर्वात मोठा सन्मान आहे.एक तो शेतकरी सोडला तर कुणाला माझं कौतुक नाही.मातीला वाचविलं नाही तर,मानवी जीवनात खड्डा पडेल.
आमची माती आमची माणसं असं कानी पडलं की खूप बरं वाटतं.मराठी भाषेचं सौंदर्य वाढण्यासाठी सुद्धा आम्हा मातीनं शब्दधन दिलं आहे.
दादा कोंडके यांनी तांबडी माती चित्रपट काढून इतिहासासोबत माझा सन्मान केला.माणुस एक माती या चित्रपटानेही मातीसोबतचं भावविश्व दाखवलं.लढा मातीचामध्ये शेतकरी संघर्ष दाखविला.काया मातीत मातीत या गीताला कवी विठ्ठल वाघ यांनी अजरामर केले.धड्यात ,कवितेत ,साहित्यात मला वाव दिला. गढी हे वैभव मातीनेच दिलेले आहे.

जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024
मातीतून सोनं उगतं असं म्हटलं की तो आमचा सन्मान असतो.या उलट त्याने शेवटी माती खाल्लीच या वाक्यात आमच्यासाठी वेदना असते.एखादा म्हातारा वडील त्याच्या तरण्या पोराला उद्देशून म्हणतो की अरे त्वा संसाराची माती केलीस.त्या म्हाताऱ्याच्या त्राग्याने आमचंच अंग शहारून निघतं.पहिल्या प्रेमात नव तरूणी नजाकतीने पायच्या अंगठ्याने मातीशी चाळा करते तेव्हा मलाही रोमांचित व्हायला मिळतं.सुखाचे थोडेफार क्षण सोडले तर सतत आम्ही आला खतांची व विषारी औषधांची फवारणीच
जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024.
माणसाच्या गरजा पुरविण्याची क्षमता माझ्यात आहेच फक्त मी तुमच्या हव्यासाला पुरू शकत नाही.अन् नेमकं तुमचा हव्यास ही तुमची गरज झाली आहे.त्यामुळे तुमचं मातीशी नातं तुटत आहे.पण हा हव्यास समस्त मानवजातीला विनाशाकडे नेणारा आहे.शेतीचा व एकंदरीत मानव जातीसह संपूर्ण सृष्टीचा मी पाया आहे.तुम्ही पायावरच धोंडा हाणून घेणार असाल तर मी तरी काय करणार ? माझा पोत ,माझा प्रकार विचारात घेऊन मला वाचवा मग मी तुम्हाला वाचवू शकेन.
तुम्ही माणसं आजारी पडलात की जसं रक्त,लघवी,ईसीजी,सीटीस्कॅन,एम आर आय करता तसं माती परीक्षण करत जा. मातीची माती करणं थांबव रे माणसा.
जागतिक माती दिन 5 डिसेंबर 2024
बाजारात जाता तेव्हा तुम्हाला गावरान वाण हवा असतो.गावरान म्हणजे नैसर्गिक मूळ आधार.गावरान वाणाचा आग्रह धरताना तुम्ही माती गावरान ठेवली आहे का ? संकरित गाईच्या पोटी गावरान गोऱ्हा कसा उपजेल ? अरे शेवटी मी आई आहे तुमची.सृष्टीत सर्वात शेवटी आलेलं प्राणी बाळ म्हणजे माणुस.शेंडेफळ जसं माणसात लाडकं असतं तसं ते निसर्गातही लाडकं असतं.निसर्गाचा विनाश माणसाकडून घडला तर शेंडेफळाने वंश बुडविला असं खापर नको फुटायला.म्हणून काळजीने सांगतेय माझी माती करू नका.मला मातीच राहू द्या.तरच नाती टिकतील.
डबडबलेल्या अश्रूच्या अभिषेकात एखाद्या स्त्रीने दुःखाची पुजा मांडावी तसं ही माती बोलत होती.आवाज बंद झाला तरी मला सारखा आवाजाचा भास होत होता.मानवाने विनाशाच्या खाणी खोदलेल्या दिसत होत्या.ते काही नाही ,आता माती संवर्धन करायचेच.माती टिकली तरच आपलं अस्तित्व आहे अन्यथा आपली धुळधाणच.कुणीतरी एवढ्या विश्वासाने आपल्याशी बोलत असेल तर त्या विश्वासाप्रती आपलाही काहीतरी संकल्प हवाच ना.तिथली मुठभर माती उचलून कपाळी लावली व बोललो.
माता व मातीच्या रक्षणासाठी फौज उभी करण्याचे काम माझं.माते तू निर्धास्त राहा.
अन्न ,वस्त्र, निवारा ,औषधी, सृष्टी चक्र यासाठी आपल्याला मातीची गरज आहे.
लेखातील फोटो सौजन्य इंटरनेट
कचरू चांभारे
बीड 9421384434
kachauchambhare.com
